रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या देश-विदेशातील जिज्ञासूंचा परिचय आणि त्यांना आलेल्या अनुभूती

जगभरातील जिज्ञासूंना अध्यात्म आणि साधना यांचे स्वतःच्या जीवनातील महत्त्व कळावे, तसेच त्यांना साधनेतील प्रायोगिक भागांविषयी अवगत करावे’, या उद्देशांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने वेळोवेळी कार्यशाळांचे आयोजन केले जाते. या अंतर्गत २६ ते ३०.१.२०१९ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत देश-विदेशातून सहभागी झालेल्या जिज्ञासूंचा परिचय  आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. एलेना ओकुनोव्हिच, सेंट पीटर्सबर्ग, रशिया.

एलेना ओकुनोव्हिच

१ अ. परिचय

१ अ १. जीवनातील अडचणींमुळे ताणाला सामोरे जावे लागणे, त्या वेळी अध्यात्माविषयी जिज्ञासा निर्माण होणे आणि अंतर्मुख होण्यासाठी भारतात येऊन ध्यान-धारणा शिकणे : काही वर्षांपूर्वी एलेना यांच्या जीवनात असलेल्या अनेक अडचणींमुळे त्यांना ताणाला सामोरे जावे लागले होते. त्या वेळी त्यांच्या मनात अध्यात्माबद्दल जिज्ञासा निर्माण झाली होती. ‘भौतिक जीवनातील निर्णय घेणेही अशक्य आहे’, असे त्यांना वाटत होते. अंतर्मुख होण्याची आवश्यकता भासल्यामुळे त्या भारतात आल्या अन् त्यांनी ध्यान-धारणा शिकून घेतली.

१ अ २. एस्.एस्.आर्.एफ्.शी संपर्क आणि साधना : त्यानंतर त्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आल्या अन् त्यांनी नामजपाला आरंभ केला. त्यांना उच्च लोकांमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

१ आ. रामनाथी आश्रमातील चित्रीकरण कक्षात नामजप करतांना आलेली अनुभूती

१ आ १. ‘चित्रीकरण कक्ष मूळ आकारापेक्षा पुष्कळ मोठा आहे’, असे जाणवणे, नामजपातील एकाग्रता न्यून झाल्यावर तसे जाणवणे बंद होणे आणि एकाग्रतेने नामजप करण्याचा प्रयत्न केल्यावर पुन्हा तशी अनुभूती येणे : ‘मी रामनाथी आश्रमातील चित्रीकरण कक्षात नामजप करत होते. तेव्हा मला ‘तो कक्ष मूळ आकारापेक्षा पुष्कळ मोठा आहे’, असे जाणवले. त्यानंतर नामजपातील एकाग्रता न्यून झाल्याचे मला जाणवले. जेव्हा मी प्रयत्नपूर्वक नामजप करू लागले, तेव्हा मला तसे जाणवणे बंद झाले. त्यानंतर मी एकाग्रतेने नामजप करण्याचा प्रयत्न केल्यावर मला पुन्हा तसे अनुभवायला आले.’

२. गॅलिना ओकुनोव्हिच, सेंट पीटर्सबर्ग, रशिया.

गॅलिना ओकुनोव्हिच

२ अ. परिचय

२ अ १. ‘जीवन कठीण आहे’, असे वाटणे, ‘त्यासाठी काहीतरी करायला हवे’, असे वाटणे आणि अनेक ग्रंथांचे वाचन करणे : वर्ष २०१८ मध्ये गॅलिना यांना ‘जीवनात काहीच चांगले नाही. प्राणवायूच्या अभावामुळे ज्याप्रमाणे श्‍वास घेणे कठीण होते, त्याप्रमाणे जीवन आहे’, असे त्यांना वाटत होते. ‘त्यासाठी काहीतरी करायला हवे’, असेही त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथांचे वाचन केले.

२ अ २. त्यांना जखम झाली होती अन् कोणत्याही नेहमीच्या औषधांनी ती बरी होत नव्हती. त्यामुळे त्या आयुर्वेदाकडे वळल्या.

२ अ ३. मनःस्वास्थ्यासाठी पीटर्सबर्ग येथे चालू असलेल्या ब्रह्माकुमारी यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या ध्यान-धारणेच्या वर्गांना जाणे, ध्यान लावणे जमत नसल्यामुळे भारतात निमंत्रित करण्यात येणे आणि त्या भेटीतच रामनाथी आश्रमात जाण्याचे नियोजन करणे : हळूहळू ‘मनःस्वास्थ्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे’, याची त्यांना जाणीव झाली. त्यामुळे पीटर्सबर्ग येथे चालू असलेल्या ब्रह्माकुमारी यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या ध्यान-धारणेच्या वर्गांना त्या जाऊ लागल्या. त्यांना ध्यान लावणे जमत नसल्यामुळे भारतात येण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले. त्यांनी त्या भेटीतच १ दिवस रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात जाण्याचे नियोजन केले.

२ आ. व्यक्त केलेले मनोगत !

२ आ १. ‘आश्रमात आल्यानंतर त्यांना जाणवले, ‘ध्यान लावण्यापेक्षा नामजप करणे अधिक लाभदायक असून तो सहजपणे होतो.’

२ आ २. सूक्ष्म जगताच्या संदर्भातील प्रदर्शन पाहिल्यावर ईश्‍वरापासून दूर जात असल्यामुळेच स्वतःचे जीवन त्रासदायक बनले असल्याचे लक्षात येणे : २६.१.२०१९ या दिवशी कार्यशाळेतील सत्रामध्ये सूक्ष्म जगताच्या संदर्भातील प्रदर्शन दाखवण्यात आले. त्या वेळी त्यांच्या लक्षात आले, ‘मी शुद्धतेपासून (ईश्‍वरापासून) दूर जात असल्यामुळेच गेली २ वर्षे माझे जीवन त्रासदायक बनले आहे.’

२ इ. रामनाथी आश्रमात आल्यानंतर आलेल्या अनुभूती

१. ‘आश्रमात आल्यानंतर मला ‘मी ढगांमध्ये (स्वर्गात) आहे’, असे जाणवले. मला आलेल्या या अनुभूतीमुळेच मी कार्यशाळेत सहभागी झाले.

२. मला सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले अन् ‘मी त्यांना पूर्वीपासून ओळखते’, असे मला जाणवले. प्रत्यक्षात मी त्यांना भेटलेले नाही.

३. २६.१.२०१९ या दिवशी सकाळी लवकर मी नामजप करण्यासाठी ध्यानमंदिरात गेले होते. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून आपोआप अश्रू येऊ लागले. त्यांचे प्रमाण एवढे होते की, मला ध्यानमंदिरातून बाहेर यावे लागले.

४. २६.१.२०१९ या दिवशी सकाळी मी आरतीसाठी ध्यानमंदिरात गेले होते. आरतीनंतर साधक-पुरोहित प्रार्थना म्हणत असतांना मला पुष्कळ जांभया आल्या. यापूर्वी मला एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच जांभया आल्या नव्हत्या.’

३. सिंगाय रानी मोहन, सिंगापूर

सिंगाय रानी मोहन

३ अ. परिचय

३ अ १. युवावस्थेत असतांना एका योग्याशी भेट झाल्यावर ‘देवाला शोधायचे असेल, तर स्वतःच्या अंतरात पहाणे आवश्यक आहेे’, असे त्याने समजावणे : सिंगाय रानी मोहन मूळ सिंगापूरच्या असून सध्या कॅनडा येथे रहातात. त्या युवावस्थेत असतांना एका योग्याशी त्यांची भेट झाली. तेव्हा ‘देवाला शोधायचे असेल, तर स्वतःच्या अंतरात पहाणे आवश्यक आहेे’, असे त्या योग्याने त्यांना समजावले होते.

३ अ २. मंदिरात जाणे, हिंदु धर्मानुसार आचरण करणे आणि संस्कृत श्‍लोकांचा अर्थ कळत नसल्याने ते बंद करून इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे : मोठे होत असतांना त्या मंदिरात जात असत अन् हिंदु धर्मानुसार आचरण करत असत; मात्र त्यातील श्‍लोक इत्यादी संस्कृतमध्ये असल्यामुळे त्यांना त्यांचा अर्थ समजत नसे. त्यामुळे ते बंद करून त्यांनी इतर अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला.

३ अ ३. साधनेला आरंभ – मुलीमध्ये साधनेमुळे झालेले पालट पाहून नामजप करण्यास आरंभ करणे, साधनेमुळे स्वतःत पालट होऊन स्वतः अधिक शांत झाल्याचे जाणवणे आणि त्यानंतर पती अन् नात यांनीही नामजप करायला आरंभ करणे : त्यांची मुलगी अनुशिया यांच्यात साधनेमुळे झालेले पालट पाहून त्या प्रभावित झाल्या अन् प्रतिदिन सकाळ-संध्याकाळ १५ मिनिटे नियमितपणे नामजप करू लागल्या. साधनेमुळे त्यांना स्वतःतही पालट होत असून ‘आपण अधिक शांत झालो आहोत’, असे त्यांना जाणवले. त्यांच्यामध्ये, तसेच त्यांच्या वाणीमध्ये झालेले पालट इतरांच्याही लक्षात येऊन त्यांचेही वागणे पालटले. एवढेच नव्हे, तर त्यांचे पती आणि नात यांनीही नामजप करायला आरंभ केला.

३ आ. कार्यशाळेला येण्याचा उद्देश

‘थोडी साधना करून एवढा लाभ होत असेल, तर अधिक साधना केल्यास किती अनुभवायला मिळेल ?’, या जाणिवेने त्या या कार्यशाळेसाठी आल्या आहेत.

३ इ. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

३ इ १. ध्यानमंदिरात नामजप करतांना सूक्ष्मातून ‘ॐ’कार ऐकू येणे : ‘मी अलीकडेच, म्हणजे ४.१.२०१९ पासून नामजप करायला आरंभ केला आहे. मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करायला गेले, तेव्हा मला सूक्ष्मातून ‘ॐ’कार ऐकू येत होता. ‘कुणीतरी तो जप लावला असावा’, असे मला वाटले होते; मात्र मी दुसर्‍या दिवशी तेथे नामजपाला गेले असतांना पुन्हा मला तो ऐकू आला.

३ इ २. परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत नामजप करतांना धडधडल्यासारखे होणे आणि डोळे मिटल्यावर तेजस्वी प्रकाश दिसणे : मी परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीमध्ये १० मिनिटे नामजप करायला गेले होते. त्या वेळी मला धडधडल्यासारखे होत होते. मी डोळे मिटले, तेव्हा मला तेजस्वी प्रकाश दिसला.’

४. अनुशिया मोहन, कॅनडा

अनुशिया मोहन

४ अ. परिचय

४ अ १. लहान वयातच पूजा-अर्चा करण्याच्या माध्यमातून साधनेला आरंभ होणे : अनुशिया मोहन यांचा जन्म सिंगापूर येथे झाला. त्या हिंदु कुटुंबातील असल्यामुळे अगदी लहान वयातच पूजा-अर्चा करण्याच्या माध्यमातून त्यांच्या साधनेला आरंभ झाला. त्यांच्यात श्रीकृष्णाप्रती आंतरिक प्रेम आणि भाव आहे.

४ अ २. कुटुंबियांच्या समवेत कॅनडा येथे जाणे, तेथे साधना करणारे अगदीच अल्प लोक असल्याने मनात साधनेविषयी संभ्रम निर्माण होऊ लागणे आणि बराच काळ निराशेत जाणे : त्या ७ वर्षांच्या असतांना त्यांचे सर्व कुटुंबीय कॅनडा येथे रहायला गेले. तेथे साधना करणारे अगदीच अल्प लोक होते. त्यामुळे साधनेविषयी हळूहळू त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ लागला. बराच काळ त्या निराशेत गेल्या आणि त्यांना आयुष्याबद्दल काहीच रस वाटत नव्हता, तसेच ‘जीवनात आता काहीच उरले नाही’, असे त्यांना वाटू लागले.

४ अ ३. एका अन्य मार्गाने साधनेला आरंभ केल्यावर ‘स्लीप पॅरालीसिस’चा त्रास होऊ लागणे, लोकांभोवती नकारात्मक आभा दिसू लागणे आणि त्यानंतर साधना सोडून मायेतील जगात गुंतून जाणे : आयुष्यात आलेल्या या कठीण काळामुळे त्यांनी काही कालावधीनंतर एका अन्य मार्गाने साधनेला आरंभ केला. त्या मार्गाने साधनेला आरंभ केल्यावर त्यांना ‘झोपलेले असतांना जखडल्याप्रमाणे होऊन कोणतीही हालचाल करता न येणे (स्लीप पॅरालीसिसचा) असा त्रास होऊ लागला, तसेच त्यांना लोकांभोवती नकारात्मक आभा (निगेटिव्ह ऑरा) दिसू लागल्या. या अनुभूतींमुळे त्या भयभीत होत असत. त्यामुळे त्यांनी साधना करणे सोडून दिले आणि त्या मायेतील जगातच गुंतून गेल्या.

४ आ. व्यक्त केलेले मनोगत !

४ आ १. एस्.एस्.आर्.एफ्.च्या संपर्कात आल्यावर चांगले वाटू लागणे, साधनेचे प्रयत्न चालू करणे, त्यानंतर साधनेत पुन्हा खंड पडणे आणि पूर्वीच्या तुलनेत अधिक चिंता अन् भीती यांनी ग्रस्त होणे : ‘मला एस्.एस्.आर्.एफ्.विषयी माहिती मिळाली आणि मी त्यांच्या सत्संगांना उपस्थित रहायला लागले. तेव्हापासून मला चांगले वाटू लागले आणि मी साधनेचे प्रयत्न चालू केले. ‘एका वर्षात मी साधनेत चांगली प्रगती करू शकेन’, असे मला वाटले होते; मात्र माझ्या साधनेत पुन्हा खंड पडला आणि पूर्वीच्या तुलनेत मी अधिक चिंता आणि भीती यांनी ग्रस्त झाले.

४ आ २. कालांतराने एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने घेण्यात येणार्‍या सत्संगांना उपस्थित राहू लागणे आणि एका आठवड्यातच मनातील अनामिक भीती नाहीशी होऊन चांगले वाटू लागणे : वर्ष २०१८ मध्ये मी पुन्हा एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने घेण्यात येणार्‍या सत्संगांना उपस्थित राहू लागले. सत्संगात सांगण्यात आलेली सूत्रे मी गांभीर्याने कृतीत आणण्याचा प्रयत्न करू लागले. एका आठवड्यातच मला वाटत असलेली अनामिक भीती नाहीशी झाली आणि मला चांगले वाटू लागले.

४ आ ३. एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांकडून पुष्कळ साहाय्य मिळणे आणि ही साधना करतांना कोणतीही भीती वा चिंता न वाटणे : अन्य आध्यात्मिक संस्थांच्या तुलनेत एस्.एस्.आर्.एफ्. ही चांगली आध्यात्मिक संस्था आहे; कारण मला साधकांकडून पुष्कळ साहाय्य मिळाले. मला एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना कोणतीही भीती वा चिंता वाटत नाही.

४ इ. कार्यशाळेला येण्याचे उद्दिष्ट : मला प्रत्येक साधकाकडून शिकायचे आहे आणि माझ्यातील स्वभावदोष अन् अहं न्यून होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मला माझ्या साधनेची गती वाढवायची आहे, तसेच ‘रज-तमात्मक वातावरणातही साधनेत संतुलन कसे राखायचे ?’, हे शिकायचे आहे. मला कार्यशाळेत येण्याची संधी मिळाल्याबद्दल मी पुष्कळ कृतज्ञ आहे.

४ ई. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

४ ई १. चारचाकीतून आश्रमात येत असतांना अकस्मात प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकू येऊ लागणे आणि याविषयी चालक-साधकाला विचारल्यावर भजने ऐकू येत नसल्याचे त्याने सांगणे : चारचाकीतून आश्रमात येण्यापासून ते येथे वास्तव्य असेपर्यंत मला बर्‍याच अनुभूती आल्या. चारचाकीतून आश्रमात येत असतांना मला अकस्मात प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकू येऊ लागली. ‘कुणीतरी मोठ्या आवाजात भजने लावली आहेत’, असे मला वाटले. ‘चारचाकीत भजने लावली आहेत का ?’, असे मी चालक-साधकाला विचारले. तेव्हा त्याने भजने लावली नसल्याचे, तसेच त्याला कोणतीही भजने ऐकू येत नसल्याचे सांगितले.

४ ई २. एका कार्यक्रमाच्या वेळी श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवून भावजागृती होणे : २५.१.२०१९ या दिवशी सायंकाळी एका कार्यक्रमाच्या वेळी (‘आश्रमात पू. भगवान वाघापूरे(डोणे) महाराज यांच्याद्वारे श्री हालसिद्धनाथ देवाच्या प्रासादिक भाकणुकीचा कार्यक्रम होता.’ – संकलक) मला श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवत होते. त्या वेळी माझी भावजागृती होऊन डोळ्यांतून अश्रू वहात होते.

४ ई ३. मला कार्यशाळेत मार्गदर्शन करणार्‍या काही साधकांभोवती गुलाबी, पिवळ्या आणि लाल रंगाची प्रभावळ दिसत होती.

४ ई ४. ध्यानमंदिरात आरतीसाठी गेल्यावर तेथील ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातून पुष्कळ शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे : मी ध्यानमंदिरात आरतीसाठी गेले होते. आरती चालू असतांना मी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पहात होते. तेव्हा मला ‘त्या छायाचित्रातून पुष्कळ शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले. त्यांच्या छायाचित्राकडे पहातांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती. ‘माझ्यातील भावामुळे नव्हे, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा प.पू. भक्तराज महाराज यांच्याप्रती जो भाव आहे, त्यामुळे ही भावजागृती होत होती’, असे मला वाटले.’

५. श्री. वैभव येवले, मुंबई, भारत.

श्री. वैभव येवले

५ अ. परिचय

श्री. वैभव येवले हे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रथमच आले आहेत. एस्.एस्.आर्.एफ्.च्या एका साधकाकडून त्यांना साधनेविषयी समजले. नंतर त्यांनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरील लिखाण वाचले. ते प्रतिदिन हिंदु धर्मानुसार आचरण करतात.

५ आ. श्री. वैभव येवले यांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘माझ्यातील स्वभावदोष आणि अहं न्यून करणे’, हे माझे ध्येय आहे अन् ‘ते लवकरच न्यून होतील’, अशी मला आशा वाटते. ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापने’च्या कार्यात मला सहभागी व्हायचे आहे आणि त्यामुळेच मी या कार्यशाळेला उपस्थित राहिलो आहे. मला येथील प्रत्येकाकडून भरपूर शिकायचे आहे, जेणेकरून कार्यशाळेनंतर मी जेव्हा माझ्या घरी परत जाईन, तेव्हा मी ते कृतीत आणून साधनेला आरंभ करू शकेन.’

६. संचिता सेन शर्मा, भारत

संचिता सेन शर्मा

६ अ. परिचय

६ अ १. आईने श्री रामकृष्ण परमहंस यांच्या कथा सांगणे, त्या वेळी आईला भावाश्रू येणे आणि ‘ही चांगली गोष्ट आहे’, असे आईने सांगणे : संचिता सेन शर्मा यांची आई श्री रामकृष्ण परमहंस यांची भक्त होती. ती नेहमी संचिता यांना श्री रामकृष्ण परमहंस यांच्या कथा सांगत असे. कथा सांगतांना त्यांना भावाश्रू येत असत. त्या याविषयी आईला विचारायच्या, तेव्हा त्यांची आई एवढेच म्हणायची, ‘ही चांगली गोष्ट आहे.’

६ अ २. लहानपणी आरशात पहातांना ‘मी कोण आहे ?’, असा प्रश्‍न पडणे आणि ‘आरशात दिसणारी प्रतिमा म्हणजे स्वतःचे खरे स्वरूप नव्हे’, असे जाणवणे : त्या लहान असतांना स्वतःला जेव्हा आरशात पहायच्या, तेव्हा त्यांना ‘मी कोण आहे ?’, असा प्रश्‍न पडत असे. त्या वेळी ‘आरशात दिसणारी प्रतिमा म्हणजे माझे खरे स्वरूप नव्हे’, असे त्यांना जाणवत असे.

६ अ ३. ‘कोणतीतरी अज्ञात शक्ती मार्गदर्शन करत आहे’, असे जाणवणे : प्रत्येक वेळी ‘कोणतीतरी अज्ञात शक्ती मार्गदर्शन करत आहे’, तसेच जेव्हा त्या चुकीच्या मार्गाने जात, तेव्हा ‘ती अज्ञात शक्ती योग्य मार्ग दाखवत आहे’, असे त्यांना जाणवत होते.

६ आ. व्यक्त केलेले मनोगत !

६ आ १. श्री रामकृष्ण परमहंस यांची जीवनकथा वाचण्यास आरंभ केल्यावर अनुभूती येणे, साधनेसाठी घरदार सोडण्याचीही सिद्धता होणे; पण आई-वडिलांनी तसे करू न देणे : ‘मी जेव्हा ११ वीत होते, तेव्हा खर्‍या अर्थाने मला साधनेत साहाय्य मिळाले. तेव्हा मी श्री रामकृष्ण परमहंस यांची जीवनकथा वाचण्यास आरंभ केला होता आणि मला पुष्कळ अनुभूती येऊ लागल्या. एक वेळ अशी आली की, साधना करण्यासाठी घरदार सोडण्याचीही माझ्या मनाची सिद्धता झाली होती; परंतु माझ्या आई-वडिलांनी मला तसे करू दिले नाही.

६ आ २. प्रतिदिन ध्यान केल्याने सकारात्मक पालट झाल्याचे आई-वडिलांच्या लक्षात येणे आणि नोकरी करायला लागल्यावर साधना खंडित होणे : मी प्रतिदिन एक ते दीड घंटा ध्यान करत असे. त्यामुळे माझ्यात सकारात्मक पालट झाल्याचे माझ्या आई-वडिलांच्या लक्षात आले. ‘मला येणार्‍या अनुभूती म्हणजे भावाचीच स्थिती आहे’, हे माझ्या लक्षात येत होते. मी नोकरी करायला लागल्यावर मात्र माझी साधना खंडित झाली.

६ आ ३. अमेरिकेतील श्री रामकृष्ण परमहंस यांच्या आश्रमात गेल्यावर तेथील एका स्वामींना अनुभव कथन करणे आणि त्यांनी त्या चांगल्या अनुभूती असल्याचे सांगणे : वर्ष २०१४ मध्ये मी अमेरिकेत गेले असतांना श्री रामकृष्ण परमहंस यांच्या आश्रमाला भेट दिली. आश्रमातील एका स्वामींना मी माझे अनुभव कथन केले, तेव्हा त्या स्वामींनी ‘या चांगल्या अनुभूती आहेत’, असे सांगितले.

६ आ ४. नोकरी करतांना देवाचा धावा करणे आणि त्याला आळवणे : नोकरी करतांना मला कामाचा बराच भार असल्याने माझी साधना होत नव्हती. त्या वेळी मी सतत देवाचा धावा करत असे आणि ‘मला योग्य मार्ग दाखव’, असे आळवत असे.

६ आ ५. मधल्या काळात मी ‘प्राणिक हीलिंग’विषयी शिकले.

६ आ ६. मित्राने एस्.एस्.आर्.एफ्.विषयी माहिती सांगून कार्यशाळेत सहभागी होण्यास सुचवणे : माझ्या एका मित्राला माझ्यातील ईश्‍वराप्रतीची ओढ लक्षात आली. त्याने मला एस्.एस्.आर्.एफ्.विषयी माहिती सांगितली अन् या कार्यशाळेत सहभागी होण्यास सुचवले.

६ इ. रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती

१. आश्रमात चारचाकीतून येतांना मी जसजशी आश्रमाच्या जवळ येत होते, तसतसा वातावरणात असलेल्या स्पंदनांमधील फरक मला लक्षात येत होता.

२. आश्रमात पोहोचल्यावर साधकांनी माझे स्वागत केले, त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली.

३. मला आश्रमात सात्त्विकता जाणवली. आश्रमातील प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी भिंतीपासून ते येथील धुळीपर्यंत, एवढेच नव्हे, तर आश्रमाच्या नजीकचे रस्तेही सात्त्विक आहेत.

४. आश्रमात आल्यापासून मी भावाची स्थिती अनुभवत आहे. अशी स्थिती मी यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती.

५. येथील साधकांना पाहिल्यावर मला ‘माझ्यासमोर दैवी रूपच उभे आहे’, असे वाटत होते आणि मी त्यांना वाकून नमस्कार करत होते.

६. आश्रमातील एका कक्षात आल्यावर मला स्वर्गात असल्याप्रमाणे वाटत होते.

६ ई. कार्यशाळेला येण्याचे उद्दिष्ट

‘इतरांना साधनेत साहाय्य करणे आणि ईश्‍वराप्रती भाव अनुभवून त्याच्याशी एकरूप होणे’, हे माझे उद्दिष्ट आहे.’

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.


Multi Language |Offline reading | PDF