सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला पोलिसांकडून झालेला विरोध

पोलिसांविषयी आलेले कटू अनुभव

२ जानेवारी २०१९ या दिवशी सभेचे अनुमती आवेदन सादर करूनही विविध अडचणी निर्माण करत पोलिसांकडून प्रत्यक्ष सभेच्या दिवशी म्हणजे ६ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता अनुमती !

१. २ जानेवारी या दिवशी सभेचे पहिले अनुमतीचे आवेदन पोलिसांना सादर करण्यात आले होते. प्रारंभी अधिवक्ता संजीव पुनाळेकर वक्ता म्हणून येणार होते. सभेच्या अगोदर आठ दिवसांपूर्वी आमदार टी. राजासिंह यांचे नाव अंतिम झाले.

२. समितीने अनुमती पत्रात सभेची वेळ सायंकाळी ५ ते रात्री ९ अशी मागितलेली असतांना पोलिसांनी दुपारी ३ ते सायं. ५ या वेळेत सभा घेण्यास सांगितले.

३. यानंतर सभेच्या आयोजकांनी पोलीस आयुक्तांशी भेट घेऊन चर्चा केली. प्रारंभी २ फेब्रुवारीला आयुक्तांनी सभा सायंकाळी घेण्याचे तोंडी आश्‍वासन दिले.

४. त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी ५ फेब्रुवारी या दिवशी आयोजकांना बोलावले. या वेळी चर्चेत उपायुक्तांनी अनेक सूचना देऊन परत सभा दुपारीच घेण्याविषयी आग्रह केला. आमदार टी. राजासिंह यांचे संपूर्ण लिखित नियोजन मागितले. हे नियोजन समितीने सायंकाळी संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन दिले.

५. ५ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी सभेला अनुमती देण्याच्या प्रक्रियेत असलेल्या एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ‘पोलीस उपायुक्त आल्यावर कळवू’, असे सांगितले.

६. ५ फेब्रुवारीला रात्री पोलिसांचा आयोजकांना कोणताही दूरभाष आला नाही.

७. ६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११.३० वाजता सभेचे आयोजक परत एकदा पोलीस उपायुक्तांना भेटले. पोलिसांनी ‘तुम्हाला दिलेल्या सूचनांचे पालन केले आहे ना ?’, अशी विचारणा केली. या वेळी अंतिमत: पोलीस उपायुक्तांनी ‘तुम्ही सायंकाळच्या वेळेत सभा घेऊ शकता’, असे तोंडी सांगितले.

८. त्यानंतर सभेचे आयोजक पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पोलीस निरीक्षकांना भेटले. त्यांनी परत एकदा अनेक तोंडी सूचना देऊन ‘प्रक्षोभक भाषण न करणे, प्रक्षोभक घोषणा न देणे’, अशा सूचना दिल्या.

९. या वेळी दुपारी १२.३० वाजता संबंधित पोलीस ठाण्याने अनुमती पत्र देतांना परत सभेची वेळ दुपारी ३ ते ५ अशीच दिली. आयोजकांनी ही गोष्ट संबंधित पोलिसांच्या लक्षात आणून दिली. यानंतर पोलिसांनी यावर परत एकदा चर्चा करून आयोजकांना ६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १ वाजता सभेची लेखी अनुमती सायंकाळी ५ ते रात्री ८ अशी दिली.

१०. या वेळी आयोजकांनी संबंधित पोलीस निरीक्षकांना ‘पोलीस उपायुक्तांसमवेत ८.३० वाजेपर्यंत चर्चा झाली आहे. त्यामुळे ही अनुमती ८ ऐवजी ८.३० करून मिळावी’, अशी विनंती केली. यासाठी परत अर्धा घंटा आयोजकांना पोलिसांशी चर्चा करावी लागली. यानंतर शेवटी पोलिसांनी ८.३० पर्यंत अनुमती दिली.

११. ‘तुमचे कार्य जरी चांगले असले, तरी आम्हाला वरिष्ठांचा दबाव असतो. त्यामुळे आम्हाला या गोष्टी कराव्या लागतात’, असे वरिष्ठांसह सर्व पोलीस वारंवार सांगत होते. (पोलिसांनी त्यांच्यावर नेमका कुणाचा आणि कशासाठी दबाव असतो, हे हिंदूंसमोर जाहीर करावे. – संपादक)

१२. पोलिसांनी आयोजकांकडून सभेत काय वक्तव्ये होणार, ते लिहून घेतले आणि त्याच्या बाहेर वक्तव्ये झाल्यास गुन्हा नोंद करू, असे सांगितले.

प्रत्यक्ष सभेच्या दिवशी पोलिसांनी दिलेला त्रास

१. सभेच्या दिवशी पोलिसांनी बॉम्बशोधक पथक आणले होते. यात श्‍वान, तसेच अन्य साहित्य होते. हा श्‍वान संपूर्ण मैदान, व्यासपीठ यांसह प्रत्येक ठिकाणी फिरवला. बॉम्बशोधक पथकाच्या पोलिसांनी अतिरेक करत काही महिला साधिकांना त्यांच्या ‘पर्स’ उघडून दाखवण्यास सांगून त्यात काय आहे, ते पाहिले.

२. व्यासपिठाच्या सर्व बाजूला पोलीस उभे होते. ते व्यासपिठाच्या जवळपास येणार्‍या धर्मप्रेमींना हिडीसफिडीस करून आणि अंगावर ओरडून बोलत होते.

३. रात्री ८.३० वाजल्यावर पोलिसांनी आयोजकांना दूरभाष करून ‘तुमची वेळ संपली आहे. ध्वनीक्षेपक यंत्रणा बंद करा’, असे सांगितले.

४. सभा झाल्यावर रात्री ९ वाजता एक पोलीस निरीक्षक सभास्थळी आले. त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना ओरडून ‘पहिल्यांदा भगवे झेंडे काढा’, असे सांगितले.

५. सभेसाठी उपस्थित पोलिसांनी स्वागतकक्षावरील एका कार्यकर्त्यास ‘जा. आमच्यासाठी आठ आसंद्या घेऊन ये’, असे ओरडून सांगितले.

काही चांगले अनुभव

१. सभा झाल्यावर सभेसाठी अनुमती देणारे संबंधित पोलीस आणि अन्य एक पोलीस निरीक्षक यांनी ‘सभा पुष्कळ चांगली झाली’, असे सांगितले.

२. सभेच्या अनुमतीच्या काळात पोलिसांनी ‘धर्मांध आमच्याशी कसे वागतात आणि हिंदू कसे वागतात, याचा चांगला अनुभव आहे’, याची आम्हाला जाणीव आहे’, असे सांगितले. (असे आहे, तर पोलिसांनी हिंदूंना सहकार्य करणे अपेक्षित आहे. – संपादक)

३. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी अनुमती देण्याच्या प्रक्रियेच्या काळात ‘‘तुम्हाला अनुमती द्यायची नाही, असे नाही, तर तुमच्या आडून काही जण वेगळी कृती करतात. त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे या सर्व दक्षता घ्याव्या लागतात’’, असे सांगितले.

आमदार टी. राजासिंह यांना आम्ही ओळखत नाही; त्यांच्या ‘आधारकार्ड’ची छायांकित प्रत द्या ! – पोलिसांची उद्दाम भाषा

पोलिसांनी सभेला वक्ता म्हणून उपस्थित असणारे आमदार टी. राजासिंह यांना आम्ही ओळखत नाही. त्यांच्या आधारकार्डाची छायांकित प्रत द्या, तसेच अन्य दोन वक्त्यांच्याही आधारकार्डाची छायांकित प्रत द्या, अशी मागणी केली.

आयोजकांसह वक्त्यांनाही पोलिसांची कलम १४९ ची नोटीस !

या वेळी पोलिसांनी केवळ सभेचे आयोजक श्री. राजन बुणगे यांनाच नाही, तर अधिवक्त्या (कु.) प्रियांका लिगाडे आणि श्री. दत्तात्रय पिसे यांच्यासह सभेचे तिन्ही वक्ते यांना कलम १४९ ची नोटीस दिली. सभेच्या वक्त्यांना तर सभा चालू होण्याच्या क्षणी नोटीस दिली, तर आमदार टी. राजासिंह यांना व्यासपिठावरच नोटीस दिली.

अन्य भाषिक आमदार टी. राजासिंह यांना मराठीतून नोटीस देणारे पोलीस प्रशासन !

आमदार टी. राजासिंह हे अन्य भाषिक आहेत, हे माहिती असूनही पोलिसांनी त्यांना मराठीतून नोटीस दिली. या नोटिसीमध्ये काय लिहिले आहे, हेही त्यांना कळत नव्हते.


Multi Language |Offline reading | PDF