जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आल्यावर ऑस्ट्रेलिया येथील श्री. अनिल शेट यांना आलेल्या अनुभूती

श्री. अनिल शेट

१. मूर्तीकार-साधक ज्या कक्षात श्री दुर्गादेवीच्या मूर्ती बनवत होते, त्या कक्षात गेल्यावर पुष्कळ चैतन्य जाणवणे, ‘देवीच्या मूर्तीतून शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे वाटणे आणि भावजागृती होणे

‘१३.१.२०१७ या दिवशी अकस्मात ‘रामनाथी आश्रमात मूर्तीकार-साधक बनवत असलेल्या श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे’, असे मला वाटले. ‘ती मूर्ती आश्रमातील कोणत्या कक्षात बनवण्यात येत आहे ?’, ते मला ठाऊक नव्हते. एवढ्यात मला पू. (सौ.) भावना शिंदे भेटल्या आणि त्यांनी मला श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या दर्शनाविषयी विचारले. मी ‘दर्शन झाले नाही’, असे म्हटल्यावर त्या स्वतः मला मूर्ती बनवत असलेल्या कक्षात घेऊन गेल्या. त्या कक्षात प्रवेश करताक्षणी मला तेथे पुष्कळ चैतन्य जाणवले. ‘श्री दुर्गादेवीच्या मूर्तीतून शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असेही मला जाणवलेे. त्या वेळी माझी भावजागृती होऊन भावाश्रू आले.

२. ध्यानमंदिरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. १३.१.२०१७ या दिवशी सायंकाळी मी ध्यानमंदिरात नामजप करण्यासाठी गेलो होतो. ‘तेथील प.पू. भक्तराज महाराज यांचे (प.पू. बाबांचे) छायाचित्र त्रिमितीय झाले आहे’, असे मला वाटले.

आ. त्या छायाचित्रात जिवंतपणा जाणवून ‘प.पू. बाबा माझ्याशी बोलत आहेत’, असे मला अनेकदा वाटले.

इ. ‘ते आसनावरून उठून बाहेर येत आहेत’, असेही मला जाणवले.

ई. नंतर आरती करत असतांना मी प.पू. बाबांच्या छायाचित्राकडे पाहिले. तेव्हा माझा भाव जागृत झाला अन् मला आनंद वाटला.

३. ध्यानमंदिरात आरतीच्या वेळी आलेल्या अनुभूती

३ अ. आरती म्हणतांना माझी एवढी भावावस्था होती की, माझे देहभान हरपले.

३ आ. मी ज्या ज्या देवतेची आरती म्हणत होतो, त्या त्या देवतेचे रूप माझ्यासमोर उभे रहात होते.

३ इ. आरती झाल्यानंतर मी भावस्थितीत पूर्णपणे डुंबून गेलो.

३ ई. आरती झाल्यावर ‘ध्यानमंदिरात चैतन्य पसरत आहे’, असे जाणवणे, देहाचे अस्तित्व न्यून होत जाऊन ध्यानावस्थेत जाणे, त्या वेळी केवळ प.पू. भक्तराज महाराज यांचे चरण दिसणे, आज्ञाचक्राच्या ठिकाणी थंडावा जाणवून तो सहस्रारापर्यंत पसरणे आणि भावजागृती होणे : आरती झाल्यावर ‘संपूर्ण ध्यानमंदिरात चैतन्य वेगाने पसरत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मला पुष्कळ आनंदी वाटून ‘त्याच स्थितीत रहावे’, असे वाटत होते. चैतन्याची अधिकाधिक अनुभूती घेण्यासाठी मी भूमीवर बसलो. हळूहळू माझ्या देहाचे अस्तित्व न्यून होत जाऊन मी ध्यानावस्थेत गेलोे. तेव्हा मला केवळ प.पू. भक्तराज महाराज यांचे चरण दिसत होते. ध्यानमंदिरात आल्हाददायक प्रकाश पसरला होता. माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी थंडावा जाणवत होता. तो सहस्रारापर्यंत पसरला. माझे मन पूर्णपणे निर्विचार झाले होते. माझ्या डोळ्यांतून थंड भावाश्रू येत होते. मला आलेली ही सर्वांत आनंददायी अनुभूती मी शब्दांत सांगू शकत नाही.

३ उ. सर्वसाधारणपणे मला १० मिनिटांपेक्षा अधिक वेळ भूमीवर बसता येत नाही; मात्र त्या दिवशी मी एक घंट्यापेक्षा अधिक वेळ बसू शकलो, याचे मला आश्‍चर्य वाटले.

३ ऊ. मी भावावस्थेतून बाहेर आलो, तेव्हा मला पुष्कळ हलके वाटत होते.

मला या आनंददायी अनुभूती दिल्याबद्दल मी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अनिल शेट, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया. (जानेवारी २०१७)

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘बगलामुखी ब्रह्मास्त्र यज्ञा’च्या वेळी श्री. अनिल शेट यांना आलेल्या अनुभूती

१. यज्ञातून प्रचंड प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत असून ‘यज्ञात देण्यात येणारी आहुती श्री दुर्गादेवी स्वीकारत आहे आणि वातावरणातील वाईट शक्ती नष्ट करत आहे’, असे जाणवणे : ‘१२.१.२०१७ या दिवशी रामनाथी आश्रमात ‘बगलामुखी ब्रह्मास्त्र यज्ञ’ होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळे मला तेथे उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. सकाळी ११.३० वाजता मी यज्ञस्थळी गेलो. तेव्हा मला जाणवले, ‘यज्ञातून प्रचंड प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत आहे. यज्ञात देण्यात येणारी आहुती श्री दुर्गादेवी स्वीकारत आहे, तसेच श्री दुर्गादेवी वातावरणातील वाईट शक्ती नष्ट करत आहेे.’

२. यज्ञातून येणार्‍या ज्वाळा सप्त रंगांच्या होत्या. मला त्या ज्वाळा जणू सप्तदेवताच वाटल्या.

३. ‘त्या यज्ञामुळे माझ्या स्थूल आणि सूक्ष्म देहांची शुद्धी झाली’, असे मला जाणवले.

४. त्यानंतर मला हलके वाटले आणि मी बराच वेळ आनंदावस्थेत होतो.’

– श्री. अनिल शेट (जानेवारी २०१७)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF