कल्याणमधील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु राष्ट्र स्थापनेचे रणशिंग फुंकले !

कल्याण, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र असलेले ऐतिहासिक शहर म्हणजे कल्याण ! अशा ऐतिहासिक नगरामध्ये हिंदवी स्वराज्याला स्मरून ८७४ धर्माभिमानी ३ फेब्रुवारीला पार पडलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शपथबद्ध झाले. ‘भगवान श्रीकृष्णाच्या साक्षीनेच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पण करत आहोत’, असा धर्मप्रेमींचा भाव होता. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रारंभ सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. यानंतर श्री. प्रसाद ठोंबरे आणि श्री. सुहास अष्टेकरगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयीचा आढावा समितीचे श्री. प्रशांत सुर्वे यांनी मांडला. सभेचे सूत्रसंचालन श्री. महेश मुळीक यांनी केले.

हिंदु राष्ट्राचे स्फुलिंग चेतवण्यासाठी भिवंडीतील हिंदू शक्ती वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक (१) श्री. सुमित सागवेकर यांना तलवार देऊन गौरवतांनाचा क्षण

हिंदु राष्ट्र-जागृती सभेतील मान्यवरांचे ओजस्वी मार्गदर्शन

हिंदु राष्ट्र हा आमचा जन्मसिद्ध अधिकार असून त्याची स्थापना केल्याविना आम्ही थांबणार नाही ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

आम्ही वोट आणि नोट मागत नाही, तर वेळोवेळी हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर होणारे आघात रोखण्याच्या हेतूने संघटित होण्यासाठी आपल्या समोर आलो आहोत. हिंदुस्थानात बहुसंख्य हिंदू असूनही आपल्याला अपमानित व्हावे लागते, हे आमचे दुर्दैव आहे. आपल्या रूढी, परंपरा यांवर आघात केले जात आहेत. यासाठी पुरो(आधो)गाम्यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. त्यांना हिंदु धर्म आणि परंपरा बुडवण्यासाठीच पोसले जात आहे. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर यांसारख्या समस्यांवर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हा एकच उपाय आहे. हिंदु राष्ट्र हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि त्याची स्थापना केल्याविना आम्ही थांबणार नाही !

हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष केला नाही, तर हिंदुस्थानचा पाकिस्तान कधी होईल, हे सांगता येत नाही ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

कल्याण शहरामध्ये रहाणार्‍या प्रत्येक हिंदूचा भाव हवा की, ही छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. ही माती कपाळाला लावल्यावर तिचे भस्मात रूपांतर होईल. त्यातून राष्ट्र-धर्मासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. ‘हिंदु राष्ट्र’ हा केवळ शब्द नाही, तर मंत्र आहे. हिंदु राष्ट्रासाठी संघर्ष केला नाही, तर हिंदुस्थानचा पाकिस्तान कधी होईल, हे सांगता येत नाही.

इंदिरा गांधी आणि नेहरू यांनी केलेले पालट चालत असतील, तर आम्ही राज्यघटनेत हिंदु राष्ट्राचा पालट आणणारच ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

राज्यघटनेत आतापर्यंत १०३ सुधारणा झाल्या आहेत. जर राज्यघटना श्रेष्ठ आहे, तर इंदिरा गांधी आणि नेहरू यांचे पुतळे प्रथम जाळायला हवेत; कारण त्यांनी राज्यघटनेत सर्वाधिक पालट केले. त्यांनी केलेले पालट तुम्हाला चालत असतील, तर आम्ही या राज्यघटनेत हिंदु राष्ट्राचा पालट आणणारच. सर्वोच्च न्यायालय ओडिशा येथील जगन्नाथ मंदिराचे व्यवस्थापन नीट नाही, याविषयी चिंता व्यक्त करते. उज्जैनच्या मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर कोणत्या पाण्याने अभिषेक करावा ?, याचे निवाडे करते; परंतु गेली ८ वर्षे राममंदिराची याचिका ऐकायला वेळ नाही, हेे दुर्दैव आहे.

सनातनचा सूर्य भारत देशाला हिंदु राष्ट्राची पहाट दाखवणारच ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

सनातन संस्थेवरील एकही आरोप सिद्ध झालेला नाही, तरीही संस्थेवर बंदीची मागणी होते. आज अनेक राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींवर गंभीर गुन्हे नोंद आहेत, तरीही आजपर्यंत एकाही पक्षावर बंदी आल्याचे ऐकिवात नाही, मग सनातन संस्थेवर बंदी आणण्याची घाई का ? सनातनला आतंकवादी ठरवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी हा सनातनचा सूर्य भारत देशाला हिंदु राष्ट्राची पहाट दाखवणारच.

सभेच्या निमित्ताने हिंदूंसाठी संतसंदेश !

हिंदु धर्म बुडवण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मी हिंदु जनजागृती समितीच्या विविध कार्यात सहभागी असतो. माझे समस्त हिंदु समाजाला सांगणे आहे की, सर्वांनी मतभेद विसरून एकत्र या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत व्हा !
– पू. चिंतामणी महाराज, श्रीराम आश्रम, भिवंडी

क्षणचित्रे

  • भगवे ध्वज घेऊन गावकरी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
  • स्वराज्य ढोल ताशा पथक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. वक्त्यांच्या स्वागतासाठी गोवेगाव येथील प्राथमिक शाळेतील मुलींचे लेझीम पथक सहभागी झाले होते.
  • धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, यासाठी घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
  • पोलिसांनी समितीच्या कक्षाची माहिती समजून घेतली, तसेच सभेचे चित्रीकरण केले. सभेच्या दोन दिवस आधीपासूनच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी सभेची माहिती घेत होते. (पोलीस आणि अन्वेषण अधिकारी यांचा हिंदुद्वेष ! – संपादक)
  • ‘सभेचे असे उत्तम नियोजन कुठेच पाहिले नाही’, अशी प्रतिक्रिया एका पोलिसाने एका साधकाकडे नोंदवली.

उपस्थित मान्यवर

ह.भ.प. रामदास चौधरी महाराज, शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि विधानसभा संपर्कप्रमुख, श्री. बाळा परब, भावले येथील जिल्हा परिषद सदस्या सौ. ऋता केणे, वाहुलीच्या सरपंच सौ. श्रेया गायकर, सोनाळेगावचे सरपंच श्री. विशुभाऊ म्हात्रे, गोवेगावचे सरपंच श्री. विनोद भोईर, उद्योजक श्री. अतुल तन्ना आणि श्री. उमेश तन्ना, कल्याण व्यापारी संघटनेचे श्री. हरिशभाई खंडेलवाल, ब्राह्मण सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. आशिष दुबे, हिंदुराष्ट्र जनजागरण समितीचे श्री. मोतीराम गोंधळी

फेसबूकद्वारे सभेचे थेट प्रक्षेपण !

सभा ७५ सहस्र ५०० लोकांपर्यंत पोहोचली. ५० सहस्र ९०० जणांनी सभा पहिली, तर ६२२ जणांनी शेअर केले.

सभेला संतांची वंदनीय उपस्थिती !

सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव,  पू. चिंतामणी महाराज, श्रीराम आश्रम, भिवंडी

आढावा बैठकांचे आयोजन !

वार : मंगळवार
दिनांक : ५ फेब्रुवारी
वेळ : रात्री ८ वाजता
ठिकाण : श्रीकृष्ण मंदिर, सापेगाव, पडघा, कल्याण रस्ता.

वार : बुधवार
दिनांक : ६ फेब्रुवारी
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
ठिकाण : महालक्ष्मी मंदिर, टिळक चौक, कल्याण (पश्‍चिम).


Multi Language |Offline reading | PDF