जप्त केलेल्या वस्तूंचा घटनास्थळी पंचनामा न करणार्‍या अथवा अयोग्य प्रकारे करणार्‍या, तसेच त्या वस्तूंची देखभाल न करणार्‍या अन्वेषण यंत्रणा !

१. अन्वेषणासाठी आवश्यक असलेल्या वस्तू जप्त करतांना किमान पाळावयाचे नियम

अश्‍विनी कुलकर्णी

‘विविध प्रकरणांच्या अन्वेषणासाठी अन्वेषण यंत्रणा गाड्या, संगणक, भ्रमणभाष संच किंवा रोख रक्कम इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तू संबंधितांकडून जप्त करतात. पोलिसांनी कोणत्याही वस्तू जप्त करतांना पुढील नियम पाळणे बंधनकारक असते.

अ. त्या वस्तूंचा घटनास्थळी पंचनामा करणे

आ. किमान दोन स्थानिक पंचांच्या समक्ष पंचनामा करणे

इ. पंचनामा सक्षम पोलीस अधिकार्‍यासमोर चालू करणे, तसेच त्या सक्षम अधिकार्‍याचे नाव आणि पदनाम पंचनाम्यात असणे आवश्यक असणे

ई. जप्त केलेल्या वस्तूंची सूची त्या वस्तूंच्या मालकाला दिनांक आणि वेळ यांसह देणे अन् त्यावर सक्षम अधिकार्‍याच्या स्वाक्षरीसह पंचाची स्वाक्षरी असणे अनिवार्य आहे.

अनेकदा पोलीस वरील नियमांचे पालन करण्याऐवजी नियमांचे उल्लंघन करतांना दिसतात. यातील गंभीर बाब म्हणजे, अशा पोलीस अधिकार्‍यांच्या अथवा कर्मचार्‍यांच्या अन्वेषण पद्धतीवर कोणी आक्षेप घेत नाही अथवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.

२. सनातन संस्था आणि तिच्या साधकांच्या वस्तू जप्त करतांना नियमांचे पालन न करणारे अन् जप्त वस्तूंची देखभाल न करणारे पोलीस !

आजपर्यंत पोलिसांनी सनातन संस्थेवर खोटे आरोप करून अनेक साधकांची चौकशी केली आहे आणि अन्वेषणाच्या वेळी साधकांच्या अनेक वस्तू (उदा. दुचाकी, चारचाकी, भ्रमणभाष, भ्रमणसंगणक, आश्रमातील औषधे इत्यादी) जप्त केल्या आहेत. या संदर्भात सनातन संस्था आणि सनातन संस्थेच्या साधकांना पोलिसांकडून आलेले कटू अनुभव पुढे देत आहे.

२ अ. एका साधिकेचा संपर्क क्रमांक असूनही तिला संपर्क न करता तिच्या घराचे कुलूप फोडून वस्तू जप्त करणारे पोलीस !

एका प्रकरणाच्या अन्वेषणाच्या वेळी पोलीस एका साधिकेच्या घरी तिला न सांगता आले. ही साधिका घरी नव्हती. त्यामुळे घराला कुलूप लावलेले होते. पोलिसांनी किल्ली बनवणार्‍या एका व्यक्तीकडून किल्ली बनवून घेऊन साधिकेच्या घराचे कुलूप उघडले. घराचे कुलूप उघडतांना किमान दोन स्थानिक साक्षीदारांच्या समक्ष पंचनामा करणे आवश्यक असूनही त्या सोसायटीच्या अध्यक्षांना अथवा शेजार्‍यांना बोलावलेही नाही. खरे तर संबंधित पोलीस अधिकारी काही मासांंपूर्वीच त्या साधिकेला भेटले होते. तिचा भ्रमणभाष क्रमांकही पोलिसांकडे होता आणि तिने घराची चावी पोलीस अधिकार्‍यास देण्यास नकार दिलेला नसतांनाही पोलिसांनी तिच्या घराचे कुलूप फोडले आणि घराची झडती घेतली. एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे लोखंडी कपाटातील लॉकर उचकटले. ते अशा प्रकारे उचकटले की, ते पुन्हा पूर्वस्थितीला येऊ शकत नाही. ‘साधिकेच्या घरातून किती वस्तू जप्त केल्या’, याची सूची सक्षम अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने साधिकेला दिली नाही आणि काही कळवलेही नाही. एकूणच वस्तू जप्त करतांना बंधनकारक असलेल्या नियमांपैकी एकही नियम पोलिसांनी पाळला नाही. (कोणतीही वस्तू जप्त करतांना पोलिसांनी किमान नियमांचे पालन करायला हवे; पण तसे होतांना दिसत नाही.)

२ आ. साधकांच्या दुचाकी जप्त केल्यानंतर त्यांची निगा न ठेवणारे पोलीस : एका प्रकरणात सनातनच्या साधकांच्या उत्तम स्थितीत असलेल्या दोन दुचाकी आतंकवादविरोधी पथकाने जप्त केल्या. पुढे दोन-तीन मासांनी न्यायालयाकडून त्या साधकांना परत मिळाल्या. या दुचाकी परत नेतांना त्या दुसर्‍या वाहनातून घेऊन जाव्या लागल्या; कारण या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत या वाहनांची निगा न ठेवल्यामुळे त्या दुरुस्त करण्यासाठी प्रत्येकी चार-पाच सहस्र रुपये खर्च करावा लागला.

२ इ. सनातन आश्रमातून जप्त केलेली पुस्तके आणि न्यासाची कागदपत्रे सुस्थितीत परत न करणारे पोलीस !

अन्य एका प्रकरणात सनातन आश्रमातून अनेक नवीन पुस्तके आणि न्यासाची कागदपत्रे अन्वेषण यंत्रणांनी जप्त केली होती. पुढे १ वर्षाने न्यायालयाच्या आदेशाने ती पुस्तके आणि कागदपत्रे कह्यात मिळाली. त्या वेळी ती अव्यवस्थित हाताळल्यामुळे दुमडलेली आणि फाटलेल्या अवस्थेत मिळाली.

२ ई. एका साधकाच्या जप्त केलेल्या चारचाकी वाहनाचा अन्वेषणासाठी वापर न करणारे आणि ते खुल्या जागेत ठेवून भंगारात काढण्याच्या स्थितीत आणणारे पोलीस !

याच प्रकरणात पोलिसांनी सनातनच्या एका साधकाची सुस्थितीतील ट्रॅक्स जप्त केली. ती अद्यापही त्या साधकाला परत मिळालेली नाही. ही ट्रॅक्स पोलीस ठाण्याच्या आवारात खुल्या जागेत उभी केली आहे. त्यामुळे गेली ९ वर्षे ऊन, वारा आणि पाऊस यांचा परिणाम त्या ट्रॅक्सवर होऊन ती पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे भंगारात काढण्याच्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे या ट्रॅक्सचा अन्वेषण यंत्रणेने अन्वेषणासाठी कोणत्याही प्रकारे वापर केला नाही.

२ उ. जप्त केलेल्या भ्रमणसंगणकाचे (लॅपटॉपचे) तुकडे करणारे पोलीस !

याच प्रकरणात एका विद्यार्थी साक्षीदाराचा नवीन भ्रमणसंगणक (लॅपटॉप) जप्त केला. पुढे पुराव्याच्या वेळी न्यायालयात हा भ्रमणसंगणक सादर करतांना त्याचे तुकडे झाल्याचे आढळले.

२ ऊ. सनातन आश्रमातून जप्त केलेल्या औषधांचा तपशील नोंद करून ती परत देण्याऐवजी कालबाह्य आणि निरुपयोगी करणारे पोलीस !

एका प्रकरणात विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटीने) सनातनच्या एका आश्रमातून सहस्रो रुपयांचा औषधांचा साठा जप्त केला. ही औषधे वर्ष २०१६ मध्ये जप्त केली होती आणि वर्ष २०१८ मध्ये ती कालबाह्य झाली. पोलिसांना औषधांची नावे, उत्पादक कंपनीचे नाव, बॅच क्रमांक आदी तपशील नोंद करून म्हणजे पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती नोंदवून ती औषधे परत करता येणे शक्य होेते; मात्र कालबाह्य होईपर्यंत ती परत न मिळाल्याने संस्थेची सहस्रो रुपयांची हानी झाली.

३. वस्तू ज्या स्थितीत कह्यात घेतल्या, त्या स्थितीत परत न देणारे दायित्वशून्य पोलीस !

जप्त केलेल्या काही वस्तूंना पोलिसांनी हातदेखील लावला नाही किंवा त्या उघडूनही पाहिल्या नाहीत. वस्तू ज्या स्थितीत जप्त केल्या, त्याच स्थितीत पोलीस ठाण्यात नाहक पडून होत्या. (जप्त केलेल्या वस्तू ही एक राष्ट्रीय संपत्ती आहे, याचे भानही न ठेवणारे पोलीस ! – संपादक) अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात सुनावणी चालू असतांना किंवा खालच्या न्यायालयात मिळालेल्या निकालाच्या विरोधात वरच्या न्यायालयात सुनावणी चालू असतांनाही या वस्तू अन्वेषण यंत्रणा किंवा न्यायालयाकडे जमा असतात. न्यायदानाच्या प्रक्रियेत अनेकदा कित्येक वर्षांचा काळ लोटतो. त्या काळात त्या वस्तूंची योग्य देखभाल आणि सुरक्षा न केल्यामुळे किंवा सुरक्षेची काळजी न घेतल्यामुळे त्या वस्तूंची हानी होते. काही वेळा या वस्तू गंजतात, मोडतात किंवा वाहने असल्यास त्यांच्या भागांची चोरी होते. त्यामुळे जप्त करतांना वापरात असलेली वस्तू पुन्हा कह्यात मिळते, त्या वेळी ती वापरण्याच्या स्थितीत नसते. अशा प्रकारे लाखो प्रकरणांतील लक्षावधी वस्तू अन्वेषण यंत्रणांकडे जमा आहेत.

४. वस्तू जप्त करतांना अधिकार गाजवणार्‍या; पण त्यांची देखभाल न करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करून त्यांच्याकडून हानीभरपाई घ्यावी !

जप्त केलेल्या वस्तू सुस्थितीत ठेवण्यासाठी त्याची देखभाल करण्याचे दायित्व पोलीस प्रशासनाचे आहे. जर पोलीस प्रशासन ते घेत नसेल, तर ते शासनाने घ्यायला हवे. कोणत्याही कारणांमुळे या वस्तू जप्त केल्या त्या वेळी ज्या स्थितीत होत्या तशा पुन्हा ताबा देतांना नसल्यास त्या वस्तूची हानीभरपाई संबंधित व्यक्तीस द्यायला हवी. अनेक वेळा आरोपी कोणतेही आरोप सिद्ध न होता निर्दोष सुटतात. अशा नागरिकांनी पोलिसांची मुजोरी सहन करायची, मनस्ताप सहन करायचा आणि वस्तूंची मोडतोड झाल्याने आर्थिक हानीही सोसायची, हा कोणता न्याय ? हा तर सरासर अन्याय ! प्रत्यक्षात आरोपी सदोष असो वा निर्दोष, त्यांच्या वस्तूंची हानी करण्याचा कोणताही अधिकार पोलिसांना नाही. ज्या अन्यायकारी पोलिसांकडून जप्त वस्तूंची देखभाल करण्यात कुचराई होते, त्यांच्या वेतनातून किंवा संपत्तीतून त्या वस्तूंची हानीभरपाई घेण्याचे आदेश शासनाने देणे आवश्यक आहे. पोलिसी खाक्यात आपले नागरिक भरडले जातात, याची जाणीव शासनाने ठेवणे आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा स्वत:च्या खिशातून हानीभरपाईची रक्कम भरावी लागेल, तेव्हाच इतरांच्या वस्तूंचे मूल्य अशा पोलिसांना समजेल.’

– अश्‍विनी कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.१.२०१९)

पोलिसांविषयी असे अनुभव कुणाला आले असल्यास ते सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला किंवा पुढील पत्त्यावर कळवा. अशा पोलिसांना हिंदु राष्ट्रात कारागृहात टाकण्यात येईल !

नाव आणि पत्ता : संपादक, दैनिक सनातन प्रभात, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा.

संपर्क क्रमांक : (०८३२) २३१२६६४.

ई-मेल : [email protected]


Multi Language |Offline reading | PDF