बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांच्या संदर्भातील कागदांवरील टंकलिखाणातून आनंदाच्या स्पंदनांचे प्रक्षेपण होत असल्याने त्या कागदाच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या इंग्रजी लिखाणातील नकारात्मक स्पंदने न जाणवणे

पू. पंडित केशव गिंडे

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ३ टंकलिखित कागदांचा एक संच देऊन ‘यातील लिखाणातून चांगली कि त्रासदायक स्पंदने जाणवतात?’, हे अभ्यासण्यास सांगितले. त्या ३ कागदांवरील टंकलिखित लिखाण पाठकोर्‍या कागदांवर (प्रिंट आऊट) घेतले होते. टंकलिखित लिखाणाच्या पाठच्या बाजूला इंग्रजीतील टंकलिखित लिखाण होते. ते प्रयोगाचे ३ कागद एकत्र करून आणि त्यांना ‘स्टॅपलर’ने ‘क्लिप’ लावून त्यांचा संच बनवला होता अन् त्याची अर्धी घडी घातली होती. त्यामुळे प्रयोगाचे लिखाण बाहेरच्या बाजूला दिसत नव्हते. बाहेरच्या बाजूला आधीचे इंग्रजी टंकलिखित लिखाण होते.

‘या कागदांच्या संचाकडे पाहून आणि त्यांना स्पर्श करून शरीर अन् मन यांना काय जाणवते ?’, असा हा सूक्ष्मातील प्रयोग करायचा होता. या प्रयोगामध्ये मला जाणवलेली सूक्ष्मातील स्पंदनांची माहिती पुढे देत आहे.

१. केलेले प्रयोग आणि जाणवलेली स्पंदने

१ अ. प्रयोग १ – इंग्रजी अक्षरे बाहेर असलेल्या कागदांच्या घडी केलेल्या संचाकडे पाहून काय जाणवले ? : कागदांच्या संचाकडे पाहिल्यावर त्यांतून वाफा बाहेर पडत असल्याचे जाणवले, तसेच उष्णता आणि शक्तीची स्पंदने जाणवली.

१ आ. प्रयोग २ – इंग्रजी अक्षरे बाहेर असलेल्या कागदांच्या घडी केलेल्या संचाला हाताने स्पर्श करून काय जाणवले ? : कागदांच्या संचाला स्पर्श केल्यावर हाताला उष्णता जाणवत होती; पण मनाला हलके वाटत होते आणि आनंद जाणवत होता. त्या वेळी मनामध्ये आनंदाचे कारंजे उमटत असल्याप्रमाणे जाणवत होते, तसेच पोकळी जाणवून ‘ॐ कारा’सारखा सूक्ष्म नाद ऐकू येत होता.

१ इ. प्रयोग ३ – कागदांचा घडी केलेला संच उघडल्यावर मराठी अक्षरे असलेल्या कागदाच्या आतल्या बाजूला स्पर्श करून काय जाणवले ? : स्पर्श केल्यावर हाताला थंडावा जाणवला आणि मनाला शांतता जाणवली. त्या वेळी माझे ध्यान लागत होते, तसेच मला बासरीसारखा सूक्ष्म नादही ऐकू येत होता.

२. प्रयोगांमध्ये जाणवलेल्या स्पंदनांचे अध्यात्मशास्त्रदृष्ट्या विश्‍लेषण

अ. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार एखाद्या कागदावर सात्त्विक किंवा असात्त्विक जशा प्रकारचे लिखाण असते, तशा प्रकारची स्पंदने त्या कागदातून प्रक्षेपित होतात. यानुसारच कागदांच्या संचाकडे पाहून आणि त्याला स्पर्श करून जाणवले. त्याचे विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१. कागदांच्या घडी केलेल्या संचाच्या दर्शनी भागावर इंग्रजीमधील कायदाविषयक लिखाण होते. हे लिखाण अध्यात्मातील विषयाचे नव्हते, तर ते व्यावहारिक, म्हणजेच मायेतील विषयाचे होते. तसेच मराठी भाषेची निर्मिती देवभाषा असलेल्या संस्कृतमधून झाली असल्याने ती सात्त्विक आहे. याउलट इंग्रजी भाषा सात्त्विक नसून रज-तमात्मक आहे. या दोन्ही सूत्रांमुळे कागदांच्या घडी केलेल्या संचाच्या दर्शनी भागावरील इंग्रजी लिखाणाकडे पाहून आणि त्याला स्पर्श करून उष्णता जाणवली.

२. कागदांचा घडी केलेला संच उघडल्यावर आतील बाजूस मराठीतील लिखाण होते. त्यामध्ये ‘भक्तीमार्गाने आचरण आणि ‘साधना’ म्हणून संगीतातील वाटचाल करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक पंडित केशव गिंडे (वय ७६ वर्षे) संतांच्या आशीर्वादाने संतपदी विराजमान !’ या मथळ्याखाली त्या संदर्भातील लिखाण होते. तेे लिखाण आध्यात्मिक स्वरूपाचे आणि सात्त्विक असल्यामुळे, तसेच ते मराठीतून असल्यामुळे त्यामधून चांगली स्पंदने जाणवली. मुख्य म्हणजे त्या कागदांवरील लिखाण बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांच्या संदर्भातील असल्याने आणि ते संतपदी विराजमान झाले असल्याने त्या लिखाणामुळे मनाला हलके वाटले अन् आनंद जाणवला. तसेच ते बासरीवादक असल्याने त्यांच्या संदर्भातील लिखाणाला स्पर्श केल्यावर पोकळी जाणवून ‘ॐ कारा’सारखा सूक्ष्म नाद ऐकू आला. या सर्व चांगल्या स्पंदनांमुळे कागदावरील इंग्रजी लिखाणातील नकारात्मक स्पंदने जाणवली नाहीत. या सूक्ष्मातील प्रयोगातून हेही स्पष्ट होते की, संतांंमधून जशी चांगली स्पंदने प्रक्षेपित होतात, तशीच त्यांच्या संदर्भातील लिखाणातूनही प्रक्षेपित होतात.

आ. या सूक्ष्मातील प्रयोगातून एक गोष्ट लक्षात आली की, एखाद्या वस्तूकडे पाहून तिचे सूक्ष्म परीक्षण करण्यापेक्षा त्या वस्तूला स्पर्श करून तिचे सूक्ष्म परीक्षण केल्यास त्यातून अधिक अचूकतेने स्पंदने जाणवतात. याचे कारण म्हणजे ‘पाहणे’ ही कृती तेजतत्त्वाच्या संदर्भातील आहे, तर ‘स्पर्श करणे’ ही कृती वायुतत्त्वाच्या संदर्भातील आहे. तेजतत्त्वापेक्षा वायुतत्त्व उच्च स्तराचे आणि अधिक सूक्ष्म आहे. त्यामुळे एखाद्या घटकाला स्पर्श करून सूक्ष्मपरीक्षण केल्यास त्या घटकातून प्रक्षेपित होणारी स्पंदने लगेचच लक्षात येतात आणि ती अधिक सूक्ष्म असतात.’

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१६.१२.२०१८)

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now