मुंबई आणि नवी मुंबई येथे २ दिवसांत ६ एक वक्ता हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे यशस्वी आयोजन !

मुंबई, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीकडून मुंबई आणि नवी मुंबई येथे २ दिवसांत ६ ठिकाणी एक वक्ता हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सभांना उत्स्फूर्तपणे मिळालेल्या प्रतिसादावरून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याप्रती धर्मप्रेमींचा असलेला दृढ विश्‍वासच दिसून आला. या सभांचा वृत्तांत येथे देत आहोत.

आढावा बैठकीत चर्चा करताना धर्मप्रेमी

मुलुंड

दैनंदिन जीवन तणावमुक्त होण्यासाठी साधना आणि धर्माचरण केले पाहिजे ! – डॉ. (सौ.) ममता देसाई, सनातन संस्था

मुलुंड – सनातन संस्थेवर खोटे आरोप करण्यात येऊन कालांतराने त्यातील फोलपणा सिद्ध होत आहे. हिंदु धर्मावर दिवसेंदिवस आघात होत असून यावर हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय आहे. यासह दैनंदिन जीवन तणावमुक्त होण्यासाठी साधना आणि धर्माचरण केले पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) ममता देसाई यांनी केले. येथील नानेपाडा शिव-गणेश मंदिर येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत त्या बोलत होत्या. या सभेला ६७ धर्माभिमानी उपस्थित होते. नानेपाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. मधुकर म्हात्रे यांनी मंदिराची जागा त्वरित विनामूल्य उपलब्ध करून दिली.

गोरेगाव

हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! – रोहन पातेने, हिंदु जनजागृती समिती

गोरेगाव – हिंदूंच्या मुली ‘लव्ह जिहाद’ या षड्यंत्राद्वारे पद्धतशीरपणे पळवल्या जात आहेत. हिंदूंच्या गरिबीचा अपलाभ घेऊन, त्यांना आमिषे दाखवून ख्रिस्ती मिशनरी धर्मांतर करत आहेत. या सर्व समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याविना गत्यंतर नाही. यासाठी हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. रोहन पातेने यांनी केले.

श्री संकल्पसिद्धि गणेश मंदिर, मोतीलाल नगर येथील एक वक्ता सभेत ते बोलत होते. या सभेला ६० धर्मप्रेमी उपस्थित होते. सभेनंतरच्या बैठकीत एका धर्मप्रेमी महिलेने तिच्या ‘प्री प्रायमरी स्कूल’मध्ये समितीचे अनेक उपक्रम घेण्याची सिद्धता दर्शवली, तसेच त्यांनी अन्य महिलांना यासाठी उद्युक्त केले. मंदिराचे विश्‍वस्त श्री. लांजेकर, पुरोहित श्री. प्रमोद प्रभूघाटे, गणेश डेकोरेटर आणि शंकर डेकोरेटर, श्रद्धा क्लासेस यांनी या सभेसाठी बहुमोल योगदान दिले.

घाटकोपर

हिंदू संघटित झाले, तर निश्‍चितच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – बळवंत पाठक, हिंदु जनजागृती समिती

घाटकोपर – हिंदू संघटित झाले, तर निश्‍चितच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. हिंदूंना हिणवणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हिंदूंचे संघटन पाहूनच मंदिरात जाऊ लागले आहेत. हिंदूंचे संघटन झाल्याने राजकीय नेतेच हिंदु राष्ट्राची मागणी करतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. बळवंत पाठक यांनी केले.

घाटकोपर (प.) येथील गणेश मंदिराच्या आवारात ३ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. सभेला ५५ धर्माभिमानी उपस्थित होते. सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीत काही धर्मप्रेमींनी ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधातील समितीच्या मोहिमेत सहभागी होण्याची आणि जनजागृती करण्यासाठी दीड ते दोन सहस्र माहितीपत्रकांचे वाटप करण्याची इच्छा व्यक्त केली. काही जिज्ञासूंन ३ सहस्र पत्रके प्रायोजित करणार असल्याचे सांगितले. काही जिज्ञासूंनी त्यांच्या विभागात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.

सभेसाठी भटवाडी येथील आशीर्वाद युवक विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. नवनाथ शेजवळ आणि मंडळाचे पदाधिकारी यांनी जागा उपलब्ध करून दिली. श्री. सुनील बिरमुळे यांनी आसंदी आणि पटल, तर कृष्णा डेकोरेटर्स यांनी ध्वनीयंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून दिली.

जोगेश्‍वरी

हिंदु राष्ट्रामध्ये समान नागरी कायदा असेल ! – रोहन पातेने, हिंदु जनजागृती समिती

जोगेश्‍वरी – हिंदु संतांवर होत असलेले खोटे आरोप, साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासारख्या हिंदुत्वनिष्ठांचा तपासयंत्रणांकडून होणारा नाहक छळ, मंदिरांचे सरकारीकरण केल्यामुळे होत असलेले घोटाळे अशा सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हा एकच उपाय आहे. हिंदु राष्ट्रामध्ये समान नागरी कायदा असेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. रोहन पातेने यांनी केले.

येथील ज्ञानदर्शन सेवा संघ येथे २ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. सभेला ८० धर्माभिमानी उपस्थित होते.

या सभेनंतर झालेल्या बैठकीत शिवसेना शाखा क्रमांक ७७ चे उपशाखाप्रमुख श्री. महेश गवाणकर यांनी धर्मशिक्षणवर्ग घेण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले, तसेच स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. काही धर्माभिमान्यांनी ‘आमच्या विभागातही अशी सभा घ्या’, ही मागणी केली. भाजपचे कोकण विकास आघाडीचे उपाध्यक्ष श्री. सीताराम वाडेकर यांनी ‘दैनिक सनातन प्रभात सर्वांनी चालू करावे’, असे सांगितले. या वेळी उपस्थित धर्माभिमान्यांनी हिंदु धर्मासाठी काय करू शकतो, याविषयी वक्त्यांकडून जाणून घेतले. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष सुनील पवार, शिवसेना गटप्रमुख मनोहर काप आणि सुधीर शिंदे आदी मान्यवर या सभेला उपस्थित होते.

परळ

राममंदिर उभारण्यासाठी हिंदु राष्ट्रच आणावे लागेल ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, मुंबई

परळ – मंदिराच्या पैशांवर डोळा ठेवून मंदिरे कह्यात घेणारे; मात्र अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांना हात न लावणारे सरकार राममंदिर काय उभारणार ? यासाठी आपल्याला हिंदु राष्ट्रच आणावे लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी केले. ते फेरबंदर, कॉटनग्रीन येथील एक वक्ता सभेत बोलत होते. या सभेला ४३ धर्मप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाला सभागृह, ध्वनीव्यवस्था संघर्ष क्रीडा मंडळ यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली, तसेच ‘पुढील कार्यक्रम आपण लवकरच घेऊया’, असे सांगितले. मंडळाचे अध्यक्ष श्री. सुखदेव वामन, श्री. गणेश दंत, श्री. बबन सावंत आणि अन्य पदाधिकारी यांनी या कार्यक्रमास सहकार्य केले.

शिरवणे (नवी मुंबई)

शासनाने धर्मांतरबंदी कायदा आणायला हवा !  – राजेंद्र पावसकर, हिंदु जनजागृती समिती

शिरवणे (नवी मुंबई) – हिंदूंसमोर धर्मांतराचे गंभीर संकट असून उल्हासनगर येथे दीड लक्ष हिंदूंचे ख्रिस्त्यांनी धर्मांतर केले आहे. पनवेलमध्ये २ टक्के ख्रिस्ती वसाहत आहे; परंतु तेथे १६ मोठी चर्च आहेत. त्यामुळे शासनाने धर्मांतरबंदी कायदा आणायला हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पावसकर यांनी केले. ते हनुमान मंदिर, शिरवणे गाव सेक्टर १ येथील एक वक्ता हिंदु जनजागृती सभेत बोलत होते. या वेळी ७५ धर्मप्रेमी उपस्थित होते. या सभेला शिवसेनेचे नगरसेवक श्री. ज्ञानेश्‍वर सुतार आणि शाखाप्रमुख श्री. श्रीकांत भोईर हे उपस्थित होते.

श्री. नरेश भोईर यांनी सभेला लागणारे साहित्य, ध्वनीक्षेपक यंत्रणा विनामूल्य उपलब्ध करून दिली. नगरसेवक श्री. ज्ञानेश्‍वर सुतार यांनी मंदिराचे सभागृह सभेसाठी मिळवून दिले.


Multi Language |Offline reading | PDF