डाबरा (मध्यप्रदेश) येथील ‘राजनैतिक मर्म’ या मासिकाचे संपादक श्री. मनोज चतुर्वेदी यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची घेतलेली मुलाखत !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

सप्टेंबर २०१८ मध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देहली येथे ‘उत्तर भारत हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते. त्या संदर्भात डाबरा (मध्यप्रदेश) येथील ‘राजनैतिक मर्म’ या मासिकाचे संपादक श्री. मनोज चतुर्वेदी यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत घेतली आणि ती ‘राजनैतिक मर्म’ या मासिकात प्रसिद्ध केली. या मुलाखतीत श्री. मनोज चतुर्वेदी  यांनी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना विचारलेले प्रश्‍न आणि त्यांची सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी दिलेली उत्तरे पुढे दिली आहेत.

श्री. मनोज चतुर्वेदी

‘उत्तर भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांना हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या हेतूने संघटित करणे’, हा देहलीत आयोजित केलेल्या ‘उत्तर भारत हिंदू अधिवेशना’चा मुख्य उद्देश असणे

श्री. मनोज चतुर्वेदी : हिंदु जनजागृती समितीने राजधानी देहलीत आयोजित केलेल्या ‘उत्तर भारत हिंदू अधिवेशना’चा मुख्य उद्देश काय होता ?

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे : हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, देहली, पश्‍चिमी उत्तरप्रदेश, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांना हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या हेतूने संघटित करण्यासाठी सप्टेंबर २०१८ मध्ये आम्ही देहली येथे ‘उत्तर भारत हिंदू अधिवेशना’चे आयोजन केले होते.

सरकारने अयोध्येत प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कायदा पारित करावा !

श्री. मनोज चतुर्वेदी : श्रीराम मंदिराच्या निर्माणाच्या विषयाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पहाता ?

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे : ‘अयोध्याभूमी हे प्रभु श्रीरामाचे जन्मस्थान आहे’, असे शास्त्रात सांगितले आहे. प्रभु श्रीराम हे हिंदूंचे आराध्य दैवत आहे. ‘या विश्‍वात आतापर्यंत होऊन गेलेल्या राज्यव्यवस्थांमध्ये ‘रामराज्य’ ही आदर्श राज्यव्यवस्था म्हणून गणली जाते. ‘अशा महान साम्राज्याचे प्रतीक आणि हिंदूंच्या आराध्य देवतेच्या अवताराची जन्मभूमी’, या दृष्टीने अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारायला हवेे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर खरेतर सरकारने काशी, अयोध्या आणि मथुरा, ही हिंदूंची पवित्र स्थाने अहिंदूंच्या अतिक्रमणांपासून मुक्त करणे आवश्यक होते. दुर्भाग्यवश भारतीय राजकारणामध्ये भारतात असे महान कार्य करणारा एकही सुपुत्र झाला नाही. आता सरकारने अयोध्येत प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कायदा पारित करावा.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हिंदूंच्या मागण्या आणि अपेक्षा

श्री. मनोज चतुर्वेदी : आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हिंदूंच्या मागण्या आणि अपेक्षा कोणत्या आहेत ?

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे : ‘सरकारच्या नियंत्रणात असलेल्या मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवावे, धार (मध्यप्रदेश) येथील प्राचीन सरस्वती मंदिरात हिंदूंना कायमस्वरूपी पूजा-अर्चा करण्याची अनुमती द्यावी, लंडनमध्ये असलेली श्री सरस्वतीदेवीची मूळ मूूर्ती भारतात आणून तिची भोजशाळेत विधीवत पुनर्प्रतिष्ठापना करावी, महाकालेश्‍वर मंदिर परिक्षेत्रातील मांस विक्रीची दुकाने त्वरित हटवावीत, मध्यप्रदेशातील इंदौर येथील खजराना क्षेत्रात अवैधरित्या होत असलेले अतिक्रमण आणि अनैतिक हालचाली यांवर त्वरित प्रतिबंध घालावेत, विस्थापित बांगलादेशी हिंदूंना संरक्षण द्यावे’, या मध्यप्रदेशातील हिंदूंच्या सामान्य मागण्या आहेत.

‘केंद्रशासनाने समान नागरी कायदा, धर्मांतरण प्रतिबंधक कायदा, गोहत्या प्रतिबंधक कायदा, तसेच रामजन्मभूमीत राममंदिराचे निर्माणकार्य होण्यासाठी त्वरित कायदा पारित करावा’, अशी जनतेची सामान्य अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त काही प्रयत्न संवैधानिक स्तरावर करण्याची आवश्यकता आहे. ‘भारतीय राज्यघटनेचे परिच्छेद २६ ते परिच्छेद ३०, यांत अल्पसंख्यांकांना संवैधानिक संरक्षण दिले गेले आहे. त्याच प्रकारे बहुसंख्य समाजालाही संवैधानिक संरक्षण मिळायला पाहिजे’, हेच समान नागरी कायद्याच्या (Law of Equalityच्या) दृष्टीने योग्य आहे. हिंदु राष्ट्र स्थापन होण्याच्या दृष्टीने भारतीय राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ (सेक्युलर) हा निरर्थक शब्द काढून त्या ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द अंतर्भूत करायला हवा. परिच्छेद ३६८ च्या अंतर्गत हा पालट करू शकतो.

राजकीय शक्ती काश्मिरी हिंदूंंच्या पुनर्वसनाविषयी संवेदनशील झाल्यावरच काश्मिरी पंडितांचा प्रश्‍न सुटू शकतो !

श्री. मनोज चतुर्वेदी : ‘काश्मिरी पंडितांची समस्या कधीपर्यंत सुटेल ?’, असे आपल्याला वाटते ?

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे : राजकीय शक्ती काश्मिरी हिंदूंंच्या पुनर्वसनाविषयी संवेदनशील झाल्यावरच काश्मिरी पंडितांचा प्रश्‍न सुटू शकतो. मागील २८ वर्षांत सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षांनी याविषयी कोणतीच निर्णायक पावले उचलली नाहीत.

सरकारने भ्रष्टाचाराच्या विरोधात दंडात्मक कारवाई करावी आणि आरक्षणामुळे निर्माण झालेली जातीय असंतुष्टता दूर करण्यासाठी उपाययोजना करावी !

श्री. मनोज चतुर्वेदी : ‘आगामी निवडणुकीत इतर पक्षांनी अपलाभ घ्यायला नको’, यासाठी काय करायला हवे ?

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे : सर्वच क्षेत्रांत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी. अनुसूचित जाती आणि जमाती यांना आरक्षण दिल्यामुळे निर्माण झालेली जातीय असंतुष्टता दूर करण्यासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी.

‘हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, या मागणीसाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलन करणे’, हे आगामी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे स्वरूप असणे आणि सर्व पत्रकारांसाठी अधिवेशनाची माहिती देणारे प्रसिद्धीपत्रक अधिवेशनाच्या कालावधीत प्रतिदिन प्रसिद्ध केले जाणे

श्री. मनोज चतुर्वेदी : गोव्यात होणार्‍या आगामी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे स्वरूप कसे असेल आणि त्यामध्ये पत्रकारांचा सहभाग कसा असेल ?

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे : ‘हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, या मागणीसाठी राष्ट्रव्यापी जनआंदोलन करणे’, हेच पुढील वर्षी गोवा येथे होणार्‍या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे स्वरूप असेल.

या अधिवेशनात निरनिराळ्या क्षेत्रांत कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ, तसेच धर्मनिष्ठ आणि देशभक्त पत्रकार संघटनाही सहभागी होतात. सर्व पत्रकारांसाठी अधिवेशनाची माहिती देणारे प्रसिद्धीपत्रक अधिवेशनाच्या कालावधीत प्रतिदिन प्रसिद्ध केले जाते. अधिवेशनाची वार्ता घेण्यासाठी देश-विदेशांतील पत्रकार गोव्यात येतात.

‘पत्रकारांनी निष्पक्षपातीपणे राजकीय चर्चा करावी आणि न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांवर कोणत्याही परिस्थितीत ‘मीडिया ट्रायल’ करू नये’, अशी अपेक्षा आहे !

श्री. मनोज चतुर्वेदी : सध्याच्या पत्रकारितेकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता ?

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे : प्रसारमाध्यमांनी (Mainstream Media ने) राष्ट्र आणि धर्म यांवर प्रतिदिन होत असलेल्या आघातांवर चर्चा करणे अपेक्षित आहे; परंतु ही माध्यमे राजकारण अन् मनोरंजन या विषयांवरील वार्तांचे प्रसारण करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ‘सोशल मीडिया’ला महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘पत्रकारांनी निष्पक्षपातीपणे राजकीय चर्चा करावी आणि न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांवर कोणत्याही परिस्थितीत ‘मीडिया ट्रायल’ करू नये’, एवढीच रास्त अपेक्षा आहे.

नेपाळमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना आयोजित करत असलेल्या कार्यक्रमांमध्ये समितीच्या कार्यकर्त्यांनी सहभागी होणे, त्यांनी तेथे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे महत्त्व सांगणे आणि अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात समितीने ‘नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करावे’, यासाठी प्रस्ताव संमत करणे

श्री. मनोज चतुर्वेदी : नेपाळमध्ये हिंदूंचे संघटन मजबूत होण्यासाठी हिंदु जनजागृती समिती कोणते प्रयत्न करत आहे ?

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे : नेपाळमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना आयोजित करत असलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये समितीचे कार्यकर्ते सहभागी होतात आणि उपस्थितांना हिंदु राष्ट्र-स्थापनेचे महत्त्व सांगतात. प्रतिवर्षी गोवा येथे होणार्‍या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात नेपाळमधील राष्ट्रीय स्तरावरील हिंदू संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतात. समितीने अधिवेशनांमध्ये ‘नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करावे’, यासाठी प्रस्ताव संमत केले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF