६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला भाग्यनगर (आंध्रप्रदेश) येथील चि. बलराम प्रसन्ना वेंकटापुर (वय १ वर्ष ५ मास) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. बलराम प्रसन्ना वेंकटापुर हा एक आहे !

१. जन्मापूर्वी

१ अ. वैद्यकीय तपासणी होण्यापूर्वीच गर्भवती असल्याचे वाटणे आणि ‘हा विचार भगवंतानेच दिला आहे’, असे जाणवणे : ‘आधुनिक वैद्यांकडे तपासणीसाठी जाण्यापूर्वीच ‘मी गर्भवती आहे’, असे मला वाटत होते; परंतु आधुनिक वैद्यांनी तपासणी केल्यावर तसे निदान झाले नाही. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तपासणी केल्यावर ‘मी गर्भवती होऊन २ मास झाले आहेत’, असे समजले. ‘वैद्यकीय तपासणीत निदान होण्यापूर्वीच मला आणि यजमानांना भगवंतानेच आतून हा विचार दिला’, असे मला वाटले.

१ आ. श्रीरामरक्षास्तोत्र म्हणणे, सनातनच्या ग्रंथात दिल्याप्रमाणे गर्भाला साधनेचा विषय सांगणे आणि अधिकाधिक सेवा करणे : मी प्रतिदिन श्रीरामरक्षास्तोत्र म्हणत असेे. सनातन संस्थेच्या ‘मुलांवर सुसंस्कार कसे करावेत ?’, या ग्रंथात सांगितल्यानुसार मी गर्भाला साधनेचा विषय सांगत होते. मी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा ग्रंथ वाचला. मी ‘रामायण’ हा चित्रपट पहात होते. प्रतिदिन नामजप करायचे आणि स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत होते. मी पूर्णवेळ सेवा करत होते. ‘गर्भावर चांगले संस्कार होण्यासाठी सेवाकेंद्रात राहून सेवा करायची आहे’, असा मी विचार करायचे. भगवंताच्या कृपेने मला सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली.

१ इ. एक दिवस श्रीरामरक्षास्तोत्र म्हणतांना माझी भावजागृती होत होती. तेव्हा ‘गर्भात असलेल्या जिवालाही पुष्कळ आनंद झाला आहे’, असे मला जाणवले.

१ ई. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी विचारपूस केल्याचे कळल्यावर ‘गर्भाला आनंद झाला आहे’, असे जाणवणे : एकदा ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी माझी विचारपूस केली’, असे अन्य साधकांकडून समजल्यावर ‘गर्भाला आनंद होत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा गर्भाने सांगितले, ‘सद्गुरु बिंदाताईंनी आठवण काढली, म्हणजे त्यांनी मला सूक्ष्मातून पाहिले. त्यांची दृष्टी माझ्यावर पडली; म्हणून मला आनंद होत आहे.’

१ उ. सात्त्विक आहार घेण्याची इच्छा होणे : मला सात्त्विक आहार घेण्याची इच्छा होत होती. एकदा मी पावापासून बनवलेला पदार्थ खाल्ल्यानंतर मला पुष्कळ अस्वस्थ वाटले आणि पोटात चांगली स्पंदने जाणवत नव्हती.

१ ऊ. ‘सेवेसाठी साहाय्य करशील ना ?’, असे गर्भाला विचारल्यावर त्याने सकारात्मक प्रतिसाद देणे आणि सेवा करतांना कसलाच त्रास न होणे : गणेशोत्सवाच्या वेळी एकदा मला एके ठिकाणी प्रवचनाच्या सेवेसाठी १ घंटा प्रवास करून जायचे होते. त्या वेळी माझ्या पोटात थोड्याशा वेदना होत होत्या. तेव्हा गर्भाला ‘आतापासूनच मला सेवेत साहाय्य करशील ना ?’, असे विचारल्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मला सेवा करतांना कसलाच त्रास झाला नाही.

१ ए. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना ‘स्वभावदोष न्यून करायचे आहेत आणि नामजप अधिक करायचा आहे’, असे गर्भ सांगत असल्याचे जाणवणे : मी ६ व्या मासात रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करण्यासाठी अन् आश्रमातील चैतन्य अनुभवण्यासाठी आले होते. तेथे एके दिवशी ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना मी गर्भाला विचारले, ‘मी सांगितलेले समजते का ?’ तेव्हा ‘स्वभावदोष न्यून करायचे आहेत आणि नामजप अधिक करायचा आहे’, असे गर्भ मला सांगत असल्याचे जाणवले. यापूर्वी मी गर्भाला काही ना काही सांगत होते; परंतु त्या दिवशी लक्षात आले, ‘गर्भ शिकत आहे.’

१ ऐ. बाळ संतांना भेटण्यासाठी आतुर झाल्याचे जाणवणे : माझी प्रसुती होण्यापूर्वी २ दिवस मला एका संतांचे दर्शन झाले. त्यानंतर २ दिवसांत म्हणजे ७ व्या मासातच माझी प्रसुती झाली. तेव्हा मला वाटले, ‘बाळ संतांना भेटण्यासाठी आतुर झाले होते.’

२. जन्म

२ अ. ‘बाळाचा जन्म शुभदिनी व्हायला पाहिजे’, असे वाटणे आणि बाळाच्या जन्माच्या दिवशी विजयादशमी असल्याचे नंतर समजणे : आम्हा दोघांना (पती-पत्नीला) वाटत होते, ‘बाळाचा जन्म शुभदिनी व्हायला पाहिजे.’ ‘३०.९.२०१७ या दिवशी विजयादशमी होती’, असे बाळाचा जन्म झाल्यानंतर आमच्या लक्षात आले. सण असल्याकारणाने रुग्णालयात कर्मचार्‍यांची संख्या अल्प होती. अकस्मात आलेल्या या शस्त्रकर्मासाठी आधुनिक वैद्यांची सिद्धता नव्हती. मला शस्त्रक्रियागारात नेल्यानंतर कोणतेही औषध न देता सर्वसाधारण प्रसुती झाली.’

– सौ. तेजस्वी वेंकटापुर (आई), भाग्यनगर, आंध्रप्रदेश.

३. जन्मानंतर

३ अ. जन्म ते ३ मास

३ अ १. बाळाचे तिथीनुसार आलेले जन्माक्षर आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेल्या नावातील पहिले अक्षर एकच असणे : ‘एकदा रुग्णालयातून येतांना मला श्री. विनायक शानभाग यांचा भ्रमणभाष आला. त्यांनी बाळाविषयी विचारले. त्यांनी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना बाळाविषयी सांगितले. सद्गुरु काकूंनी बाळाचे नाव ‘बलराम’ ठेवायला सांगितले. नक्षत्रानुसार नावातील पहिले अक्षर ‘ब’ आले होते. सद्गुरु काकूंना तिथीनुसार आलेले अक्षर ठाऊक नव्हते.’ – श्री. प्रसन्ना वेंकटापुर (वडील)

३ अ २. बाळाला स्वतःच्या छातीवर झोपवल्यानंतर एकाग्रतेने नामजप होऊन उपाय होत असल्याचे जाणवणे आणि भक्तराज महाराज अन् परात्पर गुरु यांचे अस्तित्व जाणवणे : ‘बाळाला आईची ऊब मिळावी’, या हेतूने मी ‘कांगारू मदर केयर थेरेपी’ (बाळाला आईच्या छातीवर झोपवणे) करत होते. त्या वेळी मी नामजप, प्रार्थना आणि आरती म्हणत असे. त्या वेळी बलराम ते शांतपणे ऐकत असे. बलरामला माझ्या शरिरावर झोपवल्यावर माझा नामजप एकाग्रतेने होऊन पुष्कळ वेळा माझी भावजागृतीही होत असे. माझ्यावर उपाय होत असल्याचे मला जाणवायचे. काही वेळा मला प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवत असे.’ – सौ. तेजस्वी वेंकटापुर

३ अ ३. त्रास होत असूनही परात्पर गुरुदेवांच्या छत्रछायेखाली असल्यामुळे आनंदी आणि समाधानी असल्याचे जाणवणे : बलराम ‘एन्आयसीयू’मध्ये असतांना त्याला प्रतिदिन इंजेक्शन देत होते, तसेच नियमितपणे त्याच्या रक्ताच्या आणि इतर चाचण्या केल्या जात होत्या. तेव्हा त्याला पुष्कळ त्रास होत असे; मात्र त्याला पाहिल्यावर ‘तो परात्पर गुरुदेवांच्या छत्रछायेखाली असल्यामुळे आनंदी आणि समाधानी आहे’, असे आम्हाला वाटत असे. ‘अन्य बाळांच्या तुलनेत तो पुष्कळ शांत आहे आणि त्रास देत नाही’, असे तेथील कर्मचार्‍यांनी सांगितले.

३ अ ४. रुग्णालयातून रामनाथी आश्रमात येतांना वानरे  दिसणे : १७.१२.२०१७ या दिवशी रुग्णालयातून बलरामला घेऊन आश्रमात येतांना आम्हाला वाहनासमोर ३ – ४ वानरे दिसली.     

– श्री. प्रसन्ना आणि सौ. तेजस्वी वेंकटापुर

३ आ. वय ३ मास ते १ वर्ष

३ आ १. भाग्यनगर येथे आल्यानंतर पुन्हा वैद्यकीय चाचण्या केल्यावर ‘थायरॉईड’ तपासणीमधील एका घटकाचे प्रमाण अल्प असल्याचे लक्षात येणे आणि केवळ १५ दिवसांत त्याच्यातील तो घटक सामान्य स्थितीत येणे : आम्ही फेब्रुवारी मासात घरी (भाग्यनगर येथे) आल्यानंतर येथील आधुनिक वैद्यांनी बलरामच्या वैद्यकीय चाचण्या पुन्हा केल्या. त्या वेळी ‘थायरॉईड’ तपासणीमधील एका घटकाचे प्रमाण अल्प होते. ‘ते तसेच राहिले, तर बलरामची वाढ नीट होणार नाही. त्यासाठी पुन्हा उपचार करावे लागतील’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले आणि एका सप्ताहानंतर पुन्हा ‘थायरॉईड’ तपासणी करायला सांगितली. आधुनिक वैद्यांनी सांगितल्यानंतर केवळ १५ दिवसांत त्याच्यातील तो घटक सामान्य स्थितीत आला होता.

बलरामच्या संदर्भात पुष्कळ वेळा लक्षात आले, ‘त्याच्यावर काही उपचार करायला सांगितले जातात; परंतु ते करण्यापूर्वीच त्याची व्याधी बरी होते.’

३ आ २. घर पाचव्या माळ्यावर असूनही आगाशीत मोर येणे : आमचे घर ५ व्या माळ्यावर आहे. घरासमोरील उद्यानात मोर आहेत. एक दिवस घराच्या आगाशीत एक मोर आला होता. ‘एवढ्या उंचावर मोर आला आहे’, हे पाहून आम्हाला पुष्कळ आश्‍चर्य वाटले.

काही दिवसांनंतर रात्री एक पक्षी बलरामच्या खोलीत आला होता.

३ आ ३. बलराम सर्वांकडे जातो. तो त्यांना पाहून बोलण्याचा प्रयत्न करतो.

३ आ ४. स्वावलंबी : तो स्वतःचे काम स्वतःच करण्याचा प्रयत्न करतो. एकदा तो पाळण्यात बसला असतांना त्याचे खेळणे खाली पडले. तेव्हा तो ते उचलण्याचा प्रयत्न करत होता.

३ आ ५. सतर्कता : तो कुठेही बसतांना ‘स्वतःला लागणार नाही’, हे लक्षात घेऊन बसतो.

३ आ ६. समंजस

अ. बलरामला भूक लागल्यास किंवा झोप येत असेल, तरच तो रडतो. तो एकटाच शांतपणे खेळतो.

आ. तो स्नान करतांना रडत नाही. एकदा त्याला पाणी भरलेल्या बालदीत बसवल्यावर तो न घाबरता खेळत होता.

इ. तो कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करत नाही. त्याला एखादी वस्तू किंवा भोजन नको असेल, तर तो मान हलवतो. त्याला एखादे खेळणे मिळाले नाही, तर तो दुसरे खेळणे घेऊन खेळतो. तो स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूंशी खेळतो. त्याला ‘एखाद्या वस्तूशी खेळू नको’, असे सांगितल्यास तो लक्ष देऊन ऐकतो.

ई. त्याला काही सांगितल्यास ते त्याच्या त्वरित लक्षात येते. आम्ही दोघे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवेसाठी जात असतांना तो झोपला होता. मी त्याला शांत रहायला सांगितले. तो दिवसभर आजी-आजोबांसह शांत राहिला.

३ आ ७. भ्रमणभाषवर लावलेले भजन किंवा नामजप बंद केल्यावर तो त्याच्या भाषेत गाणे म्हणून दाखवतो.

३ आ ८. देवपूजेची आवड : त्याचे आजोबा (तेजस्वीचे वडील) प्रतिदिन सकाळी आणि सायंकाळी पूजा करतात. बलराम प्रतिदिन पूजेच्या वेळी देवघरात जातो. तो देवाला वाहायच्या सर्व फुलांना हात लावतो. उदबत्ती लावल्यानंतर ‘आरती करायची आहे’, हे तो टाळ्या वाजवून आमच्या लक्षात आणून देतो. तो पूजा होईपर्यंत आजोबांजवळ थांबतो. तो पूजेच्या वेळी झोपला असल्यास मंत्रांचे उच्चार ऐकून उठतो आणि देवघरात जातो.

३ आ ९. ‘अन्नप्राशन’ विधीच्या वेळी त्याने प्रथम ‘विष्णुसहस्रनाम’ या ग्रंथाला हात लावला आणि नंतर ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाला स्पर्श केला.

३ आ १०. सात्त्विक गोष्टींची आवड

अ. तो मोरपीस, सनातन पंचांग, देवतांची चित्रे, प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे, देवघरातील वस्तू आणि दैनिक सनातन प्रभात हे पाहून अन् नामजप, भजने आणि भाववृद्धी सत्संगातील सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आवाज ऐकल्यावर हसतो.

आ. तो श्रीकृष्णाचे चित्र आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र यांची पापी घेतो अन् त्यांच्याशी बोलतो.

इ. तो आश्रमातील सात्त्विक वातावरणात शांतपणे झोपतो.

ई. तो मंगळूरू येथील सनातनचे बालक संत पू. भार्गवराम प्रभु यांच्या पालकांनी दिलेल्या खेळण्यांशी अधिक वेळ खेळतो.

३ आ ११. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता

अ. तो लाल आणि काळा धागा यांपैकी ‘कोणता धागा सात्त्विक आहे ?’, हे सांगतो.

आ. घरात कुणी असात्त्विक मुले आल्यास तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.

इ. ‘शांत, आनंद आणि कृतज्ञता’ अशा शब्दांचा उच्चार केल्यावर तो हसतो. ‘रज-तम, माया’ असे शब्द उच्चारल्यावर तो गंभीर होतो.

ई. एकदा माझे मोठे काका तेलुगू भाषेतील एक भक्तीगीत गात होते. तेव्हा तो आनंदाने आणि एकाग्रतेने ऐकत होता. त्याच वेळी एका मुलीने चित्रपटातील गाणे गायला आरंभ लागल्यावर तो लगेच रडू लागला.

३ आ १२. चि. बलराम याच्या प्रथम वाढदिवसाच्या दिवशी पाऊस पडल्यावर ‘वरुणदेवतेने आशीर्वाद दिला’, असे वाटणे आणि पुष्कळ पाऊस असूनही त्याने त्रास न देणे : १७.१०.२०१८ या दिवशी बलरामचा तिथीनुसार प्रथम वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवसाच्या आधी आणि नंतर पाऊस नव्हता; परंतु वाढदिवसाच्या वेळी पुष्कळ पाऊस पडला. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘वरुणदेवतेने आशीर्वाद दिला.’ त्या दिवशी पुष्कळ पाऊस असूनही त्याने काही त्रास झाला नाही. वाढदिवसाला पुष्कळ लोक आले असूनही बलराम रडला नाही. तो सर्वांकडे जात होता.

३ आ १३. आतापर्यंत पू. भार्गवराम यांनी वापरलेले कपडे अन् अंथरुणे वापरण्याचे आणि खेळण्यांशी खेळण्याचे भाग्य बलरामला लाभले आहे. ‘बलरामला संतांचे चैतन्य मिळाले’, असे आम्हाला वाटले.’

– श्री. प्रसन्ना आणि सौ. तेजस्वी वेंकटापुर

४. बलरामच्या जन्मानंतर झालेले पालट

अ. ‘बलरामच्या वेळी मी गर्भवती असल्यापासून मला होणारा शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून झाला.

आ. माझे केस गळण्याचे प्रमाण न्यून झाले आहे.

इ. त्याच्या जन्मानंतर माझे माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले पालट झाले आहेत. सासरी त्रासाचे प्रमाण न्यून झाले आहे आणि माहेरच्या वातावरणात सकारात्मक पालट झाले आहेत.

ई. मी पूर्णवेळ साधिका झाल्यापासून माझे वडील रामनाथी आश्रमात आले नव्हते. त्यांचा माझ्या साधनेला विरोध होता. बलरामचा जन्म झाल्यानंतर त्याला पहाण्याच्या निमित्ताने त्यांनाही आश्रम आणि संत यांचे दर्शन झाले. त्यांना आश्रम पुष्कळ चांगला वाटला.’

– सौ. तेजस्वी वेकंटापुर

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘हे परम दयाळू गुरुदेवा, आम्हाला प्रसादाच्या रूपाने असे गुणसंपन्न बालक देऊन आमच्यावर कृपा केल्याबद्दल आम्ही आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आम्ही या बालकाचे संगोपन आणि त्याच्यावर योग्य संस्कार करायला असमर्थ आहोत. ‘हे गुरुदेवा, आपणच आम्हाला शक्ती द्या आणि आमची साधनेची गती वाढवण्यासाठी प्रयत्न करवून घ्या’, अशी आपल्या कोमल चरणी आर्त प्रार्थना आहे.’

– श्री. प्रसन्ना आणि सौ. तेजस्वी वेंकटापुर (३.१.२०१९)

चि. बलराम वेंकटापुर याचा भाग्यनगर येथील सेवाकेंद्रात सत्कार !

चि. बलरामला भेटवस्तू देऊन त्याचा सत्कार करतांना श्री. जनार्दन शेट्टी समवेत सौ. तेजस्वी वेंकटापुर

भाग्यनगर, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील सनातनच्या भाग्यनगर सेवाकेंद्रातील साधकांना ३ फेब्रुवारी या दिवशी गुरुकृपेने एक आनंदवार्ता मिळाली. भाग्यनगर येथील सनातनचे साधक श्री. प्रसन्ना वेंकटापुर यांचा १ वर्ष ५ मासांचा पुत्र चि. बलरामने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून तो महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आला असल्याचे घोषित करण्यात आले. एका अनौपचारिक सोहळ्यात ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मीना कदम यांनी उपस्थितांना ही आनंदवार्ता दिली. या वेळी चि. बलरामचे वडील श्री. प्रसन्ना वेंकटापुर, आई सौ. तेजस्वी आणि आजी (आईची आई) सौ. जानकी माडभूषी, तसेच भाग्यनगर अन् इंदूर (निजामाबाद) येथील साधक उपस्थित होते. या वेळी विशाखापट्टणम् येथील साधकांना दूरभाषद्वारे जोडण्यात आले होते.

सनातनचे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. जनार्दन शेट्टी यांनी चि. बलरामला भेटवस्तू देऊन त्याचा सत्कार केला. चि. बलरामची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर त्याची आई, वडील आणि आजी, तसेच अन्य साधक यांनी त्यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये सांगितली. मनोगत व्यक्त करतांना गुरूंप्रती कृतज्ञताभाव जागृत झाल्याने बलरामची आई आणि आजी यांना भावाश्रू आले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ. विनुता शेट्टी यांनी केले.

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक 


Multi Language |Offline reading | PDF