भगवंत आणि खरे स्वातंत्र्य !

परात्पर गुरु पांडे महाराज

‘१५.८.२०१८ या दिवशी प्रसिद्ध झालेला सनातन प्रभात दैनिकाचा ‘वन्दे मातरम्’ विशेषांक फार चांगला आहे. अखंड भारत हा एक वर्षाचा प्रयोग झाला. त्या कालावधीत किती भयानक घटना घडल्या ! यावरून ‘अखंड भारत झाला नाही, ते बरे झाले’, असे वाटते. भगवंताचेच नियोजन होते. यावरून भगवंत कसे कार्य करतो, हे कळते.

१. भगवंताला महत्त्व द्या !

‘भगवंताला महत्त्व देणे, त्याला पुढे आणणे’, हे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही, असे दिसून येते. हे सत्य असून आपण भगवंताला पुढे का आणत नाही, याचे आश्‍चर्य वाटते.

२. ‘भगवंतच सर्व कार्य करत आहे’, हे मनात ठसवा !

‘तोच तुमचे मन आणि बुद्धी यांतून कार्य करत असतो’, हे जोपर्यंत सर्वांच्या मनात ठसत नाही, तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. भगवंताला पुढे आणणे, म्हणजे ईश्‍वरेच्छेने कार्य होणे होय. हेच ईश्‍वरी राज्य होय ! हेच रामराज्य, म्हणजे हिंदु राष्ट्र होय ! म्हणजेच निसर्गाप्रमाणे राज्य चालणे होय !

३. भगवंत दिसायला हवा !

दैनिक सनातन प्रभात वाचतांना वाचकाला स्वतःसमोर भगवंत दिसला पाहिजे. त्याचे दर्शन झाले पाहिजे. प्रत्येक गोष्टीतून तो समोर दिसला पाहिजे. यालाच ‘पूजा’ असे म्हणतात. याला ‘खरे स्वातंत्र्य’ म्हणतात.

४. स्वतःच्या नव्हे, तर आत्म्याच्या (भगवंताच्या) तंत्रानुसार कार्य करा !

स्वातंत्र्य म्हणजे स्व + तंत्र. स्व = आत्मा ! आत्म्याच्या तंत्रानुसार चालणारे कार्य म्हणजेच ईश्‍वरेच्छेने होणारे कार्य ! हे समजले की, आनंद मिळतो; कारण जिकडे-तिकडे तोच आहे. त्याचेच साम्राज्य आहे. माझ्यात आणि सर्वत्र तोच आहे. सगुण आणि निर्गुण यांमध्ये तोच आहे. तोच सर्वत्र ठासून भरला आहे. असे असतांना आपण आपल्या म्हणजे स्वतःच्या तंत्राने चालतो; म्हणून आजची स्थिती गंभीर झाली आहे.

५. प्रत्येक कृतीमध्ये भगवंताचे दर्शन झाले पाहिजे !

‘वन्दे मातरम्’ म्हणजे काय ? सृष्टीला नमस्कार म्हणजे भगवंताला नमस्कार ! या अर्थाने त्याला पुढे आणून त्याचे दर्शन घडवणे हे खरे दर्शन आहे. यासाठी प्रत्येक कृतीमध्ये भगवंताचे दर्शन झाले पाहिजे. भगवंतांनी गीतेत म्हटले आहे की,

नैव किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्‍नग्नच्छन्स्वपञ्श्‍वसन् ॥ ८ ॥

प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ॥ ९ ॥

(संदर्भ : श्रीमद्भगवत्गीता अध्याय ५, श्‍लोक ८,९)

अर्थ : सांख्ययोगी तत्त्ववेत्त्याने पहात असता, ऐकत असता, स्पर्श करत असता, वास घेत असता, भोजन करत असता, चालत असता, झोपत असता, श्‍वासोच्छ्वास करत असता, बोलत असता, टाकून देत असता, घेत असता, तसेच डोळ्यांची उघडझाप करत असतांनाही ‘सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत’, असे समजून निःसंशय असे मानावे की, मी काहीच करत नाही. (म्हणजे ‘सर्व भगवंतच करत आहे’, हे समजले पाहिजे.)

६. चैतन्याला पुढे आणा !

म्हणजेच सर्व कृती करतांना आपल्याला भगवंतच दिसला पाहिजे. नाहीतर कसली ईश्‍वरप्राप्ती ! समजा दगडाचे मंदिर बांधले, सर्व काही केले; पण दगडाची मूर्तीच बसवली नाही, तर दर्शन कशाचे घेणार ? यासाठी भगवंताला पुढे आणून कार्य केले पाहिजे, म्हणजेच चैतन्याला पुढे आणले पाहिजे.

७. चैतन्याचे नामकरण आणि स्मरण करा !

चैतन्य अनामिक आहे. प्रथम त्याचे नामकरण केले पाहिजे. त्यानंतर त्याचे स्मरण केले पाहिजे. यासाठी ‘देवा तूच गणेशा । वर्णन वपु…’ असे म्हटलेले आहे; म्हणून प्रथम श्री गणेशाचे पूजन होते.

८. भावजागृती म्हणजेच आत्मजागृती झाली पाहिजे !

देशाच्या स्वातंत्र्यकाळात देशविरांनी ‘वन्दे मातरम्’ म्हटले; पण ते कोणासाठी ? हे जगाला सांगावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. ‘मातरम्’ म्हणजे मातृभूमीला ! येथे मातृभूमी म्हणजे ‘भगवंत’ आहे; म्हणून त्याला पुढे आणले पाहिजे. तो दिसला पाहिजे, त्याचे दर्शन झाले पाहिजे, म्हणजेच भावजागृती, म्हणजेच आत्मजागृती झाली पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक भारतियाचे सामर्थ्य जेव्हा वाढेल, त्या वेळी ते अमोघ होईल.

९. दुर्दम्य चैतन्यशक्तीचे अगम्य कार्य !

९ अ. सुभाषचंद्र बोस यांच्यातील भगवंताने निर्माण केलेल्या अमोघ चैतन्यशक्तीचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवा ! : सुभाषचंद्र बोस भारतात कारावासात होते. भारत स्वतंत्र होण्यासाठीची त्यांची इच्छाशक्ती अगाध होती. ते वेश पालटून कारावासातून बाहेर पडले. जर्मनीमध्ये जाऊन हिटलरला भेटले. सुभाषचंद्र एकटे असून त्यांनी त्यांना सहकार्य दर्शवले. नंतर ते जपानमध्ये गेले. तेथेही त्यांना सहकार्य मिळाले. तेव्हा जपानमध्ये भारतीय सैनिक बंदिस्त होते. तेथील सरकारने सुभाषचंद्रजींना सांगितले की, येथील भारतीय बंदीवान सैनिकांना तुम्ही विचारून पहा, ते तुमच्यासमवेत येतात का ? तेव्हा सुभाषजींनी त्या सैनिकांसमोर असे भाषण केले की, सर्वजण भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास सिद्ध झाले. सैनिकांनी ‘अशा प्रकाराने कारावासात रहाण्यापेक्षा भारतासाठी मेलेले काय वाईट आहे !’ असे ठरवले. अशा प्रकारे ‘आझाद हिंद सेने’च्या माध्यमातून त्यांनी कर्तृत्व दाखवले. त्यांनी मोठा प्रदेश जिंकला; पण भगवंताच्या दृष्टीने काळ अनुकूल नसल्याने त्यांचा एका दुर्घटनेत अंत झाला. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

एकट्या सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये भगवंताने अमोघ चैतन्यशक्ती निर्माण केल्यामुळे जर्मनी आणि जपान यांनी त्यांना साहाय्य केले, म्हणजे ‘तुमच्यामध्ये स्फुलिंंग निर्माण झाल्यावर सर्व जग पालटू शकते, तुम्हाला साहाय्य करू शकते; मात्र ते निर्माण होणे महत्त्वाचे आहे’, हे सुभाषचंद्र बोस यांनी दाखवून दिले.

एकट्यामध्ये एवढे सामर्थ्य येऊ शकते, तर सर्व भारतियांमध्ये ते आले, तर केवढे मोठे कार्य होईल ? यासाठी आपण जिवंत आहोत, म्हणजे स्वतंत्र आहोत. आपल्याला मिळालेली संधी म्हणजे चैतन्याचा उपयोग अधिकतम करणे. हे खरे स्वातंत्र्य आहे. त्या दृष्टीने सिद्धता करणे, अभ्यास करणे, आत्मबळ वाढवणे, म्हणजे साधना करणे होय ! जन्म आहे, तेथे मृत्यू आहेच ! तेव्हा भगवंताने दिलेल्या जीवनाच्या कल्याणासाठी व्यष्टी आणि समष्टी यांसाठी त्याने दिलेल्या चैतन्याचा अधिकतम उपयोग करून घेणे, हे खरे स्वातंत्र्य आहे.

९ आ. सुभाषचंद्र बोस यांच्या माध्यमातून ईश्‍वरानेच कार्य करवून घेतले ! : एकट्या सुभाषचंद्र बोस यांनी करून दाखवले. ते कारागृहात होते. त्यांच्यात किती अगम्य शक्ती होती, हे दिसून येते, हे सर्व आश्‍चर्यजनक आहे. तो ईश्‍वरच होता; कारण ईश्‍वरी कार्य ईश्‍वरच करू शकतो; पण त्यांना कोणी पुढे आणत नाही. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह सुभाषचंद्र बोस यांना पुढे आणणे महत्त्वाचे आहे’, असे मला वाटते. सुभाषचंद्र बोस ही एक प्रेरणादायक शक्ती आहे.

९ इ. भगवंत अवतार घेतो, यामागील भगवंताचे नियोजन जाणा ! : असे सर्व असतांना सुभाषचंद्र बोस यांना भगवंताने जिवंत का ठेवले नाही ? हा प्रश्‍न आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांना पुढे आणून कार्य करू दिले नाही. हाही प्रश्‍न आहे. ‘भगवंताच्या नियोजनानुसारच सर्व होत आहे आणि होणार आहे’, हे लक्षात येते. अवतार कार्य होण्यासाठी अधिकाधिक पापकर्म व्हावे लागते, अतिशय वाईट परिस्थिती यावी लागते, अतिरेक व्हावा लागतो. तेव्हाच भगवंताला अवतार घ्यावा लागतो. यासाठी काळाला किती महत्त्व आहे, हे दिसून येते.

१०. वैदिक सामर्थ्य असूनही हिंदू हीनदीन म्हणून जगत असणे !

करणारा भगवंत तर समर्थ आहेच ! संत ज्ञानेश्‍वरांनी म्हटले आहे, ‘ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या ॥ जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ।’, म्हणजे ‘वेदांनी ज्याची महती वर्णिली आहे, तो आद्य आणि स्वसंवेद्य (ज्याची अनुभूती घेता येते, असा) असा भगवंत आत्मरूपच आहे. आपल्याला केवढे स्वातंत्र्य दिलेले आहे, केवढी शक्ती दिलेली आहे, तरीही भारतातील जनता वैदिक सामर्थ्य असूनही ती हीनदीन म्हणून जगत आहे, याचे आश्‍चर्य वाटते.

११. शरीर आणि सृष्टी हे साधना करण्यासाठीचे साधन !

आपल्याला भगवंताने आत्मशक्ती दिलेली आहे. कार्य करण्यासाठी कारण पाहिजे. आपल्याला सृष्टीतील परिस्थिती हे कारण दिलेले आहे. खेळ खेळण्यासाठी जसे खेळणे लागते, तसेच हे आहे. साधना करण्यासाठी साधन पाहिजे, त्यासाठी शरीर आणि सृष्टी हे साधन आहे. आपल्याला खरे स्वातंत्र्य म्हणजे काय, हे भगवंतांनी सांगितले. यापेक्षा आपल्याला काय पाहिजे ? म्हणूनच भगवंत म्हणतात, ‘परित्राणाय साधूनाम् । विनाशाय च दुष्कृताम् ।’, म्हणजे ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश.’

१२. भारतातील अधिकतम जनता आध्यात्मिक ज्ञानातील सामर्थ्य जाणून घेण्यात अज्ञानी !

फाळणी झाली, ते बरे झाले ! भारताला स्वातंत्र्य मिळाले. असे असतांनाही राज्यकर्ते अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत आहेत. स्वातंत्र्याचा उपयोग करून घेत नाहीत. यावरून भारतातील अधिकतम जनता आध्यात्मिक ज्ञानातील सामर्थ्य जाणून घेण्याविषयी किती अज्ञानी आहे, हे दिसून येते.

१३. धर्माचरण नसल्यामुळे ईश्‍वरी सामर्थ्याचे दर्शन होत नाही !

बहुमताने निवडून येऊनही राज्यकर्ते दिलेली आश्‍वासने पाळू शकत नाहीत. अशांचा लोकशाहीसाठी काय उपयोग आहे ? यावरून धर्माचरण नसल्यामुळे ईश्‍वरी सामर्थ्याचे, म्हणजेच चैतन्याचे दर्शन कुठेच होतांना दिसत नाही. असे केल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

१४. नेहरू आणि गांधी यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणणे हास्यास्पद !

झाड तोडतांना आपण आरंभी कुर्‍हाडीने घाव मारतो आणि शेवटी हाताने धक्का देऊन झाड पाडले जाते. शेवटचा धक्का यशस्वी होऊन झाड पडते. यावरून शेवटच्या धक्क्याचा पहिला क्रमांक आहे का ? नेहरू आणि गांधी यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणणे म्हणजे ‘हाताच्या शेवटच्या धक्क्याने झाड पडले’, असे म्हणण्यासारखे होईल. म्हणजेच ते हास्यास्पद होईल.

जीवनामध्ये आपण जो कर्ता-धर्ता भगवंत आहे, त्याला विसरून कार्य करतो, हे किती हास्यास्पद आहे ? रडावे कि हसावे, हेच कळत नाही. ‘रडण्यास्पद’ हा शब्द नाही, तर ‘हास्यास्पद’ हा शब्द आहे; म्हणून हसावे, असे वाटते !

१५.  प्रत्येक शब्दातून भगवंतच दिसला पाहिजे !

वरील लिखाणावरून स्वातंत्र्य म्हणजे काय, हे स्पष्ट होते; मात्र स्वातंत्र्य हे सगुणातून झाले; म्हणून त्यात शक्ती येत नाही. प्रत्येक शब्दातून भगवंतच दिसला पाहिजे. ‘ईश्‍वराचेच राज्य चालू आहे’, असे वाटले पाहिजे. हिंदु राष्ट्र येणार आहे, असे नसून ते पूर्वीपासून चालूच आहे. तुम्ही हिंदु राष्ट्र करणार; म्हणून येणार नाही, तर ते चालूच आहे. ते फक्त उघड करायचे आहे.

‘मला जिवंत व्हायचंय, मी जिवंत झाल्यावर काम करीन’, असे म्हटल्यावर कसे वाटते ? प्रत्यक्षात तू जिवंत आहेसच ! तसेच हिंदु राष्ट्र चालू आहे. ‘हिंदु राष्ट्र आल्यावर मी कार्य करीन’, असे म्हणण्यासारखे ते झाले. यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आठवले हे आवरण काढण्याला महत्त्व देतात. आवरण काढले की, चैतन्य आहेच, म्हणजे हिंदु राष्ट्र आहेच ! आत्म्यावरील आवरण निघून गेल्यामुळे खरे स्वातंत्र्याचे कार्य चालू होईल. ‘स्व’ म्हणजे आत्मा ! म्हणजे सत्ययुगाप्रमाणे कार्य चालू होईल ! हेच खरे स्वातंत्र्य होय !

१६. सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये प्रत्यक्ष सत्ययुग कार्यान्वित आहे !

आज अशा प्रकारची स्थिती सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये प्रत्यक्ष कार्यान्वित आहे. ती पुढे ‘कृण्वन्तो विश्‍वमार्यम् ।’, म्हणजे ‘संपूर्ण विश्‍व आर्य, म्हणजे सुसंस्कृत होणार असून’ वर्ष २०२३ नंतर ती दृगोचर होणार आहे !’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.८.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now