उद्दाम  ख्रिस्ती  धर्मप्रसारक  !

संपादकीय

बंगालमधील डायमंड हार्बर येथील ‘भारतीय सेवाश्रम संघा’च्या शाळेत क्रीडा स्पर्धा चालू असतांना तेथे ४ महिला ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार चालू केला. हिंदूंच्या देवतांवर विकृत भाषेत टीका करत ‘येशूला शरण जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही’ असे ते हिंदु पालक आणि मुले यांना ठासून सांगत होते. ‘भारताचे लवकरच ख्रिस्तीकरण होणार असून तेच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य आहे’ असेही त्यांनी सांगितले. येथे महत्त्वाचे सूत्र म्हणजे ही शाळा हिंदुत्वनिष्ठांकडून चालवली जाते. क्रीडा स्पर्धा चालू असतांना तेथे हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचा अर्थ तेथे ‘४ विरुद्ध शेकडो’ असे संख्याबळ होते. असे असतांनाही या ख्रिस्ती धर्मप्रसारकांना ‘हिंदू आपल्याला विरोध करतील’, ‘हिंदू आक्रमक होतील’, ‘हिंदू आपल्या जिवाचे बरे-वाईट करतील’, याची जराही भीती वाटली नाही. मध्यंतरी तिरुपती बालाजी मंदिरामध्येही ख्रिस्ती धर्मप्रसारक ख्रिस्ती पंथाचे महत्त्व सांगणारी पत्रके वाटत असल्याची घटना समोर आली होती. ‘हिंदु धर्माभिमानी एखाद्या मदरशात जाऊन तेथे हिंदु धर्माचा प्रसार करत आहेत’ अथवा ‘चर्चच्या परिसरात हिंदु युवक हिंदु धर्माची महती सांगणारी पत्रके वाटत आहेत’, असा विचार तरी आपण करू शकतो का ? वरील प्रकरणात धर्माभिमानी हिंदूंनी ख्रिस्ती धर्मप्रसारकांना विरोध केल्यावर ‘असा विरोध करणे तुम्हाला जड जाईल’, अशी धमकी त्यांनी दिली. एक प्रकारे हिंदूबहुल असलेल्या परिसरात जाऊन हिंदूंच्याच श्रद्धास्थानांचे भंजन करण्याचे आणि वर त्यांनाच धमकी देण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात कसे आले ? ‘हिंदू हा पराकोटीचा असहिष्णु असून तो आपले काहीही बिघडवू शकणार नाही’, याची या धर्मप्रसारकांना खात्री आहे. दुसरे म्हणजे भारतातील कायदे. भारतात धर्मांतरविरोधी कायदा नाही. त्यामुळे या मिशनर्‍यांना कोणी धर्मप्रसार करतांना पकडले, तरी ‘कारवाई होणार नाही’, हे त्यांना ठाऊक असते. ख्रिस्ती धर्मप्रसारकांची ही उद्दाम मानसिकता हिंदूंसाठी धोकादायक आहे. भारतात कुठलाही पक्ष सत्तेत आला, तरी तो धर्मांतरबंदी कायदा अस्तित्वात आणणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पोलीस, मग ते कुठल्याही राज्याचे असोत ख्रिस्ती धर्मप्रसारकांची तळी उचलतात. ते अशा हिंदुद्वेष्ट्यांना अभय देतात आणि त्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या हिंदु धर्माभिमान्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करतात. हिंदूंच्या बाजूने ना पोलीस आहेत ना प्रशासन. ‘हिंदुत्वनिष्ठ’ म्हणवून घेणार्‍या भाजपसह अन्य पक्षांचे हिंदु लोकप्रतिनिधीही संकटकाळी हिंदूंची बाजू घेत नाहीत. ही सर्व परिस्थिती पहाता हिंदूंचे धर्मांतर रोखायचे, तर कसे रोखायचे ?’, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. सध्या हिंदु धर्मावर होणारे आघात पहाता एक अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे, ज्यामुळे हिंदु धर्मावर आघात करण्याचे धारिष्ट्य हिंदुद्वेष्ट्यांमध्ये निर्माण होणार नाही. अशी व्यवस्था केवळ हिंदु राष्ट्रातच निर्माण होईल. यासाठी हिंदूंनी प्रयत्न करायला हवेत !


Multi Language |Offline reading | PDF