पुन्हा अण्णा !

संपादकीय

अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे पुन्हा एकदा उपोषण चालू केले आहे. या वेळी त्यांनी महाराष्ट्रात लोकायुक्तांची नेमणूक करण्यासमवेत मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याची मागणी केली आहे. तसेच स्वामीनाथन् आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, यासह अन्य मागण्याही केल्या आहेत. मुळात लोकायुक्तांची नेमणूक करावी अशी मागणी करण्याची आवश्यकताच नव्हती. ते सरकारने त्याचे कर्तव्य म्हणून करायला हवे होते, तसेच ‘आम्ही शुद्ध आहोत आणि भ्रष्टाचार करत नाही’, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे पद स्वतःहून लोकायुक्तांच्या कक्षेत आणत आहोत’, असे घोषित करायला हवे होते; मात्र सरकारने तसे केले नाही. अण्णा हजारे यांच्यामुळेच लोकपाल अस्तित्वात आल्याने पुन्हा त्यांनीच लोकायुक्तांच्या नेमणुकीसाठी पुढाकार घेऊन मागणी केली. ती मान्य न झाल्याने उपोषण चालू केले असून त्यांच्या उपोषणाला ७ दिवस झाले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी ते उपोषण करत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. अण्णा यांनी आंदोलन केल्यामुळेच देशात लोकपाल विधेयक संमत झाले; मात्र त्यानुसार लोकायुक्तांची नेमणूक होणे अपेक्षित असतांना ते जाणीवपूर्वक सर्वच राजकीय पक्षांनी टाळले. लोकायुक्तांमुळे भ्रष्टाचार उघड होत राहील. यामुळे कोणताही राजकीय पक्ष लोकायुक्तांची नेमणूक करण्याचा प्रयत्न करत नाही, हे जनतेच्या समोर आले. दुसरे म्हणजे लोकपाल आणि लोकायुक्त यांमुळे जनतेला काय लाभ होणार आहे आणि राज्यकर्त्यांवर त्याचा कसा वचक बसणार आहे, याविषयीच जनतेला विशेष माहिती नाही. त्यामुळे जनताही अण्णांचे देहली येथील आंदोलन झाल्यावर हे सूत्र विसरून गेली. तसेच अण्णाही मधल्या काळात विशेष सक्रीय दिसले नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. ‘आता निवडणूक जवळ आल्यावर अण्णा आंदोलन करू लागले आहेत कि काय’, असेही जनतेला वाटत आहे; कारण पूर्वीच्या तुलनेत या उपोषणाकडे प्रसारमाध्यमांनी हवे तसे लक्ष दिलेले नाही. तसेच सत्ताधारी पक्षानेही आणि प्रारंभी विरोधी पक्षांनीही त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या उपोषणाला ‘वलय’ मिळालेले नाही; मात्र ५ दिवस झाल्यावर शिवसेना आणि मनसे यांनी उपोषणाला समर्थन दिले आहे. राज ठाकरे यांनी तर ‘अण्णा जगले काय किंवा ते मेले काय, याचे सत्ताधार्‍यांना दुःख होणार नाही. त्यामुळे त्यांनी उपोषण मागे घ्यावे’, असे म्हटले आहे. तसेच ‘अण्णांच्या लोकपालाविषयीच्या आंदोलनामुळेच मोदी आणि केजरीवाल सत्तेवर आले. या दोघांनी अण्णांचा वापर करून घेतला’, अशी जहाल टीकाही केली आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्ष भाजपने ‘आम्ही अण्णांच्या ९० टक्के मागण्या मान्य केल्या’, असे म्हटले आहे. त्यावर अण्णांनीही प्रत्युत्तर देतांना ‘मागण्या मान्य केल्या असत्या, तर मी उपोषण का चालू केले असते ?’, असे म्हटले आहे. उपोषण करण्यापूर्वी अण्णा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४ वेळा पत्र लिहिले होते आणि त्यांनी त्यांच्या मागण्या सांगितल्या होत्या. या पत्रांना मोदींकडून उत्तर मिळाले नाही. शेवटच्या पत्राला उत्तर देतांना मोदी यांनी ‘तुम्हाला शुभेच्छा’ इतकेच लिहून पाठवले, असे अण्णा यांनी पत्रकारांना सांगितले. यावरून अण्णा यांना, ‘मोदी यांनी माझ्या मागण्या आणि लोकायुक्त यांना किती महत्त्व दिले आहे, हे लक्षात येते’, हेच सांगायचे आहे.

धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेसाठी प्रयत्न करावेत !

अण्णा हजारे यांच्यामुळे या देशात ‘माहिती अधिकारा’चा अधिकार जनतेला मिळाला. यासाठी अण्णांनी अनेक वर्षे लढा दिला. उपोषण केले. अण्णांच्या लढ्यामुळेच लोकपाल विधेयक संमत झाले. भारतात लोकशाही आहे; मात्र लोकशाहीतील राज्यकर्ते लोकांचे प्रतिनिधी होण्याऐवजी लोकांचे मालक झाले आहेत. त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी अण्णांसारख्या अराजकीय व्यक्तीकडून प्रामाणिक प्रयत्न होत आहेत. अण्णांसारखे प्रयत्न लोकशाहीतील एकाही राजकीय पक्षाकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून  गेल्या ७० वर्षांत झालेले नाही. संघ किंवा अन्य पुरोगामी संघटना यांनीही असे ठोस आणि चिकाटीचे प्रयत्न कधी केलेलेच नाहीत. अण्णांची विविध आंदोलने ही तत्कालीन राज्यकर्त्यांच्या विरोधात झाल्याने तेव्हाच्या विरोधी पक्षांना अण्णांच्या आंदोलनांचा लाभ झाला आणि तो लाभ त्यांनी जाणीवपूर्वक उठवला. मग ते भाजप असो कि या आंदोलनामुळे स्थापन झालेला आम आदमी पक्ष असो. आताही अण्णांच्या उपोषणाचा काही जण लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळेच अण्णाही, ‘आता देशातील सत्ता पालटून परिवर्तन होणार नाही. इथली व्यवस्था पालटायला हवी’, असे आता म्हणू लागले आहेत. म्हणजेच जे सनातन गेली अनेक वर्षे सांगत आहे, तेच आता अण्णांना वाटू लागले आहे. अण्णा सात्त्विक आहेत. ते कर्मयोगी आहेत. राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात राहून ते जीवन व्यतित करत आहेत. त्यांच्यातील साधनेमुळेच आता त्यांना सध्याच्या स्थितीवर काय उपाय असायला हवा, ते लक्षात येऊ लागले आहे, ही चांगली गोष्ट आहे. आता त्यांनी याच दृष्टीने प्रयत्न करून संपूर्ण व्यवस्था पालटण्यासाठी त्यांचे आंदोलन चालू करायला हवे. चांगली व्यवस्था निर्माण करण्यासाठी जुनी व्यवस्था पालटायला हवी. त्यासाठी साधकांचे संघटन उभारणे आवश्यक आहे. तसेच संतांच्या मार्गदर्शनाखाली कृती करणे आवश्यक आहे. सध्याची व्यवस्था निधर्मी असल्याने तेथे धर्माचे अधिष्ठानच नाही. त्यामुळे धर्माचे अधिष्ठान असणारी व्यवस्था हवी. ‘मनुष्याला त्याचे लौकीक आणि पारलौकीक जीवन जगण्यासाठीची योग्य परिस्थिती असणारी व्यवस्था म्हणजे धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था होय’, अशी या व्यवस्थेची व्याख्या करता येईल. यात धर्माचरण करणारे राज्यकर्ते आणि जनता, तसेच त्यांच्यावर योग्य संस्कार करणारी शिक्षणव्यवस्था असेल. साधनारत अण्णा यांनी यासाठी प्रयत्न करावेत, असेच येथे त्यांना सांगावेसे वाटत आहे. याचा त्यांनी विचार करावा !


Multi Language |Offline reading | PDF