‘सनातन संस्कृती, परंपरा आणि संस्कार’ यांचा त्रिवेणी संगम साधून त्रिवेणी संगमावर संतांचे भावपूर्ण राजयोगी स्नान !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

  • प्रयागराज येथे दुसरे राजयोगी स्नान १३ आखाड्यांची वाजतगाजत भव्य शोभायात्रा

  • मौनी अमावास्येच्या दिवशी सायंकाळी ५ पर्यंत ५ कोटी भाविकांचे गंगानदीत स्नान

श्री. सचिन कौलकर, कुंभमेळा विशेष प्रतिनिधी

जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय मंत्री १. श्री महंत परशुरामगिरी महाराज स्नान करतांना
स्नान करतांना सहज ध्यान योगच्या योगिनी श्री शैलजानंदगिरी देवी
त्रिवेणी संगमाच्या घाटावर भाविकांनी केलेली प्रचंड गर्दी

श्री. शैलेश पोळ, कुंभमेळा विशेष छायाचित्रकार

प्रयागराज (कुंभनगरी), ४ फेब्रुवारी – कुंभमेळ्यात मौनी अमावास्येच्या दिवशी दुसर्‍या महास्नानाचे पर्व चालू झाले. आज स्नानाच्या दिवशी गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर १३ आखाड्यांतील संत, महामंडलेश्‍वर, महंत, नागा संन्यासी, साधू यांनी ‘सनातन संस्कृती, परंपरा आणि संस्कार’ यांचा त्रिवेणी संगम साधून भावपूर्ण वातावरणात राजयोगी स्नान केले, तसेच ३ कोटी भाविकांनी ‘हर हर महादेव, हर हर गंगे, जय गंगा मैया की’, असा जयघोष करून त्रिवेणी संगमासह एकूण८ किलोमीटर परिसरातील ४० घाटांवर स्नान केले. विश्‍वातील सर्वांत मोठ्या आध्यात्मिक आणि धार्मिक प्रयागराज कुंभमेळ्यातील त्रिवेणी संगमावर डुबकी घेण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला. सर्वप्रथम पहाटे अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अग्नि आखाड्याने वाजतगाजत शोभायात्रा काढून आखाड्यांतील संत, महंत यांनी राजयोगी स्नान केले.

१. ३ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता मौनी अमावास्येला प्रारंभ झाल्यानंतर भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान करण्यास प्रारंभ केला.

२. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कायदामंत्री ब्रजेश पाठक यांनी गंगास्नान केले. ब्रजेश पाठक यांनी ‘वर्ष २०१९ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर येईल’, असे सांगून ‘देश आणि प्रदेश येथे शांती आणि समृद्धी रहावी’, अशी प्रार्थना केली. (आध्यात्मिक ठिकाणीही श्रद्धा, भाव ठेवण्याऐवजी सत्तेची लालसा ठेवणार्‍या अशा लोकप्रतिनिधींवर शिव आणि गंगामाता यांची कधीतरी कृपा होईल का ? – संपादक)

३. संतांचे राजयोगी स्नान पहाण्यासाठी भाविक आतुरतेने वाट पहात होते. सकाळपासून संतांनी राजयोगी स्नान करण्यापूर्वी फुलांनी सजवलेल्या वाहनांतून शोभायात्रा काढली. त्या वेळी भाविकांनी ‘हर हर महादेव, हर हर गंगे’, असा जयघोष करून संतांचे स्वागत करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

४. १२ आखाड्यांतील संतांना राजयोगी स्नानासाठी ४० मिनिटे देण्यात आली होती. आखाड्यांतील संतांनी राजयोगी स्नान केल्यानंतर लगेच २० मिनिटांत घाटाची स्वच्छता करण्यात येत होती.

५. संन्यासी, वैरागी आणि उदासीन अशा ३ वर्गांत १३ आखाड्यांची विभागणी करण्यात आली आहे. सर्वप्रथम संन्यासी आखाड्यांतील संतांनी राजयोगी स्नान केले, त्यानंतर वैरागी आणि शेवटी उदासीन अंतर्गत येणार्‍या आखाड्यांतील संतांनी राजयोगी स्नान केले.

६. सर्वप्रथम सकाळी ६.१५ वाजता संन्यासी आखाड्यांतील संत-महंतांनी राजयोगी स्नान केले. यामध्ये प्रथम श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि पंचायती अटल आखाडा यांतील संतांनी त्रिवेणी संगमावर राजयोगी स्नान केले. त्यानंतर निरंजनी आणि आनंद आखाडा, जुना, अग्नि आणि आवाहन आखाड्यांतील संतांनी राजयोगी स्नान केले. यानंतर वैरागी आखाड्यांतील संतांनी राजयोगी स्नान केले. या आखाड्यांच्या अंतर्गत पंच निर्मोही अग्नि आखाडा, दिगंबर अग्नि आखाडा, पंच निर्वाणी अग्नि आखाड्यांतील संतांनी राजयोगी स्नान केले. त्यानंतर उदासीन आखाड्यातील संतांनी राजयोगी स्नान केले. या आखाड्याला सर्वाधिक १ घंटा वेळ देण्यात आला होता.

७. शोभायात्रा निघत असतांना, तसेच संत राजयोगी स्नान करत असतांना प्रशासनाच्या वतीने हेलिकॉप्टरमधून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

८. राजयोगी स्नानाच्या वेळी विदेशातील भाविकांनीही उत्साहाने शोभायात्रेत भाग घेतला.

९. सकाळपासूनच बस आणि रेल्वे स्थानक येथे भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येत होती. अलोपीबाग चौराह, हर्षवर्धन चौराह, मिंटो पार्क गेट, नैनी क्षेत्र, देवरख आणि झूंसी येथे भाविकांची प्रचंड गर्दी होती.

१०. कुंभमेळ्यात काही ठिकाणी रस्ते बंद करण्यात आल्याने भाविकांना इतर मार्गाने चालत घाटावर यावे लागले. याचा त्यांना त्रास झाला. भाविकांचे पोलीस ऐकत नसल्याने त्यांनी खेद व्यक्त केला, तर काही ठिकाणी भाविक आणि पोलीस यांच्यात वादावादीचे प्रसंगही घडले.

११. त्रिवेणी संगमावर छायाचित्रे काढण्यावरून छायाचित्रकार आणि पोलीस यांच्यातही बाचाबाची झाली.

१२. पोलीस, राज्य राखीव दलाचे पोलीस, केंद्रीय कमांडोचे पथक आदींनी सर्व ठिकाणी बंदोबस्त ठेवला होता.

१३. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या श्री संप्रदाय यांच्या वतीने आरोग्याचे फिरत्या पथकांद्वारे घायाळ, आजारी भाविकांवर उपचार करण्यात आले, तर २ दिवसांपासून काही आखाड्यांतील भंडारे (महाप्रसाद) २४ घंटे चालू होते.

१४. मौनी अमावास्येच्या दिवशी नेपाळ, जर्मनी, कॅनडा, इटली, ऑस्ट्रेलिया आणि रशिया येथून मोठ्या प्रमाणात साध्वींचे आगमन झाले होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ठिकठिकाणी ग्रंथ प्रदर्शन !

कुंभमेळ्यात आध्यात्मिक प्रसार करण्याच्या उद्देशाने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ठिकठिकाणी ग्रंथांचे छोटे प्रदर्शन लावण्यात आले होते. याला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

मौनी अमावास्या : एक महिमा आणि दुर्लभ तिथी !

मौनी अमावास्या या नावावरून तिचा अर्थ सहजपणे समजतो. ‘मौनी’ शब्दांचा विचार केला, तर ‘म’ अक्षर हे वाणीचे द्योतक आहे. ‘न’ शब्दाचा अर्थ म्हणजे ‘नाही’. ज्या वेळी वाणी नसते म्हणजे बोलले जात नाही ती अवस्था ‘मौन’ समजली जाते. ‘मौना’मुळे मनाची एकाग्रता सहजपणे साधली जाते. याच्यापासून योग, व्रत, उपासना आदी आध्यात्मिक कार्यात ‘मौन’ रहाणे मोठे महत्त्वपूर्ण मानले जाते. या व्रताचा अभ्यास १, ३, ६, ८ अथवा १२ दिवस करण्याचा नियम आहे. ‘मौन व्रता’चे पालन केल्यानंतर मनाची एकाग्रता साध्य होते आणि त्यामुळे सर्व कार्य पूर्णत्वाला जाते.

‘मौनं सर्वार्थ साधनम् ।’ असे म्हटले जाते. ‘मौन व्रत’ करणार्‍याने मन, वाचा आणि कर्म यांपासून सावध रहावे लागते. जेणेकरून यांपासून इतरांना कोणताही त्रास होऊ नये. मौन काळात भगवान शिवाचे ध्यान, पूजन, अर्चा करून उपासना करावी. त्यामुळे मन एकाग्र होते. अशा प्रकारे देवभावातून युक्त होऊन मनाला एकाग्र केल्यामुळे सर्व प्रकारच्या भौतिक सुखांची प्राप्ती होते. त्याचसमवेत आध्यात्मिक प्रगतीही होते.


Multi Language |Offline reading | PDF