एस्.एस्.आर्.एफ्.च्या वाढत्या प्रसारकार्यासाठी भगवंताने दिलेली दैवी देणगी म्हणजे पू. (सौ.) भावना शिंदे ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ
पू. (सौ.) भावना शिंदे

१. मनमोकळ्या स्वभावाने सर्वांशी जवळीक साधणे

‘पू. (सौ.) भावनाताई मनमोकळ्या आणि निर्मळ स्वभावाच्या आहेत. त्यांचे मन अत्यंत पारदर्शक आहे. त्यांची रामनाथी आश्रमातील, तसेच विदेशातील सर्व साधकांशी जवळीक आहे. त्या साधकांशी आपलेपणाने आणि नम्रतेने बोलतात अन् स्वतःहून सर्वांमध्ये मिसळतात.

२. शिकण्याची वृत्ती असल्याने रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या सत्संगातही उत्साहाने सहभागी होणे

त्या सतत उत्साही असतात. एस्.एस्.आर्.एफ्.च्या शिबिराच्या काळात, तसेच त्यानंतरही काही दिवस रात्री उशिरापर्यंत आमचे सत्संग चालू असायचे. पू. भावनाताईंमध्ये शिकण्याची वृत्ती पुष्कळ असल्याने दिवसभर व्यस्त दिनक्रम असूनही रात्री २ – ३ वाजेपर्यंत त्या उत्साहाने सत्संगात सहभागी व्हायच्या. एकदा त्या म्हणाल्या, ‘‘या वेळी (जानेवारी २०१९ मध्ये) मी शिबिरासाठी भारतात आले आणि मला एवढे काही शिकायला मिळाले की, येथील सत्संग सोडून अमेरिकेला जाऊ नये’, असे मला वाटत आहे.’’

३. अंतर्मुखता आणि परिपूर्ण सेवेची तळमळ

अ. त्यांच्यामध्ये पुष्कळ अंतर्मुखता आहे. एखाद्या प्रसंगात स्वतःची चूक लक्षात आल्यास त्या संबंधित साधकांची त्वरित क्षमा मागतात.

आ. त्या विदेशातील साधकांना व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करतात. असे असूनही ‘गुरुसेवा परिपूर्ण व्हावी’, या तळमळीमुळे त्या एस्.एस्.आर.एफ्.च्या शिबिरातील सत्रांत, तसेच सत्संगांमध्ये स्वतःच्या चुकांविषयी इतरांना तत्परतेने विचारतात.

४. सतत कृतज्ञताभावात असणे

त्यांना देवाप्रती अतीव ओढ आहे. परात्पर गुरु डॉक्टर, संत, तसेच साधक यांच्याविषयी त्यांच्या मनात पुष्कळ भाव असून त्यांच्या वागण्या-बोलण्यातूनही तो प्रतीत होतो. एखाद्या प्रसंगात साधकांनी साहाय्य केल्यावर त्या इतक्या कृतज्ञताभावाने त्यांना नमस्कार करतात की, तो पाहून समोरच्याची भावजागृती होते.

५. अपार श्रद्धेच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीला आनंदाने सामोरे जाणार्‍या पू. भावनाताईंविषयी परात्पर गुरुदेवांचे कौतुकोद्गार !

परात्पर गुरुदेवांप्रती अपार श्रद्धा असल्यानेच त्या विदेशातील रज-तमात्मक स्थिती, स्वतःचा आध्यात्मिक त्रास आणि अन्य समस्या यांना स्थिरतेने तोंड देऊ शकल्या. ‘जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग म्हणजे ईश्‍वराला शरण जाण्याची आणि आध्यात्मिक प्रगतीची संधी आहे’, असा दृष्टीकोन ठेवून त्या प्रयत्नरत असतात. काही वर्षांपूर्वी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले होते, ‘‘अनेक अडथळे असल्यामुळे साधना होत नाही’, असे कोणाला वाटत असेल, तर त्या साधकांनी ‘अडथळ्यांवर मात करून आध्यात्मिक प्रगती कशी करावी ?’, हे सौ. भावना शिंदे यांच्याकडून शिकावे.’’

६. समष्टी सेवेची तळमळ

पूर्वीच्या तुलनेत या वर्षभरात त्यांची समष्टी कार्याशी एकरूपता पुष्कळ वाढली आहे. ‘विदेशातील अध्यात्मप्रसाराचे कार्य गुरुदेवांना अपेक्षित असे होण्यासाठी काय करता येईल ?’, अशी त्यांची तीव्र तळमळ असते. त्यामुळे त्या झोकून देऊन सेवारत असतात.

७. जाणवलेले पालट

७ अ. ‘मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी त्यांच्या तोंडवळ्यावरील तेज वाढले आहे’, असे जाणवले.

७ आ. आंतरिक आनंदात वाढ झाल्याने रामनाथी आश्रमाप्रती असलेली स्थुलातील ओढ न्यून होणे : प्रत्येक वर्षी त्या शिबिराच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात येतात. पूर्वी शिबिरानंतर अमेरिकेला परततांना ‘आश्रम सोडून जायचे’, या विचारामुळे वाईट वाटून त्यांना रडू यायचे आणि ‘रामनाथीहून परत जाऊ नये’, असे वाटायचे. मागील काही वर्षांमध्ये ‘रामनाथीहून जातांना पूर्वीसारखे वाईट वाटत नाही’, असे त्यांच्या लक्षात आले. त्यावरून ‘त्यांच्या आंतरिक आनंदात वाढ होत आहे’, असे जाणवले.

पू. भावनाताई म्हणजे ‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या वाढत्या प्रसारकार्यासाठी भगवंताने दिलेली दैवी देणगी आहे’, असे वाटते.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.२.२०१९)

जिज्ञासू वृत्ती आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याप्रती अनन्य भाव असलेल्या पू. (सौ.) भावना शिंदे !

१. प्रेमभाव

‘पू. (सौ.) भावनाताईंच्या देहबोलीतून प्रेम व्यक्त होते. त्यामुळे पहाताक्षणी त्यांच्याकडे मन आकर्षिले जाते आणि ‘त्यांच्याशी बोलावे’, असे वाटते.

२. जिज्ञासा

पू. भावनाताई यांच्यासह एका संतांच्या सत्संगाला बसण्याची मला संधी मिळाली. सत्संगातील सर्व सूत्रे त्या जिज्ञासेने जाणून घेत होत्या. त्या सत्संगामध्ये अखंड शिकण्याच्या स्थितीत होत्या. त्यामुळे संतांनी सांगितलेला शब्द न् शब्द त्यांनी लिहून घेतला.

३. विचारून घेण्याची वृत्ती

पू. भावनाताई सद्गुरु बिंदाताईंना लहान-लहान गोष्टीही विचारून घेतात. त्या सद्गुरु ताईंनी दिलेले निरोप व्यवस्थित समजून घेऊन लिहून घेतात. या वेळी ‘सद्गुरु बिंदाताईंचे आज्ञापालन होऊन ती सेवा परिपूर्ण व्हायला हवी’, अशी त्यांची तळमळ असते.’

– कु. मृण्मयी गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४. ‘सद्गुरु बिंदाताईंप्रती त्यांचा पुष्कळ भाव असून त्यांच्याविषयी बोलतांना त्यांचा कंठ दाटून येतो.

५. एके दिवशी सत्संग चालू असतांना सद्गुरु बिंदाताई बोलत होत्या. तेव्हा पू. भावनाताईंना सद्गुरु ताईंच्या पाठीमागे इंद्रधनुष्य दिसले.’

– सौ. प्रियांका राजहंस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF