सर्व गटांतील महिलांना ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाटल्याची चूक मान्य करून पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांची जाहीर क्षमायाचना !

नांदगाव (जिल्हा सिंधुदुर्ग) ग्रामपंचायतीत हळदी-कुंकू कार्यक्रमात सर्व वयोगटांतील महिलांना ‘सॅनिटरी नॅपकिन’ वाटल्याचे प्रकरण

लेखी क्षमायाचना न केल्याने महिलांचा पुढील हळदी-कुंकू कार्यक्रमावर बहिष्कार

कणकवली – तालुक्यातील नांदगाव गावात हळदी-कुंकू समारंभात सर्व वयोगटांतील महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाण म्हणून वाटण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. यावर तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित महिलांची पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांना जाहीर क्षमा मागावी लागली; मात्र उपस्थित महिलांनी आक्रमक होत लेखी स्वरूपात क्षमा मागा, अशी मागणी केली. ही मागणी पूर्ण न झाल्याने ‘यापुढील हळदी-कुंकू कार्यक्रमावर आमचा बहिष्कार असेल’, असे महिलांनी घोषित केले.

नांदगांव ग्रामपंचायतीने हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या वेळी वाण म्हणून सॅनिटरी नॅपकिनचे वाटप सरसकट किशोरवयीन मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांनाही केल्याने सर्व महिला संतप्त झाल्या होत्या. या महिलांनी नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून सरपंचांना खडसावले होते. या वेळी ज्यांनी ‘शासनाच्या आदेशाप्रमाणे सॅनिटरी नॅपकिनचेच वाटप करा’, असे सांगितले होते, त्या हर्षदा वाळके मुंबईला गेल्या होत्या. त्यामुळे ‘२ फेब्रुवारीला या’, असे सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर २ फेब्रुवारीला पुन्हा सर्व महिला ग्रामपंचायतीत आल्या होत्या. या वेळी झालेल्या सभेत कणकवली सभापती सुजाता हळदिवे, पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, नांदगावमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांच्या निर्णयामुळे वाद झाल्याचा आरोप

हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या संदर्भात ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार वाण म्हणून प्रत्येक महिलेला श्रीफळ देणे आणि नंतर सॅनिटरी नॅपकिन वाटण्याचे ठरले आणि त्याप्रमाणे नारळ खरेदी करण्यात आले; परंतु हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या वेळी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांनी ‘नारळ वाटू नका, तर सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करा’, असे सांगितल्याने पुढील घटना घडल्या. असलदे ग्रामपंचायत येथे पुरुष सरपंच असूनसुद्धा त्यांनी महिलांचा मान राखला. शासनाच्या आदेशाचे पालन करूनही इतर परिसरातील ग्रामपंचायतीत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करून इतर वस्तू वाण म्हणून देण्यात आल्या होत्या. तसे आमच्या ग्रामपंचायतीला करता आले असते, असे महिलांनी सांगितले.

पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांच्याकडून चूक मान्य

या बैठकीच्या वेळी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांनी महिलांची जाहीर क्षमा मागतांना सांगितले की, ‘मी तुमच्यामुळेच सरपंच झाले होते आणि आता पंचायत समिती सदस्याही झाले आहे. आम्ही शासनाच्या आदेशाप्रमाणे सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले असून यात जाणीवपूर्वक कोणाच्या भावना दुखावायच्या नव्हत्या. वाण म्हणून श्रीफळ वाटायला आणले होते, ते वाटण्यास त्यांनी स्वतः विरोध केल्याचे सांगत त्यांनी जाहीर क्षमायाचना केली.


Multi Language |Offline reading | PDF