भाग्यनगर येथील श्री. प्रसन्ना आणि सौ. तेजस्वी वेंकटापुर यांनी बाळाच्या (६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि. बलरामच्या) जन्मापूर्वी आणि जन्मानंतर अनुभवलेली गुरुदेवांची कृपा !

चि. बलराम वेंकटापुर

१. बाळाच्या जन्मापूर्वी

१ अ. पत्नीला गर्भारपणाच्या ७ व्या मासात अकस्मात पोटात वेदना होऊ लागणे, आधुनिक वैद्यांनी प्रसुती होईपर्यंत तिला विश्रांती घेण्यास सांगणे आणि वेदना न्यून होण्यासाठी तिला इंजेक्शने अन् औषधे देण्यात येणे : ‘माझ्या पत्नीला (सौ. तेजस्वीला) गर्भारपणाच्या ७ व्या मासात एक दिवस अकस्मात पोटात वेदना होऊ लागल्याने तिला स्थानिक रुग्णालयात भरती करावे लागले. आधुनिक वैद्यांनी ‘स्कॅनिंग’ केल्यानंतर सांगितले, ‘‘बाळाचे डोके खालच्या बाजूला आहे आणि ते बाहेर येऊ पहात आहे. गर्भाशयाचे मुख उघडले जात आहे. यासाठी प्रसुती होईपर्यंत त्यांना विश्रांती (बेड रेस्ट) घ्यावी लागेल.’’ पत्नीला होत असलेल्या वेदना न्यून होण्यासाठी तिला २ दिवस इंजेक्शने आणि गर्भ फिरण्यासाठी औषधे देण्यात आली होती.

१ आ. पत्नीला रुग्णालयात भरती केल्यावर आलेल्या अनुभूती

१ आ १. दैनिक सनातन प्रभातने पत्नीवरील आवरण काढत असतांना स्वतःवर उपाय होत असल्याचे जाणवणे : मी पत्नीच्या पोटावर दैनिक सनातन प्रभातचा अंक ठेवला होता. खोलीत संत भक्तराज महाराज यांची भजने लावून ठेवली होती. मी अधूनमधून दैनिक सनातन प्रभातने तिच्यावरील आवरण काढत होतो. मी असे करतांना ‘माझ्यावर उपाय होत आहेत’, असे मला जाणवत असे.

१ आ २. एकदा तेजस्वीला जाणवले, ‘चैतन्याच्या एका गोळ्यात श्रीकृष्ण ध्यानाची मुद्रा करून गर्भावर विराजमान झाला आहे.’

१ आ ३. एकदा ‘संत भक्तराज महाराज खोलीत येऊन हातातील काठी गर्भावरून फिरवत आहेत’, असे तिला जाणवले.

१ आ ४. आधुनिक वैद्यांनी ‘गर्भपात होण्याची शक्यता आहे आणि बाळाला वाचवणे अवघड आहे’, असे सांगितल्यावर काळजी वाटणे अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी बोलल्यावर धीर येणे : २९.९.२०१७ च्या रात्री पत्नीच्या गर्भाशयातून थोडे थोडे पाणी बाहेर येऊ लागले. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘गर्भपात होण्याची ९० टक्के शक्यता आहे. बाळाला वाचवणे अवघड आहे. आता प्रसुती करावीच लागेल.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला काळजी वाटू लागली. ‘बाळाला वाचवू शकत नसलो, तरी पत्नीला तरी वाचवणे आवश्यक आहे’, असे मला वाटू लागले. त्या रात्री सद्गुरु बिंदाताईंना (सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना) याविषयी सांगितल्यावर त्या आम्हाला धीर देत म्हणाल्या, ‘‘भिऊ नका. ‘ईश्‍वराची इच्छा’, असे समजून दोघांनी पुढचे उपचार करा.’’ त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला धीर आला.

१ आ ५. ‘बाळाला वाचवण्याची ईश्‍वराची इच्छा असेल, तर तो त्याला कसेही वाचवेल आणि त्याची इच्छा नसेल, तर आपण काहीच करू शकत नाही’, असे वाटणे अन् देवाला ‘प्रारब्ध भोगण्यासाठी शक्ती द्या’, अशी प्रार्थना करणे : आम्ही यापूर्वी दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘काही साधकांच्या वैयक्तिक जीवनात आलेल्या अडचणी आणि त्यावर त्यांनी कसे प्रयत्न केले ?’, याविषयी वाचले होते; मात्र आमच्या जीवनात तशी स्थिती आल्यावर त्याचे गांभीर्य आमच्या लक्षात आले. सद्गुरु ताईंशी बोलल्यानंतर मला वाटले, ‘मला ईश्‍वराची इच्छा ठाऊक नाही. त्याची बाळाला वाचवण्याची इच्छा असेल, तर तो त्याला कसेही वाचवेल आणि त्याची इच्छा नसेल, तर आपण काहीच करू शकत नाही.’ नंतर आम्ही दोघेही प्रार्थना करू लागलो. तेजस्वीला वाटले, ‘आता आपण काहीच करू शकत नाही. बाळाला वाचवू शकत नाही.’ तेव्हा आम्ही देवाला ‘प्रारब्ध भोगण्यासाठी शक्ती दे’, अशी प्रार्थना केली. थोड्या वेळानंतर मी शांत झालो.

१ आ ६. शासकीय कर्मचार्‍यांनी नियम डावलून शासकीय रुग्णवाहिकेने खासगी रुग्णालयात नेणे आणि त्या वेळी ‘जवळ पैसे आहेत कि नाहीत ?’, याचेही भान नसणे : ३०.९.२०१७ या दिवशी सकाळी आधुनिक वैद्यांनी तेजस्वीची प्रसुती दुसर्‍या रुग्णालयात करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका बोलावली. आम्ही खासगी रुग्णालयात जाण्याचा विचार करत होतो. शासकीय रुग्णवाहिका असल्यामुळे खासगी रुग्णालयात सोडण्यासाठी कर्मचार्‍यांनी प्रथम नकार दिला. नंतर प्रार्थना करून आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी होकार दिला. तेव्हा ‘माझ्याजवळ पैसे आहेत कि नाही ?’, याचेही मला भान नव्हते. माझ्या मनात केवळ एकच विचार होता, ‘तेजस्वी आणि नवजात बालक यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन जायचे आहे.’ तेजस्वीच्या वडिलांशी भ्रमणभाषवर बोलल्यावर माझ्या मनात पैशासंबंधी विचार आला. तिच्या वडिलांनी पुढचा व्यय केला.

२. बाळाच्या जन्मानंतर

२ अ. आधुनिक वैद्यांनी ‘महागड्या औषधांचा उपयोग करावा लागेल’, असे सांगणे; मात्र परात्पर गुरुदेवांच्या कृपेने त्याची आवश्यकता न भासणे : जन्मानंतर बाळाचे वजन ७०० ग्रॅम होते. ‘बाळाच्या फुप्फुसांची वाढ झाली नसल्यास महागड्या औषधांचा उपयोग करावा लागेल’, असे सांगून आधुनिक वैद्यांनी त्यासाठी आमची अनुमती घेतली. ‘त्या औषधांचे मूल्य किती होईल ?’, हे मी त्यांना विचारले नाही. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने औषधांचा उपयोग करण्याची आवश्यकताच भासली नाही. त्या एका औषधाचे मूल्य ८० सहस्र रुपये इतके होते. आधुनिक वैद्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘बाळ स्वतःहून श्‍वास घेऊ शकत आहे. यामुळे त्याला महागडे औषध देण्याची आवश्यकता भासली नाही.’’

२ आ. बाळाला होणार्‍या त्रासांविषयी सांगितल्यावरही सकारात्मक राहिल्याने आधुनिक वैद्यांनी पत्नीचे कौतुक करणे : एकदा तेजस्वीला पाहून आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘बाळाला होणारे त्रास सांगितल्यावरही (हिमोग्लोबिन अल्प होणे, दूध न पचणेे) ताण न घेता सकारात्मक रहाणारी आई मी प्रथमच पहात आहे.’’ त्यांनी तेजस्वीला रुग्णालयात असणार्‍या अन्य बालकांच्या मातांशी बोलायला सांगितले. तेजस्वीने त्यांना दत्ताचा जप करायला सांगितला. परात्पर गुरुदेवांनी साधना शिकवल्यामुळे हे करणे साध्य झाले. आधुनिक वैद्यांनी केलेले कौतुक ऐकून ‘गुरुदेवांनीच कौतुक केले’, असे आम्हाला वाटले.’

– श्री. प्रसन्ना वेंकटापुर (वडील), भाग्यनगर, आंध्रप्रदेश.

२ इ. चि. बलराम ७८ दिवस रुग्णालयात असतांना साधकांनी प्रतिदिन रुग्णालयात जाणे, रुग्णालयातील कर्मचारी आणि रखवालदार यांना साधकांकडे पाहून वेगळेपणा जाणवणे, त्यांनी बाळासाठी प्रार्थना करणे अन् साधकांनी कर्मचार्‍यांना नामजप करायला सांगणे : ‘आमचा मुलगा चि. बलराम ७८ दिवस रुग्णालयात होता. आम्ही प्रतिदिन रुग्णालयात जात होतो. रुग्णालयातील कर्मचारी आणि रखवालदार आम्हाला प्रतिदिन पहात होते. त्यांना आम्हाला पाहून काहीतरी वेगळे जाणवायचे. त्यांनी ‘यांचा जो कुणी रुग्णाईत आहे, तो लवकर बरा होऊ दे’, अशी प्रार्थना केली. तेथील काही कर्मचार्‍यांना साधनेची आवड होती. त्यांना आम्ही कुलदेवता आणि दत्त यांचा जप करायला सांगितला. आमच्याकडून रुग्णालयात थोडीफार सेवा घडली.

२ ई. प्रथम भाग्यनगर येथे प्रसुती करण्याचे ठरवणे आणि गोवा येथे प्रसुती झाल्याने उपचारासाठी अल्प व्यय होणे : आम्ही भाग्यनगर येथे रहातो. गोव्याच्या तुलनेत भाग्यनगर येथील रुग्णालयाचा व्यय ४ – ५ पटींनी अधिक (२५ लक्ष रुपये) आहे. आम्ही प्रथम भाग्यनगरमध्येच प्रसुती करण्याचा विचार केला होता; परंतु ईश्‍वराने आम्हाला त्याच्याजवळ बोलावून सर्व सोपे केले. रुग्णालयात असलेल्या अन्य बाळांसाठी पुष्कळ अधिक (८ ते १५ लक्ष रुपये) व्यय झाला; परंतु बलरामसाठी उपचाराचा व्यय त्यांच्या तुलनेत अल्प (५ लक्ष रुपये) झाला.

२ उ. आवश्यकता असतांना त्वरित साहाय्य मिळणे आणि ‘भगवंत स्वतःच साहाय्य करण्यासाठी आला आहे’, असे जाणवणे : बलराम रुग्णालयात आणि नंतर रामनाथी आश्रमात असतांना, तसेच आताही त्याच्या कोणत्याच सेवेत कधीच अडचण आली नाही. प्रत्येक वेळी ज्या व्यक्तीची आवश्यकता भासत असे, ती व्यक्ती समोर येऊन त्वरित साहाय्य मिळत असे. तेव्हा ‘जणूकाही भगवंत स्वतःच साहाय्य करण्यासाठी आला आहे’, असे मला जाणवत होते.

२ ऊ. चि. बलराम रुग्णालयात असतांना तेथे जातांना ‘कोणत्यातरी वेगळ्या सेवेसाठी निघालो आहोेत’, असे वाटणे : सद्गुरु बिंदाताईंनी आम्हाला रुग्णालयात जातांना ‘सेवा करण्यासाठी जात आहोत’, असा भाव ठेवायला सांगितला होता. बलरामला रुग्णालयातील ‘एन्आय्सीयू’मध्ये ७८ दिवस ठेवले होते. प्रत्येक दिवशी रामनाथी आश्रमापासून २० कि.मी. दूर असलेल्या रुग्णालयात जातांना आम्ही ‘कोणत्यातरी वेगळ्या सेवेसाठी निघालो आहोेत’, असे आम्हाला वाटत असे.

३. आधुनिक वैद्यांनी ‘तुमचे बाळ जीवित आहे’, हा एक चमत्कारच आहे’, असे म्हटल्यावर गुरुचरणी व्यक्त केलेली काव्यरूपी कृतज्ञता !

रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘तुमचे बाळ जीवित आहे’, हा एक चमत्कारच आहे.’’ आधुनिक वैद्यांचे हे उद्गार ऐकून म्हणावेसे वाटते,

सब देखे तो का होई । देखे सब न कोई ।

बिन देखे ही देखिये । वही हमरे श्रीगुरु होई ॥

भावार्थ : सर्व जण विश्‍वाला स्थुलातून पहातात; परंतु विश्‍वाची कुणी काळजी घेत नाही. श्री गुरु स्थुलातून विश्‍वाला भले ना दिसो; परंतु ते मात्र विश्‍वाची काळजी घेतात.

सर्वांची काळजी घेणार्‍या श्री गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ।’

– श्री. प्रसन्ना आणि सौ. तेजस्वी वेंकटापुर (आई-वडील), भाग्यनगर, आंध्रप्रदेश. (जानेवारी २०१९)

 


Multi Language |Offline reading | PDF