कुंभमेळ्यात १५ सहस्र लहान मुले, महिला आणि पुरुष बेपत्ता !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

प्रशासनाच्या वतीने बेपत्तांचा शोध घेऊन त्यांना घरी पाठवण्याचे काम चालू !

प्रयागराज (कुंभनगरी), ६ फेब्रुवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यात ४ फेबुवारीला ‘‘मौनी अमावास्ये’ला त्रिवेणी संगमासह ८ कि.मी.च्या ४० घाटांवर गंगा नदीत स्नान करण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. भाविकांची गर्दी प्रचंड झाल्याने या गर्दीत जवळजवळ १५ सहस्र लहान मुले, महिला, पुरुष आणि वयस्कर माणसे बेपत्ता झाली आहेत. यामध्ये बेपत्ता झालेल्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवण्याचे काम प्रशासनाने चालू केले आहे’’, अशी माहिती कुंभमेळा अधिकारी विजय आनंद यांनी ५ फेब्रुवारी या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ‘मौनी अमावास्ये’ला संत आणि भाविक यांनी व्यवस्थितपणे त्रिवेणी संगमावर ४० घाटांवर स्नान केले. कोणतीही धावपळ झाली नाही. त्यामध्ये सर्व विभागांतील प्रशासनाने चोख व्यवस्था सांभाळली, असा दावाही त्यांनी केला.

विजय आनंद पुढे म्हणाले की…

१. कुंभमेळा हा यशस्वी झाला आहे. कुंभमेळ्यात कुठेही उघड्यावर शौचालय झालेले नाही. आरोग्य विभागाने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

२. प्रत्येक आखाड्याला शोभायात्रा आणि स्नान करण्याची वेळ दिली असल्याने त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

३. ४ फेब्रुवारी या दिवशी दिगंबर आखाड्याने शोभायात्रा काढतांना अधिक वेळ घेतला. ही अयोग्य गोष्ट आहे. दिंगबर आखाड्याने अधिक वेळ घेतल्याने प्रशासनाने ‘नया उदासीन’ आणि ‘बडा पंचायती उदासीन’ या आखाड्यांच्या मिरवणुका बाहेर काढून पुढे पाठवल्या.

४. प्रशासनाने अव्यवस्था केल्याच्या कारणावरून बडा पंचायती उदासीन आखाड्यातील संत-महंत नाराज होऊन त्यांनी धरणे आंदोलन केले. तसेच निर्मल आखाड्याची शोभायात्रा ‘पांटून पुला’पासून माघारी परतली होती. याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय अधिकार्‍यांनी संत-महंत आणि साधू यांची मनधरणी केली. त्यानंतर त्या सर्वांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले.

५. कुंभमेळ्यात ठिकठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती. तेथे प्रशासनाने भाविकांना पुढे जाण्यास वाट देऊन गर्दी नियंत्रित केली.

६. प्रशासनाने अव्यवस्था दिल्याच्या कारणावरून काही आखाड्यांनी १० फेब्रुवारी या दिवशीच्या राजयोगी स्नानावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे सर्व आखाड्यांतील संतांना भेटून राजयोगी स्नानासाठी त्यांची मनधरणी केली जाईल.

कुंभमेळा अधिकारी विजय आनंद म्हणाले, ‘‘२ आणि ३ फेब्रुवारी या दिवशी २ कोटी ५० लक्ष, तर ४ फेब्रुवारी या दिवशी ३ कोटी, असे एकूण ५ कोटी ५० लक्ष भाविकांनी ८ किलोमीटरच्या ४० घाटांवर स्नान केले आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF