भाजप आणि वाड्रा !

काँग्रेसचे जावई रॉबर्ट वाड्रा यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) चौकशी चालू केली आहे. वर्ष २००८-२००९ मध्ये पेट्रोलियम आणि संरक्षण क्षेत्रातील करारांमुळे वाड्रा यांना लाभ झाल्याचा आणि त्या पैशांतून वाड्रा यांनी विदेशात बरीच मोठी संपत्ती जमवल्याचा आरोप होत आहे. यासह ‘मनी लॉन्ड्रींग’च्या प्रकरणीही त्यांची चौकशी चालू आहे. काँग्रेसच्या काळात असे घोटाळे उघड होणे शक्यच नव्हते.

आता त्यांची चौकशी करून काहीतरी हालचाली चालू असल्याचे किमान दाखवले तरी जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रियांका त्यांच्या भावाला साहाय्य करू शकल्या नाहीत, त्याचे हेही एक कारण होते. त्याच काळात भाजपने डीएल्एफ् प्रकरणी काँग्रेसला कात्रीत पकडले होते. काँग्रेसने प्रियांका वाड्रा यांना उत्तरप्रदेशसारख्या लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाच्या राज्याची धुरा दिल्यामुळे आता पुन्हा भाजपने ही खेळी केली आहे का, असे म्हणण्यास वाव आहे. वास्तविक प्रियांका यांच्यामुळे उत्तरप्रदेशात काँग्रेसला लाभ झालाच, तर त्यामुळे हानी कोणाची होणार आहे, हेही पहाणे आवश्यक आहे. तेथे केवळ काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष नाहीत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा सोबती असलेला समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पार्टी यांनी उत्तरप्रदेशमध्ये युती केली आहे. भाजपच्या विचारसरणीचा मतदार प्रियांका प्रचाराला आल्या; म्हणून काँग्रेसला मते देणार नाही. उलट  काँग्रेसची मते वाढली, तर त्यांच्याच विचारांच्या सप-बसपा युतीची मते अल्प होणार आहेत. त्यामुळे कसेही झाले, तरी यांच्या मतांचे विभाजन होणे भाजपसाठी लाभ देणारेच आहे. अर्थात प्रियांका त्यांच्या व्यक्तीमत्त्वाकडे आकर्षित होणार्‍यांना मते देण्यास त्या कोणत्या आधारावर प्रवृत्त करणार आहेत, हाही एक प्रश्‍नच आहे.

केवळ इंदिरा गांधी यांच्यासारख्या दिसतात; म्हणून कोणताही राजकीय अनुभव नसलेल्या प्रियांका वाड्रा यांना मतदार स्वीकारणार का ? प्रियांका गांधी यांनी काँग्रेसचे पद स्वीकारले, तेव्हा माध्यमांनी आणि उथळ राजकीय विश्‍लेषकांनी संपूर्ण उत्तरप्रदेश काँग्रेसच्या झोळीत आल्याप्रमाणे राळ उठवली होती. या मंडळींना प्रियांका यांचा ‘करिष्मा’ दिसतो, तसा रॉबर्ट वाड्रा यांचा प्रचंड भ्रष्टाचार दिसत नाही का ? काहीच वर्षांत जमवलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती दिसत नाही का ? आता चौकशीदरम्यान रॉबर्ट यांनी लंडनमध्ये त्यांची कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा केला आहे; मात्र याचा अर्थ ते धुतल्या तांदळासारखे आहेत, असा होत नाही. संपत्ती कुठे, कोणाच्या नावावर जमवायची, ती सरकारपासून कशी दडवायची, अन्वेषण यंत्रणांना चकवा कसा द्यायचा, हे काँग्रेसवाल्यांना शिकवावे लागत नाही. त्यामुळेच राहुल गांधी यांनी ‘चिदंबरम् यांची चौकशी करा अथवा रॉबर्ट यांची चौकशी करा; मात्र राफेलचे सत्य उघड करा’, अशा कितीही आरोळ्या ठोकल्या अथवा रॉबर्ट आणि प्रियांका यांनी कितीही नाकारले, तरी त्यांना ओळखून आहे.

रॉबर्ट यांच्या समर्थनार्थ ‘हे राजकारण आहे’; असे म्हणून उभे रहाणार्‍यांचीही कमाल आहे. या आरोपांमुळेच वर्ष २०१४ मध्ये काँग्रेसची मोठी हानी झाली होती, हे जाणूनही कोणीही काँग्रेसवाला या घरगुती आपत्तीसंदर्भात बोलायला सिद्ध नाही. काँग्रेसचे हात दगडाखाली आहेत. राफेलमध्ये घोटाळा झाल्याचा बालिश कांगावा राहुल गेले अनेक महिने करत आहेत. त्यासंदर्भात अनेकांनी खुलासे करूनही ते समजून न घेणार्‍या राहुल गांधींना या घरातील भ्रष्टाचारासंदर्भात विशेष सहानुभूती आहे का ? कोणताही अभ्यास न करता बडबडणे सोपे असते; न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाऊन निर्दोषत्व सिद्ध करणे कठीण आहे, हे गांधी घराणेही जाणून आहे.

भाजपचे सत्ताकारण !

प्रियांका, रॉबर्ट आणि गांधी परिवार या प्रकरणी कितीही बरबटला असले, तरी भाजपही मागे नाही. आश्‍चर्य असे आहे की, वर्ष २०१४ मध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीही हेच सारे घडत होते. ५ वर्षांपूर्वी याच विषयावर बरीच राळ उठवूनही नंतर काही करावे, असे भाजपला वाटले नाही. भाजपने केवळ काँग्रेसलाच नाही, तर गांधी परिवारालाच अडचणीत आणण्यासाठी हा घोटाळा शोधला होता, त्यामुळे त्याचे अन्वेषण करून सोक्षमोक्ष लावणे भाजपला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मिळवायचा तो लाभ मिळवून झाला की, आता पुन्हा भाजपने त्याच वेळी तोच पत्ता बाहेर काढला आहे. प्रियांका वाड्रा यांचा राजकारणात प्रवेश होईपर्यंत या चौकशा चालू झाल्या नव्हत्या, आता त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर हे सारे चक्र चालू झाले आहे. भाजपच्या सत्ताकारणाचे हे काही एकमेव उदाहरण नाही. भाजपच्या ५ वर्षांच्या काळात ‘न खाऊंगा न खाने दूंगा’ हे एका पातळीवर दिसून आले किंवा उघड झाले नाही. असे असले, तरी ज्यांनी आधीच खाल्ले आहे, त्यांच्यासंदर्भात भाजप सोयीचे राजकारण करत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी याच दिवसांत भाजप सिंचन घोटाळ्याविषयी बर्‍याच मोठमोठ्या गप्पा मारत होता. ‘झिरो टॉलरन्स’ असे म्हणून भ्रष्टाचाराचा धिक्कार केला जात होता. काय झाले त्याचे पुढे ? ‘२ जी स्पेक्ट्रम’ घोटाळ्याच्या प्रकरणी आरोप असलेले ए. राजा यांची तर भाजपच्याच काळात निर्दोष मुक्तताही झाली. त्यामुळेच अशा काही घटना घडल्या की, आता फार काही गदारोळ होत नाही. माध्यमांकडून होणारे उथळ वार्तांकन सोडले, तर याची कोणी दखलही घेत नाही. या सगळ्या सत्तालालसेमुळे जनतेवर ‘काँग्रेस आणि भाजप वेगळे नाहीत’, असे म्हणायची वेळ आली आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्यावरील आरोप सिद्ध झाले किंवा नाही, प्रियांका वाड्रांचा उत्तरप्रदेशमध्ये लाभ झाला किंवा नाही आणि भाजपला सत्ता मिळाली अथवा नाही, या सर्व परिस्थिती सामान्यांसाठी सारख्याच झाल्या आहेत, हे लोकशाहीचे घोर अपयश आहे !


Multi Language |Offline reading | PDF