(म्हणे) ‘आम्ही साधू आणि संत यांच्यासमवेत असून भव्य राममंदिर उभारणार !’ – भाजप अध्यक्ष अमित शहा

  • भाजप सरकारचा राममंदिराविषयीचा आतापर्यंतचा अनुभव पहाता अमित शहा यांच्या या विधानावर धर्माभिमानी हिंदू कधी तरी विश्‍वास ठेवतील का ?
  • भाजप साधू आणि संत यांच्यासमवेत असता, तर त्याने कधीच राममंदिर बांधले असते; मात्र साधू, संत, शंकराचार्य भाजपसमवेत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयात राममंदिराच्या विषयावर युक्तीवाद चालू आहे. तरीसुद्धा अयोध्येतील वर्ष १९९३ मध्ये अधिग्रहण केलेली भूमी भाजप सरकारने रामजन्मभूमी न्यासाला देण्याचा निर्णय घेतला आहे. (असा निर्णय घेता येतो, तर तो साडेचार वर्षांत का घेतला गेला नाही ? राममंदिराचाही निर्णय घेता येऊ शकत होता, तर तो का घेतला नाही, हे शहा सांगतील का ? – संपादक) हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. आम्ही साधू आणि संत यांच्यासमवेत असून अयोध्येत भव्य राममंदिर बांधणार आहोत. त्यामुळे विरोधकांनी यामध्ये अडथळा आणू नये, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे केले. (विरोधक नव्हे, तर भाजप, रा.स्व. संघ आणि विहिंप हेच यामध्ये सर्वांत मोठे अडथळे ठरले आहेत, हे हिंदूंनी आता लक्षात घेतले आहे ! – संपादक) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘भारत की मन की बात’ अभियानाला प्रारंभ केला आहे. या अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या अभियानाच्या माध्यमातून भाजप देशातील कोट्यवधी लोकांची मते जाणून घेणार आहे. (हिंदूंचे मत जाणूनही न जाणल्याप्रमाणे कारभार करणार्‍या भाजपवाल्यांचे हे नवे  ढोंग आहे ! – संपादक)

शहा पुढे म्हणाले की, ५ वर्षांसाठी सरकारचा कार्यकाळ असतो. गेल्या ५ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशाची स्थिती पालटली. पंतप्रधानांच्या दूरदर्शी धोरणामुळे देशातील दीर्घकालीन विकासाची पायाभरणी झाली आहे. आज जगाला भारताविषयी आदर आहे. (भारताच्या शेजारी असलेले नेपाळ, चीन आणि पाक यांसारखे देशही भारताला डोळे वटारून दाखवत असतांना अशा प्रकारची दिशाभूल करणारी विधाने करणारे अमित शहा ! – संपादक)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संत संघटित होण्याची शक्यता

धर्मसंसदेनंतर संतांच्या शिबिरात राममंदिरप्रश्‍नी हालचाली चालू

प्रयागराज (कुंभनगरी), ३ फेब्रुवारी (वार्ता.) – नुकत्याच झालेल्या विहिंपच्या धर्मसंसदेत राममंदिराविषयीचे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसर्‍या बाजूला परमधर्मसंसदेत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी २१ फेब्रुवारीला अयोध्येतील रामजन्मभूमीवर शिलान्यास करण्याची घोषणा केली. या घटनांनंतर आता  कुंभनगरीत संतांच्या शिबिरात राममंदिरप्रश्‍नी हालचाली चालू झाल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात संत संघटित होण्याची शक्यता आहे. भाजपमधील प्रमुख नेत्यांमधील माजी संघटक आणि नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक संजय जोशी हे स्वतःच्या पथकासह २ फेब्रुवारीला कुंभनगरीत सक्रीयपणे काम करत होते. जोशी यांनी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे परमशिष्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद महाराज यांच्या शिबिरात जाऊन अनेक सूत्रांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. जोशी यांच्या येण्याने विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

१. विहिंपच्या धर्मसंसदेवर अनेक संतांनी बहिष्कार घातला होता. आखाडा परिषदेला जोडलेल्या पदाधिकार्‍यांनी धर्मसंसदेत अनुपस्थिती दर्शवल्यानंतर आता संतांद्वारे मोठ्या हालचाली चालू झाल्या आहेत.

२. कुंभमेळ्याच्या नंतर राममंदिर बांधणे आणि केंद्रात नवीन सरकार निवडण्यासाठी काम करण्याच्या दिशेने आखाड्यात हालचाली चालू झाल्या आहेत. सर्वांत अधिक हालचाली जगद्गुरु स्वामी रामानंदाचार्य हंसदेवाचार्य महाराज यांच्या शिबिरात पहायला मिळाल्या. शंकराचार्य अधोक्षजानंद यांच्या शिबिरात भाजपमधील अनेक नेत्यांचे येणे-जाणे चालू झाले आहे.

३. विहिंपच्या पदाधिकार्‍यांव्यतिरिक्त आखाड्यांशी जोडलेल्या संतांनी त्यांच्याशी संपर्क साधून ‘पुढे काय करायला हवे’, अशी विचारणा केली आहे; मात्र स्वामी रामानंदाचार्य हंसदेवाचार्य यांनी विहिंपच्या धर्मसंसदेवर बहिष्कार घालणार्‍या आखाड्यांतील अनेक संतांविषयी अप्रसन्नता व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.

राममंदिर उभारण्यासाठी नव्हे, तर चीन आणि पाकिस्तान यांना उत्तर देण्यासाठी मोदी सरकार सत्तेत परत येणे आवश्यक ! –  स्वामी रामानंदाचार्य हंसदेवाचार्य

स्वामी रामानंदाचार्य हंसदेवाचार्य यांचे सूत्र योग्य आहे, असे कुणालाही वाटण्याची शक्यता आहे; मात्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत पाकला धडा का शिकवला नाही ? डोकलाम प्रकरणी मोदी यांनी माघार का घेतली? सर्वाधिकार असतांना राममंदिर का बांधले नाही ? समान नागरी कायदा, कलम ३७० रहित करणे, गोहत्याबंदी, हे का केले नाही ?, हे प्रश्‍न समोर येणारच ! मोदी परत सत्तेवर आले नाहीत, तर हे प्रश्‍न सुटणार नाहीत, हे अनेकांना योग्य वाटत असले, तरी मोदी परत सत्तेवर आले, तर ते हे प्रश्‍न सोडवतील याची हमी कोण देणार ? आता मोदी यांना पुन्हा सत्तेत बसवून पुन्हा फसवणूक करून घेण्यापेक्षा साधू, संत, महंत यांच्या हाती नेतृत्व देऊन भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशीच ईश्‍वरी इच्छा आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

स्वामी रामानंदाचार्य हंसदेवाचार्य म्हणाले, ‘‘काही लोकांची दिशा भ्रमित झाली आहे. त्यांनी हे समजून घ्यायला हवे की, केवळ राममंदिर उभारणे नव्हे, तर चीन आणि पाकिस्तान यांना उत्तर देण्यासाठी केंद्रात मोदी सरकार परत येणे आवश्यक आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष हे एकत्रित आले, तरी त्यांच्या विश्‍वासावर देशाला सोडू शकत नाही. त्यांना देश आणि राम यांची चिंता नाही.’’


Multi Language |Offline reading | PDF