५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील चि. वर्षा सिद्धेश पुजारी (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. वर्षा सिद्धेश पुजारी ही एक आहे !

चि. वर्षा पुजारी

(‘वर्ष २०१७ मध्ये चि. वर्षा पुजारी हिची ५३ टक्के आध्यात्मिक पातळी होती. आता ५५ टक्के आहे.’ – संकलक)

माघ शुक्ल पक्ष प्रतिपदा (५.२.२०१९) या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमातील चि. वर्षा सिद्धेश पुजारी हिचा तिथीनुसार वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आई-वडिलांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

चि. वर्षा सिद्धेश पुजारी हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. समंजस

‘वर्षाला कुणी मारले किंवा रागावले, तरी ती कुणाला मारत नाही किंवा कुणाला उलट बोलत नाही.

२. प्रेमभाव

अ. ती तिच्या एक वर्षाच्या भावाला चांगल्या प्रकारे सांभाळते. तो रडत असल्यास ती त्याला नामजप करायला सांगते.

आ. आमच्या शेजारी रहाणारी बालसाधिका चि. ईश्‍वरी बळवंत पाठक ही वर्षापेक्षा ९-१० मासांनी लहान (वय ३ वर्षे) आहे. ईश्‍वरी आमच्या घरी आल्यावर वर्षा प्रेमाने तिच्या पायातील चपला काढून योग्य ठिकाणी ठेवते आणि तिचे हात-पाय धुते.

इ. ती मला ‘आधी ईश्‍वरीला अधिक खाऊ दे’, असे सांगते आणि नंतर स्वतःला थोडासा खाऊ घेते. ईश्‍वरीचा खाऊ खाऊन झाल्यावर वर्षा तिचे हात आणि तोंड धुते.

ई. एकदा वर्षाच्या लक्षात आले, ‘ईश्‍वरीची नखे वाढली आहेत.’ तेव्हा तिने मला ईश्‍वरीची नखे कापायला सांगितली.

३. देवाची आवड

अ. आश्रमात आरती चालू असतांना ती शांत उभी रहाते. एकदा ती मला म्हणाली, ‘‘आई, आपल्या घरी आरती का करत नाही ?’’

आ. एकदा आम्ही दुकानात बाहुली आणायला गेल्यावर तिने आम्हाला सांगितले, ‘‘मला श्रीकृष्णासारखी बाहुली हवी.’’ तेव्हा आम्ही तिचे न ऐकता तिच्यासाठी ‘टेडीबिअर’ घेतले. तेव्हा ती नाराज झाली.

४. देवाप्रतीचा भाव

अ. अंघोळ झाल्यावर ती देवाला नमस्कार करते आणि तिला आश्रमात किंवा बाहेर जातांना मार्गात देवतांची चित्रे किंवा मूर्ती दिसल्यास ती त्यांच्याकडे पाहून नमस्कार करते.’

– सौ. लक्ष्मी सिद्धेश पुजारी (चि. वर्षाची आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.१२.२०१८)

आ. ‘एकदा आम्ही कुटुंबीय तळेगाव (पुणे) येथील नातेवाइकांच्या घरी गेलो. त्या वेळी आम्ही तेथील श्री बालाजी मंदिरात देवदर्शनासाठी गेलोे. तेथे तिने सर्व देवतांना नमस्कार करून तेथील कुंकू आणि विभूती स्वतःच्या भ्रूमध्यावर लावली, तसेच तिने तिच्या आईलाही कुंकू आणि विभूती लावायला सांगितली. त्या वेळी ‘तिच्या आईने लगेच उठून कुंकू आणि विभूती लावली नाही’, हे पाहून तिने स्वतःच्या हाताने तिच्या आईला कुंकू आणि विभूती लावली. तेव्हा तिला नातेवाइकांच्या घरापेक्षा श्री बालाजी मंदिरात चांगले वाटले. त्यामुळे ती म्हणाली, ‘‘तुम्ही मला किती छान ठिकाणी आणले आहे. आपण इथेच राहूया ना !’’

– श्री. सिद्धेश पुजारी (चि. वर्षाचे वडील), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.१२.२०१८)

५. साधनेची आवड

अ. ‘ती अंघोळ झाल्यावर प्रार्थना करते, ‘हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेने मला सतत नामजपाची आठवण होऊ दे. माझे तन, मन, बुद्धी आणि अहंकार तुझ्या चरणी अर्पण होऊ दे.’

आ. ती जेवतांना ‘हे अन्नपूर्णादेवी, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून ‘तुझा प्रसाद’ या भावाने माझ्याकडून ग्रहण होऊ दे. या प्रसादातून मला शक्ती आणि चैतन्य मिळू दे’, अशी प्रार्थना करते. आम्ही पाहुण्यांकडे गेल्यावर मी जेवतांना प्रार्थना करायचे विसरल्यास ती मला आठवण करून देते.

इ. ती तिच्या मामाला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ असा नामजप करायला सांगते. एकदा ती मामाला म्हणाली, ‘‘रात्री झोपतांना आणि सेवा करतांना नामजप करायचा.’’ तेव्हा मामा तिला म्हणाला, ‘‘तू आश्रमात येऊन बरेच काही शिकली आहेस. तू आम्हालाही शिकव.’’

६. आध्यात्मिक उपाय करायला आवडणे

संत भक्तराज महाराज यांनी सहस्रो किलोमीटर प्रवास केलेली गाडी सध्या देवद येथील सनातन आश्रमात आहे. त्या गाडीतील चैतन्य मिळावे, यासाठी साधक गाडीजवळ बसून नामजप करतात. एकदा तिने ‘साधक तेथे बसून नामजप करतांना स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढत आहेत’, असे पाहिले. नंतर तिने मला सांगितले, ‘‘मीही असे (स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे) आवरण काढते.’’ ती मलाही स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण काढायला सांगते.

७. आश्रमजीवनाची ओढ

तिला देवद आश्रमात रहायला आवडते; पण तिला खोलीत किंवा गावी रहायला आवडत नाही.’

– सौ. लक्ष्मी सिद्धेश पुजारी (चि. वर्षाची आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.१२.२०१८)

८. परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीची तळमळ असणे

‘एकदा मी सेवेनिमित्त परगावी जातांना ती माझ्या समवेत येण्याचा हट्ट करत होती. तेव्हा माझे तिच्याशी पुढील संभाषण झाले.

मी : तू हट्ट केल्यास मी तुला येथेच सोडीन आणि मी परगावी जाईन.

वर्षा (‘परगावी म्हणजे रामनाथी (गोवा) येथील आश्रमात जाणार’, असे वाटून) : तुम्ही रामनाथी आश्रमात जाणार ना ? तेथे परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत. मी त्यांना आजपर्यंत प्रत्यक्ष भेटलेले नाही. (वर्षाने परात्पर गुरु डॉक्टरांची केवळ छायाचित्रे पाहिली आहेत.) मला त्यांना भेटायचे आहे.

मी : तू त्यांना भेटून काय करणार ?

वर्षा : मी त्यांना ‘नमस्कार’ करणार आहे.

९. स्वभावदोष

अबोल

– श्री. सिद्धेश पुजारी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.१२.२०१८)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले    

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now