माझ्या मागण्या मान्य झाल्याचे सांगणारे राज्य सरकार खोटारडे ! – अण्णा हजारे

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस

सरकारविरुद्ध अण्णा हजारे यांचे हे म्हणणे सरकारची निष्क्रीयताच दर्शवते. यावरून सरकारच्या एकातरी विधानावर विश्‍वास ठेवता येईल का, असा प्रश्‍न पडतो !

नगर – राज्य सरकार म्हणत आहे की, माझ्या ९० टक्के मागण्या मान्य झाल्या आहेत; परंतु हे सरकार खोटारडे आहे. माझ्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. मागण्या मान्य झाल्या असत्या, तर मी कशाला उपोषणाला बसलो असतो ? मागण्या मान्य होऊन उपोषणाला बसायला मी वेडा आहे का ?, अशा शब्दांत समाजसेवक अण्णा हजारे यांनी संताप व्यक्त केला. सरकारने लोकपालाची नियुक्ती करावी, या मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या सहाव्या दिवशी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अण्णा हजारे पुढे म्हणाले की, सध्या सत्तेत असलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांच्या बाकावर बसले होते, तेव्हा या लोकांनी लोकपालसाठी रान पेटवले होते; परंतु सत्तेत आल्यानंतर हे सगळे नेते गप्प का ? तेव्हाचे विरोधक सत्तेत आल्यावर आता गद्दारी करत आहेत. या सरकारवर माझा विश्‍वास राहिलेला नाही. सरकार मागण्या मान्य करत नाही, तोवर उपोषण चालूच ठेवणार आहे. लोकपालच्या आंदोलनामुळे भाजपला सत्ता मिळाली; परंतु आता त्यांना माझ्या आंदोलनाचा विसर पडला आहे. त्यामुळे आता देशातील सत्ता पालटून परिवर्तन होणार नाही, इथली व्यवस्था पालटायला हवी.


Multi Language |Offline reading | PDF