कुंभनगरीत स्वामी बालक योगेश्‍वर यांच्या शिबिरात हुतात्मा सैनिकांसाठी ३३ वा शतकुंडीय अतिविष्णु महायज्ञ चालू !

सैनिकांविषयीची संवेदनशीलता संतांएवढी राज्यकर्त्यांमध्ये आहे का ?

स्वामी बालक योगेश्‍वर बद्री महाराज

प्रयागराज (कुंभनगरी), ३ फेब्रुवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यातील सेक्टर क्रमांक १४ मध्ये असलेल्या स्वामी बालक योगेश्‍वर बद्री महाराज यांच्या शिबिरात प्रतिदिन पूजनापूर्वी राष्ट्रगीत होते. या समवेतच देशातील हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शतकुंडीय अतिविष्णु महायज्ञ केला जात आहे. येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांची प्रतिमा लावून त्यांच्यासमोर आहुती दिली जाते. या वेळी हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना आमंत्रित करून त्यांचा सत्कार केला जातो. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथम राष्ट्रगीत होऊन त्यानंतर आरती आणि पूजा केली जाते. शिबिरात ‘जय हिंद, वन्दे मातरम्, भारत माता की जय’, अशा घोषणा सतत घुमत असतात.

शिबिराचे संयोजक स्वामी बालक योगेश्‍वर बद्री महाराज म्हणाले की,

१. लोक अंगदान, वस्त्रदान, समयदान करू शकतात; मात्र यापेक्षा ‘प्राणदान’ श्रेष्ठ आहे. हे केवळ आपले सैनिक करत असतात.

२. आपलेही कर्तव्य आहे की, आपल्याला जे शक्य आहे, ते करणे. या महायज्ञाचा प्रारंभ वर्ष २००३ मध्ये झाला होता. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सध्या ३३ वा शतकुंडीय अतिविष्णु महायज्ञ चालू आहे.

३. वर्ष १९९९ मध्ये बद्रीनाथ येथे मी तपश्‍चर्या करत असतांना त्या वेळी कारगिल युद्ध झाले होते. त्या युद्धातील हुतात्मे झालेले सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी मी माहिती घेतली, तेव्हा मन सुन्न होऊन गेले. अशा सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १०८ शतकुंडीय अतिविष्णु यज्ञाचा संकल्प केला होता. तो संकल्प आजही चालू आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now