‘आध्यात्मिक त्रासाची जाणीव आणि भावजागृतीचे प्रयत्न वाढवल्याने मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण उणावणे’, या संदर्भात एस्.एस्.आर्.एफ्.च्या ऑस्ट्रिया येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. लवनिता डूर् यांना आलेली अनुभूती

सौ. लवनिता डूर्

१. आध्यात्मिक उपाय आणि भावजागृतीचे प्रयत्न करूनही मनातील नकारात्मक विचार न्यून न होणे अन् त्या वेळी त्रासाच्या तीव्रतेची जाणीव होणे

‘आध्यात्मिक त्रासामुळे माझ्या मनात स्वतःविषयी नकारात्मक विचार येत होते. सर्वसाधारणपणे माझ्या मनात नकारात्मक विचार येत नाहीत आणि आले, तरी आध्यात्मिक उपाय केल्यावर ते उणावतात. या वेळी मात्र विविध आध्यात्मिक उपाय, भावजागृतीचे प्रयत्न, प्रार्थना, साधकांशी बोलणे इत्यादी करूनही ते न्यून होत नव्हते. यातून मला त्रासाची तीव्रता आणि ‘मला सकारात्मक वाटू नये’, यासाठी वाईट शक्ती कसा अडथळा आणत आहेत’, याची जाणीव झाली.

२. संतांनी सांगितलेला दृष्टीकोन आठवून स्थिर रहाण्याचा प्रयत्न करणे, ‘मनातील विचार हे वाईट शक्तींनी घातलेले आहेत’, याची जाणीव वाढवण्याचा प्रयत्न करणे आणि श्रीकृष्णाला आर्ततेने आळवणे

त्या वेळी ‘परिस्थिती कशीही असली, तरी आपण सदैव स्थिर राहिले पाहिजे’, हा एका संतांनी दिलेला आध्यात्मिक दृष्टीकोन मला आठवला. ‘माझ्या मनातील विचार हे वाईट शक्तींनी घातलेले असून त्यांचा माझ्याशी काहीही संबंध नाही’, ही जाणीव वाढवण्याचा मी प्रयत्न करत होते. मी श्रीकृष्णाला आर्ततेने आळवत होते, ‘हे श्रीकृष्णा, मला केवळ तू हवा आहेस. तू माझ्या हृदयात वास करत आहेस आणि सतत माझ्या समवेत आहेस.’

३. मनातील नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करून साधनेचे प्रयत्न चालू ठेवणे आणि ‘श्रीकृष्ण समवेत असल्याने वाईट शक्तींची शस्त्रे साधनेत अडथळा आणू शकत नाहीत’, हे लक्षात येणे

मनातील नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करून काहीच न घडल्याप्रमाणे मी आध्यात्मिक उपाय आणि भावजागृतीचे प्रयत्न करत राहिले. ‘माझे साधनेचे प्रयत्न चांगले होत आहेत कि नाही ?’, याचा विचार न करता ‘देवाला अनुभवण्यासाठी मी आणखी काय करू शकते ?’, याकडे लक्ष देण्याचा मी प्रयत्न करत होते. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘वाईट शक्तींची शस्त्रे कितीही शक्तीशाली असली, तरी मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास ती माझ्या साधनेत अडथळा आणू शकत नाहीत, तसेच मला श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहाण्यापासूनही ती थांबवू शकत नाहीत. मला नकारात्मक वाटत असले, तरी काही अडचण नाही; कारण श्रीकृष्ण माझ्या समवेत आहे.’

४. ‘आध्यात्मिक त्रासामुळे मला भावजागृतीचे प्रयत्न वाढवण्याची आणि त्रासाविषयी अधिक सतर्क रहाण्याची आठवण होते’, असा सकारात्मक विचार केल्यामुळे ईश्‍वरप्राप्तीची तळमळ वाढण्यास साहाय्य होणे

‘मला होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासामुळे मला कसे साहाय्य होत आहे ?’, याचा मी विचार केला. तेव्हा ‘आध्यात्मिक त्रासामुळे मला भावजागृतीचे प्रयत्न वाढवण्याची आणि त्रासाविषयी अधिक सतर्क रहाण्याची आठवण होते’, हे माझ्या लक्षात आले; कारण माझ्याकडून प्रयत्न होत नसल्यास माझ्या आध्यात्मिक त्रासात वाढ होते. अशा प्रकारे सकारात्मक विचार केल्यामुळे माझी ईश्‍वरप्राप्तीची तळमळ वाढण्यास साहाय्य झाले. यावरून ‘श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला कधीही एकटे सोडत नाहीत आणि प्रत्येक क्षणी साधकांची काळजी घेत असतात’, याची मला जाणीव झाली.

५. ‘साधिका श्रीकृष्णाच्या खांद्यावर विसावली असून तो तिचे वाईट शक्तींपासून रक्षण करत आहे आणि मोरपिसाद्वारे चैतन्य देऊन तिच्या मनातील सर्व नकारात्मक विचार काढून टाकत आहे’, असे दृश्य दिसणे

त्या वेळी मला पुढील दृश्य दिसले, ज्यामुळे मला त्रासातून बाहेर पडून श्रीकृष्णाचा विचार करणे शक्य झाले. ‘मी श्रीकृष्णाच्या खांद्यावर विसावले आहे. श्रीकृष्णाने त्याचा शेला माझ्या अंगावर पांघरला आहे आणि तो वाईट शक्तींपासून माझे रक्षण करत आहे. त्याच्या मोरपिसाद्वारे चैतन्य देऊन माझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार तो काढून टाकत आहे. श्रीकृष्णाचे माझ्यावरील प्रेम आणि वात्सल्य (काळजी) यांमध्ये मी तल्लीन झाले आणि त्यामुळे मला सगळ्याचा विसर पडला आहे.’

–  सौ. लवनिता डूर्, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. (२७.९.२०१८)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF