फेरविचार याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण

नवी देहली – शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांच्या महिलांना प्रवेश देण्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात फेरविचार याचिका प्रविष्ट करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने ६ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी त्यांवरील निर्णय राखून ठेवला. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती आर्.एफ्. नरीमन, ए.एम्. खानविलकर, धनंजय चंद्रचूड आणि इंदू मल्होत्रा यांचे खंडपीठ ४८ फेरविचार याचिकांवर निर्णय देणार आहे. या सुनावणीच्या वेळी मंदिरात प्रवेश करणार्‍या बिंदू आणि कनकदुर्गा या २ महिलांनीही त्यांची बाजू मांडली. ‘मंदिर प्रवेशानंतर आम्हाला धमक्या येत असून आमच्या जिवाला धोका आहे’, असे त्यांनी न्यायालयात सांगितले.

चुकीच्या घटना घडेपर्यंत न्यायालयाने मंदिरातील परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये ! – याचिकाकर्त्यांची मागणी

शबरीमला मंदिरात जोपर्यंत काही चुकीचे होत नाही, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मंदिरातील परंपरांमध्ये हस्तक्षेप करू नये. हिंदु धर्मात देवतांची वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. शबरीमला मंदिरातही पूजेची एक वेगळी पद्धत आहे. येथे जातीप्रथा मानली जात नाही, तर पूजा करण्याची पद्धत निसर्गाशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे कलम १७ (अस्पृश्यता) येथे लागू होत नाही’, असा युक्तीवाद याचिकाकर्ते त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे माजी अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन् यांनी न्यायालयात केला.


Multi Language |Offline reading | PDF