निळ्या रंगाचे दिवे लावल्याने सकारात्मक भाव निर्माण होतो ! – जपानच्या शास्त्रज्ञांचा प्रयोग

१० वर्षांत आत्महत्यांचे प्रमाणही न्यून झाले

टोकियो – जपानच्या रेल्वे स्थानकांवर आत्महत्यांचे प्रकार थांबवण्यासाठी तेथील सरकारने ७० पेक्षा अधिक रेल्वे फलाटांवर आणि क्रॉसिंगवर निळ्या रंगाचे एल्ईडी दिवे लावले आहेत. हा उपाय अवलंबल्यामुळे १० वर्षांत आत्महत्यांचे प्रकार ८४ टक्क्यांपर्यंत न्यून झाले आहेत. मानसिक तणावाखालीच बहुतेक लोक आत्महत्या करत असतात. अशा स्थितीत निळ्या रंगाचे दिवे पाहिल्यानंतर लोकांच्या मनात सकारात्मक भाव निर्माण होतो आणि आत्महत्येचे पाऊल न उचलता ते नव्या उमेदीने जीवन जगण्यासाठी सज्ज होत असल्याचे या प्रयोगातून स्पष्ट होत आहे. जपानमधील वासेडा विद्यापिठातील शास्त्रज्ञ आणि निळ्या रंगाच्या प्रकाशावर मिचिको युएडा यांनी संशोधन केले.

१. जपानच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाचे यश पहाता आता ब्रिटननेही अशीच उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे रेल्वे स्थानक आणि गॅटविक विमानतळांवरही निळ्या रंगाचे दिवे लावण्यात येणार आहेत.

२. आत्महत्या करणार्‍या लोकांच्या सरासरीत जपान प्रमुख २० देशांत सामील आहे. वर्ष २००३ मध्ये ३४ सहस्र ५०० लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. वर्ष २०१७ मध्ये ही संख्या २१ सहस्रांपर्यंत खाली आली. वर्ष २०१३ नंतर स्थानकांवर निळे दिवे लावण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF