महाराष्ट्र पेटवण्याचा कट ज्या नक्षलवादी ऐक्यातून शिजला, त्यामागे स्वतःला कवी, लेखक, बुद्धीमान म्हणवून घेणार्‍यांची डोकी ! – उद्धव ठाकरे

मुंबई, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – अल्-कायदा आणि एल्गारछाप विचारवंत यांची कार्यशैली एकच आहे. पोलीस, प्रशासन आणि कायदा यांवर सतत आक्रमण करायचे, सरकारविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण करायचे, व्यवस्थेचे मनोधैर्य खच्ची करून पांगळे करायचे ही अल्-कायदाची रणनीती आहे. एल्गारवाल्यांचीसुद्धा तीच नीती आहे. महाराष्ट्र पेटवण्याचा कट ज्या नक्षलवादी ऐक्यातून शिजला, त्यामागे स्वतःला कवी, लेखक, बुद्धीमान म्हणवून घेणार्‍यांची विचारी डोकी होती, असा आरोप करत शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी ६ फेब्रुवारीच्या दैनिक सामनामधील अग्रलेखामध्ये तथाकथित पुरोगाम्यांचा खरा चेहरा उघड केला आहे. सामुदायिक हत्याकांड, भ्रष्टाचार, हत्या अशा आरोपांतूनही गुन्हेगार सुटतात; मात्र म्हणून ते निर्दोष असतातच, असे नाही, अशा स्पष्ट शब्दांत तेलतुंबडे यांची बाजू घेणार्‍या पुरोगाम्यांची यात कानउघाडणी करण्यात आली आहे.

यामध्ये श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे की,

१. तेलतुंबडे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत वगैरे असल्याचे ढोल आता वाजवले जात आहेत. इंग्रजी वर्तमानपत्रांनी त्यांचा उल्लेख ‘दलित अकॅडमिक’ असा केला आहे. खरे म्हणजे विचारवंत, बुद्धीवंत यांना जात, धर्म, पंथ याची उपाधी लावू नये. पोट आणि शहाणपण यांना जात चिकटवणे हा मेंदू नामक अवयवाचा अपमान ठरतो. (हिंदुत्वनिष्ठांना अटक झाल्यावर त्यांना धर्मांध ठरवणे आणि नक्षलवाद्यांचे समर्थन केल्यावरून अटक झालेल्यांना विचारवंत म्हणणे, हा प्रसिद्धीमाध्यमांचा हिंदुद्वेष ओळखा ! – संपादक)

२. एल्गार परिषदेची पडद्यामागून सूत्रे हालवण्याच्या आरोपावरून काही मंडळींना अटक झाल्यानंतर देशातील भंपक बुद्धीवाद्यांनी जणू आभाळ कोसळले, असा गदारोळ केला आणि देश बुडालाच, असे चित्र निर्माण केले आहे.

३. अटक करण्यात आलेले हे सर्व लोक देश अस्थिर करण्यामागचे सूत्रधार होते. हे शिकले-सवरलेले असल्याने आणि मोठ्या लोकांत उठबस असल्यामुळे त्यांना प्रतिष्ठेचे एक वलय मिळाले होते. प्रशासन, न्यायव्यवस्था, शैक्षणिक क्षेत्र यांच्याशी त्यांचे लागेबांधे निर्माण करून स्वतःभोवती कवचकुंडले निर्माण केली आणि त्याचा लाभ घेऊन ही मंडळी देशात नक्षलवाद, माओवाद यांचे विध्वंसक विचार पेरत आहेत.

४. विचारवंत असलात, तरी तुम्ही कायद्यापुढे सारखे आहात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आतंकवादी असल्याचे प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा साथी भाग्यनगरचा ओवैसी सांगतो. हेच लोक कन्हैयाकुमार, तेलतुंबडे, जिग्नेश मेवाणी यांचे समर्थन करतात. हिंदुत्वाचा द्वेष हाच या मंडळींचा विचार आहे आणि हेच विचारवंत आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर जाऊन देशाची अपकीर्ती करत आहेत. प्रा. तेलतुंबडे यांच्यासाठी छाती पिटणार्‍यांनी हे समजून घेतले पाहिजे.

५. देशविरोधी भयंकर काही तरी शिजते आहे. पोलिसांनाच आरोपी करणे, हा या कटाचा प्रारंभ आहे. पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे रहाण्याची हीच वेळ आहे.


Multi Language |Offline reading | PDF