जपानसारखा देश आयुर्वेदातील संशोधनात कितीतरी पुढे गेला आहे ! – विनयकुमार आवटे, केंद्रीय आयुष मंत्रालय

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – वर्ष २०१४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या आयुष मंत्रालयामुळे प्राचीन प्रचलित औषध प्रणालींचा नव्याने अभ्यास करण्यास चालना मिळाली. या औषध पद्धतींचे बहुतांशी ज्ञान हे संस्कृत, अरबी, तमिळ आणि जर्मन भाषांमध्ये उपलब्ध आहे. जग आज संयुक्त औषध प्रणालीकडे वळत आहे. जपानसारखा देश आयुर्वेदातील संशोधनात कितीतरी पुढे गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवीन संशोधन करतांना प्राचीन उपलब्ध संदर्भांचाही वापर करावा. त्यासाठी आवश्यक त्या भाषाही शिकाव्यात, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या भारत-जपान करार मंडळाचे सदस्य विनयकुमार आवटे यांनी येथे केले.

येथील यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजमध्ये ‘नैसर्गिक रसायनशास्त्राचा अभ्यास आणि औषधनिर्माण शास्त्रातील नाविन्यपूर्ण संकल्पना’, या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन विनयकुमार आवटे यांच्या हस्ते झाले. देशभरातील नामांकित संशोधक आणि प्राध्यापक यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत ७०० विद्यार्थ्यांनी त्यांचा सहभाग दर्शवला, तसेच निरनिराळ्या प्रकारचे १७० शोधप्रबंध आणि त्यावर आधारित भित्तीपत्रकेही सादर करण्यात आली. या वेळी रत्नागिरी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशोरकुमार बुराडे, गोवा फार्मसी कॉलेजचे डॉ. रघुवीर पिसुर्लेकर, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक आदी उपस्थित होते.

या परिषदेत औषधनिर्माण शास्त्रातील नैसर्गिक वनस्पतींचा वापर आणि त्याचे महत्त्व, औषधांच्या रासायनिक संरचनेतील पालटांमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर होणारे परिणाम आदी विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. नमिता भोसले आणि बी. फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी दुर्गेश बिडये यांनी केले. आभार समन्वयक प्रा. विनोद मुळे यांनी मानले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now