तुघलकी निर्णय !

संपादकीय

केरळमधील कट्टनाड येथील कोची विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी ८ फेब्रुवारीला सरस्वतीपूजन करता यावे, यासाठी अनुमती मागितली होती; मात्र ‘विद्यापीठ परिसर हा धर्मनिरपेक्ष असून विद्यापिठाच्या आवारात कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला बंदी आहे’, असा निर्णय देत पूजेची अनुमती विद्यापिठाने नाकारली. गेल्या वर्षी ही पूजा करण्यात आली होती. मग ‘आताच ही बंदी का ?’, ते मात्र विद्यापिठाने स्पष्ट केलेले नाही. मध्यंतरी बंगालमधील हावडा जिल्ह्यातील तेहत्ता येथील सरकारी विद्यालयात वसंतपंचमीच्या दिवशी ६०-६५ वर्षांपासून केल्या जाणार्‍या सरस्वतीपूजनाला शाळा व्यवस्थापनाने बंदी घातली. यामागील कारण म्हणजे त्याला होणारा स्थानिक धर्मांधांचा विरोध ! या निर्णयाच्या विरोधात हिंदु विद्यार्थी आणि गावकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग ६ रोखून धरला; मात्र त्यांच्या धर्मभावनांची नोंद न घेता पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष लाठीमार केला. यात विद्यार्थी-विद्यार्थिनी गंभीर घायाळ झाल्या. पनवेल येथील पंचायत समितीनेही काही मासांपूर्वी देवतांची, तसेच श्री सत्यनारायण पूजा यांवर बंदी घालण्याचा आदेश परिपत्रकाद्वारे काढला होता.

काही वर्षांपूर्वी वसंतपंचमीच्या दिवशी श्री सरस्वतीदेवीची पूजा करणार्‍या सहस्रो हिंदु भाविकांवर मध्यप्रदेशच्या भाजप सरकारने अमानुष लाठीमार केला होता. त्यात अनेक जण घायाळ झाले, तर काही जणांना कारागृहातही डांबण्यात आले. धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेतील श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भातही ख्रिस्ताब्द १३०५ पासून ते अगदी आतापर्यंत विटंबनेच्या घटना घडल्या. यात मूर्तीची चोरी झाली, तसेच मूर्तीला कारागृहातही डांबण्यात आले. श्री सरस्वतीदेवीच्या सहस्रो भक्तांनी तत्कालीन हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार आणि पोलीस यांच्याकडून झालेली अमानुष मारहाणही सहन केली. हिंदूबहुल भारतात घडणार्‍या घटना आणि सरस्वतीभक्तांवर झालेला अन्याय संतापजनकच म्हणावे लागतील. ही एकप्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावनांशी केलेली प्रतारणाच आहे. सरस्वतीदेवतेचे ज्ञानमंदिर असणार्‍या शाळा किंवा विद्यापिठे येथे तिचे पूजन होऊ नये ? याहून दुसरे दुर्दैव कुठले ?

विद्यामंदिरात सरस्वतीपूजन हवेच !

सरस्वती ही विद्येची देवता आहे. तिच्या हातातील पुस्तक आणि माळा ती ज्ञान अन् भाव यांचे प्रतीक असल्याचे दर्शवतात. तिच्या चार भुजा म्हणजे चार दिशांची प्रतीके असून विद्येमुळे मनुष्याची दृष्टी चौफेर होते. हीच दृष्टी मनुष्याला ज्ञानसमृद्ध होण्यासाठी साहाय्य करते. ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांनाही सरस्वतीदेवी वंदनीय आहे. हिंदूंच्या देवता चैतन्याचा स्रोत आहेत. श्री सरस्वतीदेवीची हिंदु धर्मातच सांगितलेली महानता लक्षात न घेता विद्यापिठात देवीच्या पूजनाला नाकारले जाणे म्हणजे एकप्रकारे विद्येला स्वतःहूनच लाथाडल्यासारखे आणि विद्यार्थ्यांना चैतन्यापासून दूर करण्यासारखेच आहे. अशाने विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य साधले जाईल का ? विद्यार्थ्यांवर विद्यालंकार कधीतरी शोभून दिसेल का ? पूजेला नाकारणार्‍यांनी याचीही उत्तरे द्यायला हवीत. खरे पहाता चैतन्यशक्तीमुळे आपण जिवंत आहोत. देवतांच्या पूजनाने मनुष्याला चैतन्य मिळते. यामुळे मानसिक स्थैर्यासह सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहही मिळतो. धर्मशिक्षणाअभावीच विद्यार्थ्यांवर देवीपूजनाचा संस्कार न करण्याची दुर्बुद्धी होत आहे, असेच म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या वाटचालीत आवश्यक असणार्‍या गोष्टीपासूनच ‘धर्मनिरपेक्षते’मुळे त्यांना वंचित केले जात आहे. देवीच्या पूजनाकडे केवळ ‘धर्मनिरपेक्षते’च्या चष्म्यातून न पहाता ‘विद्यार्थ्यांचा खर्‍या अर्थाने विकास साधण्यासाठी धर्म काय सांगतो’, हेही अभ्यासणे आवश्यक ठरेल.

‘धर्मनिरपेक्षते’चा पुळका !

सध्या पुरो(अधो)गामी मंडळी किंवा साम्यवादी यांच्याकडून सरस्वतीपूजनाला ‘धर्मनिरपेक्ष’ किंवा ‘राज्यघटनाविरोधी’ यांच्या कक्षेत बसवले जाते. ‘धर्मनिरपेक्षते’चा एवढाच पुळका येत असेल, तर केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण का केले जाते ?  निधर्मी पोलिसांच्या वतीने पोलीस ठाण्यात ‘इफ्तार पार्टी’चे आयोजन का करण्यात येते ? सर्व मंदिरांसाठी एकच कायदा असतांना केरळमध्ये मात्र मंदिर व्यवस्थापनासाठी ४ वेगवेगळे कायदे आहेत. हा मंदिर सरकारीकरणाचाच परिणाम आहे. प्रत्येक वेळी हिंदूंना लावले जाणारे ‘धर्मनिरपेक्षते’चे ‘लेबल’ मुसलमान आणि ख्रिस्ती पंथियांना कधीच लावले जात नाही. ना त्यांच्या सण-उत्सवांत बाधा आणली जाते, ना त्यांच्या प्रथा-परंपरा झुगारल्या जातात ! मुसलमान त्यांची वेळ झाल्यावर कुठेही मग अगदी शाळा-महाविद्यालयांत असले, तरी वह्या-पुस्तके बंद करून प्रथम नमाज पढतात. रस्त्यावर असणारा मुसलमानही नमाजालाच प्राधान्य देतो. ख्रिस्तीही उघडउघडपणे त्यांच्या पंथाचा प्रसार करतात. पनवेल येथील ख्रिस्त्यांच्या शाळेत तर अर्धा घंटा येशूची प्रार्थना चालते. काही शाळांमध्ये मुलांना बायबल वाचायला दिले जाते. अशांना कोणी विरोध करत नाही; कारण अन्य पंथियांच्या धर्मपरंपरांवर आघात केल्यास त्याची परिणती काय होईल, हे सर्वांना चांगलेच ठाऊक असते. हिंदु मात्र परमसहिष्णु ठरतो! त्यामुळे हिंदूंनीच मार खायचा असतो. हिंदूंनीच अत्याचार सहन करायचे असतात. हिंदूंनीच बळीचा बकरा व्हायचे असते. आपल्या सण-उत्सवांना तिलांजली द्यायची असते. हे आणखी कुठवर चालणार आहे ? प्रत्येक वेळी हिंदूंना दबावतंत्राच्या टाचेखाली चिरडू पहाणार्‍यांना वेळीच ठणकवायला हवे. सर्वत्रच्या हिंदूंनी व्यापक जनआंदोलन उभारल्यासच सरस्वतीपूजनाला विरोध होणार नाही. ‘येत्या १० फेब्रुवारीला असणार्‍या वसंतपंचमीच्या दिवशी सर्वत्रच्या हिंदूंचे सरस्वतीपूजन निर्विघ्नपणे पार पडू दे’, हीच सरस्वतीदेवीच्या चरणी यानिमित्ताने प्रार्थना !


Multi Language |Offline reading | PDF