‘निवडणुकीनंतर मंदिराचे पाहू’, असे म्हणणे म्हणजे शरयूत रक्त सांडलेल्यांचेे बलीदान नाकारण्यासारखे ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

निवडणुकीच्या तोंडावर राममंदिर स्थापनेच्या सूत्राला बगल देणार्‍यांना समस्त धर्मप्रेमींनी याविषयी जाब विचारायला हवा !

मुंबई, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – विश्‍व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी मंदिराचा विषय टाळावा, ही त्यांची हतबलता असेल किंवा अंतर्गत गोष्ट असेल. कोलकाता येथे अमित शहा यांची रथयात्रा रोखली; म्हणून तेथे हिंदुत्वाचा हुंकार दिला जातोे; मात्र अयोध्येतील राममंदिराचा विषय कुलूपबंद केला जात आहे. ‘निवडणुकीनंतर मंदिराचे पाहू’, असे बोलणे म्हणजे शरयूत रक्त सांडून ज्यांनी बलीदान दिले, ते नाकारण्यासारखे आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी ८ फेब्रुवारीच्या ‘दैनिक सामना’मधील अग्रलेखाद्वारे केले आहे. प्रारंभी राममंदिराच्या सूत्रावर ठाम असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्‍व हिंदु परिषद यांनी धर्मसंसदेत राममंदिराविषयी घेतलेल्या बोटचेप्या भूमिकेवर या अग्रलेखातून ताशेरे ओढण्यात आले आहेत.

या अग्रलेखात म्हटले आहे की,

१. ‘केंद्रात कुणाचेही सरकार असो, लोकसभा निवडणुकीनंतर संघ राममंदिर उभारणीस प्रारंभ करेल’, असे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी घोषित केले. विश्‍व हिंदु परिषदेनेही हीच भूमिका मांडली. याचा अर्थ असा की, राममंदिराचा विषय हिंदुत्वनिष्ठ संघटनांनीच गुंडाळून ठेवला आहे. वर्ष २०१९ च्या निवडणुकीत राममंदिर हे सूत्र मोदी परिवारासाठी अडचणीचे ठरू नये, यासाठी संघ परिवाराने ही भूमिका घेतली आहे काय ?

२. मोदी सरकारने वर्ष २०१९ च्या आधी अध्यादेश काढून अयोध्येत राममंदिर उभारणी चालू करावी, अशी श्री. मोहनराव भागवत आणि विश्‍व हिंदु परिषद यांची मागणी होती. धर्मसंसदेचा दबाव असाही होता की, मंदिर उभारणीची तारीख सांगा. त्यासाठी त्यांनी  देशभरात हुंकार सभांचे प्रयोजन केले. विशेषकरून आम्ही अयोध्येत जाऊन येताच या धर्मसभा आणि हुंकारसभा यांचा जोर वाढला.

३. शतप्रतिशत श्रेय तुम्हीच घ्या; पण एकदाचा प्रभू श्रीराम यांचा वनवास संपवा. वर्ष २०१९ च्या निवडणुकीत श्रीराम मंदिराचा विषय शिल्लक रहाता कामा नये, ही आमची भूमिका होती.

४. आपण शिखरावर विराजमान झालो आहोत, ते श्रीराम मंदिराचे राजकारण केल्यामुळेच. त्यामुळे ‘आता राजकारण नको’, हा नवीन जुमला काय आहे ?

५. वर्ष २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळेल, असे वाटत नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नितीश कुमार, रामविलास पासवान यांची राममंदिराविषयीची भूमिका नेमकी काय ? त्यांना राममंदिर हवे कि नको ? हे आताच समजून घेतले पाहिजे. हे दोन्ही नेते ‘बाबरीवादी’ आहेत. पासवान यांनी मंदिरप्रश्‍नी सतत विरोधी भूमिका घेतली म्हणूनच आज भाजपकडे बहुमत आहे. तेव्हा आजच हा विषय धसास लावा, ही आमची मागणी आहे.


Multi Language |Offline reading | PDF