हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व संतांनी संघटित व्हावे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

कुंभमेळा प्रयागराज २०१९

संत आणि धर्मनिष्ठावंत यांच्या उपस्थितीत प्रयागराज येथे एकदिवसीय हिंदु राष्ट्र अधिवेशन

डावीकडून सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, महंत रामज्ञानीदासजी महाराज, महामंडलेश्‍वर जनार्दनहरिगिरीजी महाराज आणि दीपप्रज्वलन करतांना महंत भगीरथीजी महाराज

प्रयागराज (कुंभनगरी) – वर्तमान लोकशाही व्यवस्थेत ‘धर्मनिरपेक्षता’ शब्द घुसडल्यामुळे देशातील राज्यघटनात्मक स्तरावर हिंदु समाजाला कोणतीही प्रतिष्ठा मिळालेली नाही. घटनेतील कलम २८ आणि २९ च्या मते अल्पसंख्यांक समुदायाला धार्मिक शिक्षण देण्याविषयी प्रावधान (तरतूद) केले आहे; मात्र सनातन वैदिक हिंदु धर्माविषयी कोणतेही शिक्षण देण्याचे प्रावधान केलेले नाही. या पक्षपाताला हटवायचे असेल, तर भारतीय घटनेतील ‘धर्मनिरपेक्षत’ शब्दाला हटवणे आवश्यक आहे. ज्या वेळी ‘सेक्युलर’ शब्द हटवण्यात येईल, त्या वेळी भारत हिंदु राष्ट्र होईल. त्यामुळे गो, गंगा, मंदिरे आदी भारतातील सर्व मानबिंदूंचे रक्षण करणे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे काढले.

कुंभक्षेत्रात ८ फेब्रुवारी या दिवशी ‘भूमा निकेतन पंडाल’ येथे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या हेतूने संतसमाज तथा हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे एक दिवसीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या अधिवेशनात देशातील विविध राज्यांतील संत, शैव, वैष्णव तथा उदासीन आखाड्यांशी जोडलेले संत, महंत, महामंडलेश्‍वर तथा हिंदु संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी महंत रामज्ञानीदासजी महाराज, महामंडलेश्‍वर जनार्दनहरिगिरीजी महाराज आदी संतसमाज उपस्थित होता.

सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांनी उभारलेले प्रदर्शन कुंभमेळ्यातील प्रत्येक आखाडा आणि शिबीर येथे उभारले जावे ! – आचार्य राधाप्रसाददेवजी महाराज

आचार्य राधाप्रसाददेवजी महाराज

सध्या हिंदु समाज भरकटलेला आहे. धर्मगुरु आणि पूर्वज यांनी सांगितलेल्या गोष्टी हिंदु विसरला आहे. यासाठी सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांनी जे ग्रंथ आणि धर्मशिक्षण यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे, त्यातून भारतीय संस्कृती आणि धर्म यांची माहिती मिळते. असे प्रदर्शन कुंभमेळ्यातील प्रत्येक आखाडा आणि शिबीर येथे लावल्यानंतर त्यातून भागवत, रामायण यांची खरी माहिती मिळेल. माझ्या मते हे प्रदर्शन पाहिल्यानंतर मनुष्याला मुक्ती मिळेल. या प्रदर्शनातून माहिती घेऊन एक जरी व्यक्ती सुधारली, तर नंतर देशही सुधारेल. मी सुधारलो, तर देश सुधारेल, हे लक्षात ठेवावे. या संस्थेला आमच्यासारख्या धर्माचार्यांची आवश्यकता आहे. या प्रदर्शनाप्रमाणे शंकराचार्य, महंत यांनी घराघरांत जाऊन हिंदूंमध्ये जागृती केली पाहिजे. आखाडे आणि शिबिरे येथे मोठे फलक लावण्याऐवजी त्या फलकांवर खर्च करण्यात येणारे १ लाख रुपये येथील प्रदर्शनासाठी दिले, तर ते अधिक योग्य होईल; कारण या प्रदर्शनातून खरा धर्मप्रसार होत आहे. या प्रदर्शनातून मला राम आणि श्रीकृष्ण यांचे दर्शन झाले.

हिंदूंनी संघटित होऊन देशातील अधर्म माजवणार्‍या षड्यंत्रांचा बीमोड करावा ! – महंत रामज्ञानीदासजी महाराज

महंत रामज्ञानीदासजी महाराज

भारत अनेक संकटांनी ग्रासला आहे; मात्र त्यावर उपाय करण्याऐवजी आपण चर्चा करत आहोत. प्रदर्शन पाहिल्यावर विचार, निर्णय आणि कार्य करण्याची प्रक्रिया चालू होते. त्याचा प्रत्यक्ष वापर केल्यास जीवनाचे सार्थक होईल. इतर ठिकाणी सभा, बैठका यांचे आयोजन होते; मात्र काम होत नाही. ख्रिस्ती आणि इस्लाम पंथांत एकच देव अन् ग्रंथ असतांना त्यांच्या पंथांतील लोक त्यांच्या पंथाप्रती कट्टरवादी असतात. ख्रिस्ती प्रत्येक रविवारी प्रार्थना करतात, मुसलमान प्रतिदिन नमाजपठण करतात. हिंदु धर्मात ३३ कोटी देव असतांना त्यांनी ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) शब्दाचा स्वीकार का करावा ? देशातील हिंदूंना ‘भारतमाता की जय’, ‘जय श्रीराम’ असे म्हणता येत नाही; कारण धर्मनिरपेक्षता आड येते. युरोपमध्ये पोप, तर इस्लामी राष्ट्रांत मौलवी राज्य कारभार चालवतात; मात्र दुर्दैवाने भारतात दिवाळीच्या रात्री १२ वाजता जगद्गुरु शंकराचार्यांना अटक केली जाते. ही हिंदूंच्या दृष्टीने मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. देशातील अधर्म माजवणार्‍या षड्यंत्राचा बीमोड करायचा असेल, तर हिंदूंना संघटित होऊ निधर्मीवाद्यांना धडा शिकवावा लागेल. तेव्हाच हिंदु समाजात समरसता येईल.

अधिवेशनात उपस्थित संत आणि हिंदुत्वनिष्ठ प्रतिनिधी

अधिवेशनात हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी प्रारंभी पारित केलेले प्रस्ताव

–पू. नीलेश सिंगबाळ

१. भारताला घटनात्मक स्तरावर हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या हेतूने घटनेतील ‘सेक्युलर’ हा शब्द हटवून ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दांचा समावेश करण्यात यावा. याव्यतिरिक्त वर्ष २००६ पर्यंत सनातनधर्मी हिंदु राज्य राहिलेल्या नेपाळला पुन्हा एकदा तेथील संसदेने ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित करावे.

२. काश्मीर खोर्‍यातील विस्थापित करण्यात आलेले ७ लक्ष ५० सहस्र हिंदूंचे सुरक्षितरित्या पुन्हा पुनर्वसन होण्यासाठी केंद्र सरकारने काश्मीर खोर्‍यात ‘पनून काश्मीर’ नावाने केंद्रशासित प्रदेशाची उभारणी करावी.

३. गोमाता, गंगा, तीर्थक्षेत्र आदी हिंदु मानबिंदूंच्या रक्षणासाठी केंद्र स्तरावर कठोर कायदा सिद्ध केला जावा.

४. केरळ येथे शबरीमला देवस्थान तथा महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर देवस्थान यांची परंपरा खंडित करणार्‍या संबंधित राज्य सरकारांचा हे अधिवेशन निषेध करत आहे. या प्रकरणांत केंद्र सरकाराने सुचवावे की, हिंदूंच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्याच्या हेतूने त्वरित कठोर कायदा सिद्ध करण्यात यावा.

५. नवी देहली येथे चालू असलेल्या संसदेत केंद्र सरकारने रामजन्मभूमीवर प्रभु श्रीरामाच्या भव्य राममंदिराची उभारणी करण्याच्या उद्देशाने अध्यादेश काढून हिंदु समाजाच्या धर्मभावनांचा आदर करावा.

क्षणचित्र : सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट आणि दैनिक सनातन प्रभातचे विशेष प्रतिनिधी श्री. अरविंद पानसरे यांनी उपस्थित सर्व संतांचा पुष्पहार घालून सन्मान केला.


Multi Language |Offline reading | PDF