भ्रष्टाचाराला ‘अच्छे दिन’ !

संपादकीय

एखाद्या व्यक्तीने एक लाख रुपयांच्या भांडवलावर एखादा व्यवसाय चालू करावा आणि अवघ्या ६ वर्षांमध्ये ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक माया जमवावी. तेही अर्थव्यवस्थेमध्ये मंदी असतांना ! हे मेहनतीमुळे नाही, तर केवळ भ्रष्टाचार आणि पदाचा अयोग्य वापर यांमुळेच घडू शकते ! ‘देशाचे प्रथम जावई’ असा मान मिळवणारे रॉबर्ड वाड्रा यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. ही आकडेवारी विरोधकांची नाही, तर काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या नियतकालिकाच्या लेखातील आहे. वर्ष २००७ ते २०१२ या काळात माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांना व्यवसायामध्ये सहस्रो पटींनी वृद्धी होऊन ‘सोनियाचे दिवस’ आले. वर्ष २०१२ नंतर २०१९ पर्यंत या मायाजालात आणखी कितीतरी सहस्रो कोटी रुपयांची भर पडली असणार ! अत्यल्प व्याजदराने कर्ज घेऊन राजकीय वजन वापरून कवडीमोल किमतीने भूमी खरेदी केल्याप्रकरणी रॉबर्ड वाड्रा आरोपी आहेत. जर ही माया कष्टाची असती, तर ही गडगंज संपत्ती आणि ठिकठिकाणी खरेदी केलेली भूमी यांविषयी होणार्‍या आरोपांना उत्तरे मिळाली असती; पण अनेक वर्षे आरोप होऊनही या व्यक्तीने एकदाही ते उघडपणे सप्रमाण खोडून काढण्याचे कष्ट घेतले नाहीत. उलट रॉबर्ट यांच्या समर्थनार्थ काँग्रेसची फौज प्रत्येक वेळी मैदानात उतरली. आताही अंमलबजावणी संचालनालयाकडून रॉबर्ट वाड्रा यांची जी चौकशी चालू आहे, त्या प्रकरणी काँग्रेस राजकीय ढाल वापरून रॉबर्ट यांचे संरक्षण करत आहे.

रॉबर्ट वाड्रा हे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सोडा, सक्रीय कार्यकर्तेही नाहीत. त्यामुळे काँग्रेसजनांच्या लेखी त्यांची किंमत ‘भ्रष्टाचाराचे आरोप असलेली व्यक्ती’ अशीच असायला हवी. खरे काय ते समोर येण्यासाठी काँग्रेसवासियांनी मागणी करायला हवी; पण रॉबर्ट वाड्रा प्रातःस्मरणीय असल्याप्रमाणे काँग्रेसवाले त्यांचे समर्थन करत आहेत. राष्ट्रहिताशी काही घेणे-देणे नसून परिवारनिष्ठा हीच काँग्रेसजनांसाठी सर्वोच्च असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ७० वर्षांहून अधिक काळ एका घराण्याचे तळवे चाटणार्‍या काँग्रेसींकडून राष्ट्रहिताचा बळी दिला जात आहे; पण गांधी घराण्याला निष्ठा वाहिलेल्यांना त्याचे भान आहे कुठे ? काँग्रेसने देशाला कसे लुटले, याचे नव्या पिढीसमोरचे ताजे उदाहरण म्हणजे रॉबर्ट वाड्रा !

चौकशी, गदारोळ आणि विस्मरण

काँग्रेस वाईट ठरल्याने भाजप चांगली ठरत नाही, हेही या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. विरोधी पक्षामध्ये असतांना भाजपने भ्रष्टाचाराच्या सूत्रावरून काँग्रेसला सळो कि पळो करून सोडले होते; पण सत्ता प्राप्त झाल्यानंतर त्यांपैकी किती भ्रष्टाचार्‍यांना भाजपने शासन केले ? ‘चौकशी, गदारोळ आणि विस्मरण’ या सूत्रानुसार पारदर्शक कारभाराचे गणित सुटू शकत नाही. ‘चौकशी आणि दोषींवर तत्काळ कठोर कारवाई’ हेच सूत्र त्यासाठी आवश्यक असते. रॉबर्ट वाड्रा प्रकरण असो, महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा प्रकरण असो वा आदर्श घोटाळा प्रकरण असो, भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करण्याची सरकारची इच्छाशक्ती अल्प पडत असल्याने विरोधकांची ओरडच निर्णायक ठरली, तर आश्‍चर्य वाटायला नको. ज्यांना अटक करायला हवी त्यांच्यामागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उभे रहायचे आणि ज्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे, अशा संतांना मात्र अटक करायची, हा लोकशाहीतील सरकारी कारभार आहे. कुठलाच राजकीय पक्ष त्याला अपवाद नाही. आरोप झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा सोपस्कार पार पाडण्याविना अन्य काही भरीव गोष्ट लोकशाही राज्यात घडत नाही. ‘चुकीच्या गोष्टींना थारा नाही’, हा संदेश जनतेत रुजवायचा असेल, तर या स्थापन केलेल्या चौकशी समित्यांचे अहवाल काय सांगतात, त्यावर काय आणि कधी कारवाई होते, याची माहिती जनतेला मिळणे आवश्यक आहे. तसे होत नसल्यानेच देशाला लुबाडणारे रॉबर्ट वाड्रा, विजय मल्ल्या, मेहूल चोकसी यांचे पीक देशात फोफावत आहे. ‘पारदर्शक कारभारा’चे स्वप्न दाखवून सत्ताप्राप्ती केलेल्या भाजपने भ्रष्टाचार्‍यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शासन होईल, असे करायला हवे होते. केवळ विरोधकांना धाकात ठेवण्यासाठी म्हणून निवडणुकीच्या आधी भ्रष्टाचाराची प्रकरणे न काढता सातत्यानेच भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा पाठपुरावा घेऊन ती प्रकरणे शेवटपर्यंत नेण्याचा भाजप सरकारने प्रयत्न केला असता, तर आता ज्याप्रमाणे विरोधक निवडणुकीचा संदर्भ देऊन कांगावा करत आहेत, तो करायला त्यांना संधी मिळाली नसती. अर्थात् चोरी कधीही पकडली गेली, तरी चांगलेच आहे. निवडणुकीच्या आधी चोरी पकडली गेली; म्हणून चोरी हे काही सत्कर्म होऊ शकत नाही, हेही विरोधकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

निःस्पृहतेची ऐशीतैशी !

कितीही कायदे केले, तरी व्यक्ती सुधारण्यावर अथवा नैतिकदृष्ट्या उन्नत होण्याकडे लक्ष दिले नाही आणि भ्रष्टाचारालाच ‘अच्छे दिन’ आले, तर ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’, ‘स्वच्छ भारत’ या घोषणा पोकळच ठरतात. सीतामातेवर एका धोब्याने संशय व्यक्त केला, तेव्हा सत्य ठाऊक असूनही प्रभु श्रीरामचंद्रांनी सीतामातेचा त्याग केला. इथे तर भ्रष्टाचार आणि गुन्हा सिद्ध होऊनही अशांना पाठीशी घातले जात आहे; म्हणूनच रामाचे रामराज्य जनकल्याणकारी, तर आताची लोकशाही भ्रष्टकल्याणकारी आहे. निःस्पृहता हे एकेकाळचे भारतवासियांचे वैशिष्ट्य आता दुर्लभ झाले आहे. ते लयाला गेल्यानेच ‘तळे राखी तो पाणी चाखी’ अशी म्हण रुढ झाली. रॉबर्ट वाड्रा आणि गांधी कुटुंबीय यांनी मात्र ‘तळे राखी तो पाणी संपवी’ अशा पद्धतीने वर्तणूक केली. भाजपचा कारभार काँग्रेसइतका लुटारू नसला, तरी तो भूषणावहही नाही, हे वास्तव आहे आणि लोकशाहीचे अपयशही !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now