राममंदिर संतांच्या नेतृत्वाखाली उभारले जाईल ! – महंत नरेंद्रगिरी महाराज, अध्यक्ष, आखाडा परिषद

कुंभमेळा प्रयागराज २०१९

संत-महंतांना असे वाटते, यावरून भाजपने विश्‍वासार्हता गमावली आहे, हे स्पष्ट होते !

महंत नरेंद्रगिरी महाराज

प्रयागराज (कुंभनगरी), २ फेब्रुवारी (वार्ता.) – अयोध्येत रामललाचा जन्म झाला आहे. त्यामुळे रामाचे मंदिर तेथेच उभारले जाईल. आता संत आणि महात्मे यांमध्ये राजकारण होऊ देणार नाहीत. मंदिराचे बांधकाम हे संतांच्या नेतृत्वाखाली होईल. ४ मार्चनंतर १३ आखाड्यांचे संत-महंत अयोध्येच्या दिशेने कूच करतील. यामध्ये सर्व संत, महंत, महात्मा, साधू आणि नागा संन्यासी सहभागी होतील, असे प्रतिपादन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

महंत नरेंद्रगिरी महाराज पुढे म्हणाले की,

१. आखाडा परिषद राममंदिर उभारण्याच्या सूत्रावर पहिल्यापासून गंभीर आहे. यापूर्वी अनेक वेळा अयोध्येतील दोन्ही पक्षकारांसमवेत याविषयावर चर्चा झालेली आहे. आपापल्या सहमतीनेच मंदिराची उभारणी करणे सोयीस्कर होईल; कारण आपापसांत सहमती झाल्यावर दुसरे पक्षकार न्यायालयातील त्यांचा खटला मागे घेतील. त्यानंतर मंदिराची उभारणी चालू होईल.

२. राममंदिराच्या सूत्रावर हाशिम अन्सारी यांचे पुत्र इक्बाल अन्सारी यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी आणि अन्य पक्षकारांनी आपापसांत चर्चा करून खटला मागे घ्यावा, यावरच आखाडा परिषद जोर देत आहे; कारण न्यायालयात पुष्कळ वेळ जातो. ‘संत, महात्मे यांसह सामान्य माणसाला राममंदिर लवकरात लवकर उभारले जावे’, असे वाटते. त्यामुळे या कार्यात आता विलंब होता कामा नये.

३. रामलल्लाच्या मंदिराचा शिलान्यास झाला आहे. आता मंदिर उभारण्यासाठी प्रारंभ व्हायला हवा. आम्ही जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी जी घोषणा केली आहे, तिचे समर्थन करतो. त्यांनी मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे.

४. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी निंदनीय विधान केले आहे. त्यांनी क्षमा मागायला हवी. (उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंगानदीत पवित्र स्नान केल्यावर शशी थरूर यांनी ‘गंगा ही स्वच्छ रहायला पाहिजे आणि लोकांची पापेही धुतली गेली पाहिजेत. येथे सर्वच नग्न आहेत !’, असे आक्षेपार्ह ट्वीट केले होते.) आखाडा परिषदेच्या बैठकीत त्यांच्या विधानाच्या विरोधात निंदेचा प्रस्ताव सादर करून त्यांना क्षमा मागण्यास सांगणार आहोत.  त्यांच्या पक्षातील जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी गंगास्नान केले आहे. त्यांच्या विधानामुळे त्यांच्या पक्षाला हानी पोहोचू शकते. पूर्वी अशा प्रकारचे विधान काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केल्यानंतर गुजरात राज्यातील निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाला हानी पोहोचली होती. त्यानंतर त्यांनी क्षमा मागितली होती.

५. आरक्षणाच्या मी विरोधात आहे; कारण आरक्षणामुळे जातीवाद वाढतो. आरक्षण कोणालाच द्यायला नको. ज्याच्या योग्यतेनुसार ज्याला जिथे जाण्याची इच्छा असेल, त्याने तेथे जावे. जे गरीब आहेत, त्यांना सरकारने साहाय्य करावे. त्यांना शिक्षणात साहाय्य करावे. आरक्षणामुळे जे पात्र आहेत, त्यांना लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेक जण विदेशात जातात. या पार्श्‍वभूमीवर आरक्षणाविषयी सरकारने गंभीर झाले पाहिजे.

६. कुंभमेळा आखाड्यांतील सर्वांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी व्यसनमुक्त व्हावे. आमचा निरंजनी आखाडा व्यसनमुक्त आहे. चिलीम सोडण्यासाठी जागृती करत आहोत. व्यसनामुळे भाविक आणि तरुण यांच्यावर वाईट परिणाम होऊ नये.


Multi Language |Offline reading | PDF