देवाची आवड असलेला ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. ईशान मेहता (वय ३ वर्षे) !

चि. ईशान मेहता याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. ईशान मेहता हा एक आहे !

(‘वर्ष २०१७ मध्ये ईशानची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)

चि. ईशान याचा माघ शुक्ल पक्ष द्वितीया (६.२.२०१९) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या आजीला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. ईशान मेहता

१. उत्तम स्मरणशक्ती

‘चि. ईशानला बहुतेक श्‍लोक पाठ आहेत. पूजेच्या वेळी तो श्‍लोक गुणगुणत असतो. विशेष म्हणजे त्याला गायत्री मंत्र कोणीही शिकवला नाही, तरीही तो स्वतःहून म्हणतो. त्याला मारुतिस्तोत्र, ‘वदनी कवळ घेता ।’ पाठ असून श्रीरामरक्षास्तोत्र अन् श्रीकृष्णाष्टकम् यांतील काही श्‍लोक म्हणता येतात.

२. प्रेमळ

अ. तो त्याला दिलेला खाऊ इतरांना देतो आणि नंतर स्वतः खातो. मी त्याला काही खाऊ भरवत असेन, तर तो प्रथम त्याच्या खेळण्यांना खाऊ भरवायला सांगतो. थंडी वाजते; म्हणून तो त्याच्या खेळण्यांना स्वतःचा टी-शर्ट घालतो.

आ. तो प्रतिदिन सकाळी मला औषधाची आठवण करून देतो आणि मी औषधाच्या गोळ्या तोंडात टाकेपर्यंत तिथून जात नाही.

इ. ईशानला सर्वांविषयी प्रेम वाटते. त्याला त्याचे देवद आश्रमातील आजोबा (डॉ. प्रवीण मेहता), रामनाथी आश्रमातील त्याचे काका-काकू आणि ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली त्याची चुलत बहीण भक्तीताई यांची आठवण आली की, तो त्वरित त्यांना भ्रमणभाष लावण्यास सांगतो.

३.  देवाची आवड

३ अ. देवपूजेची आवड : ईशान सकाळी उठल्यावर प्रातःर्विधी आटोपून त्वरित स्नान करतो. मी देवपूजा करण्यास आरंभ केल्यावर ‘मला देवाला स्नान घालायचे आहे आणि माझे स्नान झाल्याविना मी देवाला स्नान घालणार नाही’, असे तो सांगतो. त्याप्रमाणे स्वतः लवकर स्नान करून पूजेसाठी सिद्ध होतो. पूजा करत असतांना ‘देवालाही कपडे घाल’, असे म्हणून देवाला वस्रे घालण्यास सांगतो. तो स्वतः देवाला फुले अर्पण करतो. त्या वेळी ‘देवाला फूल कसे वहायचे ?’ हे तो विचारून घेतो.

३ आ. भावपूर्ण पूजा करणे : तो मला प्रतिदिन २ उदबत्त्या लावण्यास सांगतो. पूजा करतांना मी काही विसरल्यास मला त्याची लगेच आठवण करून देतो. तो पूजेनंतर देवाचे तीर्थ आवर्जून पितो आणि पूजेनंतर हात जोडून श्रीकृष्ण अन् सद्गुरु यांचा श्‍लोक म्हणतो. तो पूजेच्या शेवटी देवाला साष्टांग नमस्कार करतो आणि ‘सर्वांना सुखी ठेव. मला समाधानी ठेव’, अशी देवाला प्रार्थना करतो.

३ इ. प्रतिदिन जैन मंदिरात जाणे : ईशान सकाळी देवपूजेनंतर नित्यनेमाने मला समवेत घेऊन सोसायटीतील जैन मंदिरात जातो. एखाद्या दिवशी मी काही कारणास्तव जाण्याचे विसरल्यास तो मला आठवण करून देतो. तो मंदिरात प्रवेश केल्यावर तेथील केशर तिलक लावण्यास सांगतो. कधी मंदिरात जाण्यास विलंब झाला, तर पूजेसाठी आलेले भाविक ‘आज तुला विलंब झाला का ?’, असे त्याला विचारतात. तो मंदिरात जातांना भेटणार्‍या ओळखीच्या व्यक्तींना हात जोडून ‘‘जय श्रीकृष्ण’’ असे म्हणतो.

३ ई. देवाशी बोलणे : तो देवळात मूर्तीचेे दर्शन केल्यानंतर ‘बाप्पा मी आलो आहे. तू सर्वांना सुखी ठेव. मला सद्बुद्धी दे. मला लवकर लवकर मोठा कर. समाधानी ठेव’, अशी प्रार्थना करतो. त्या वेळी तो पुढील श्‍लोक म्हणतो, ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।’ म्हणजे ‘सर्व सुखी आणि निरोगी होवोत.’ त्यानंतर तो माझा हात धरून मूर्तीला प्रदक्षिणा घालतो. तो मंदिरातील दानपेटीत अर्पण करण्यासाठी माझ्याकडे पैसे मागतो.

३ उ. तो सायंकाळी देवाला दिवा लावल्यावर ‘शुभं करोति’ म्हणून घरातील सर्व मोठ्या माणसांना नमस्कार करतो.

४. उपायांचे गांभीर्य असणे

ईशान सकाळी स्नानानंतर स्वतः कापूर आणि अत्तर यांचे उपाय करतो अन् मलाही ते करण्याची आठवण करतो.

५. गुरुदेवांप्रती भाव

ईशान देवाला फुले वाहतांना ‘‘मी परम पूज्य आजोबांना (परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांना) फूल वाहणार’’, असे म्हणतो. ‘त्याचा आध्यात्मिक स्तर वाढला असावा’, असे वाटते.’

– सौ. माधुरी प्रवीण मेहता (चि. ईशानची आजी (वडिलांची आई)), पुणे (२१.१२.२०१८)


Multi Language |Offline reading | PDF