विहिंपचा लोकसभा निवडणूक होईपर्यंत राममंदिर आंदोलन स्थगित करण्याचा धक्कादायक निर्णय

कुंभमेळा प्रयागराज २०१९

विश्‍व हिंदु परिषदेची धर्मसंसद

धर्मसंसदेत राममंदिर उभारण्याचा दिनांक घोषित न झाल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ आणि साधू यांची संतप्त घोषणाबाजी !

विहिंपने अशा प्रकारे भूमिका घेतल्याने त्याने आयोजित केलेल्या धर्मसंसदेचा फज्जा उडाला आहे, असेच म्हणावे लागेल ! विहिंपची ही भूमिका म्हणजे कोट्यवधी हिंदूंच्या धर्मभावनांशी केलेली प्रतारणा आहे ! आता संत-महंतांच्या आशीर्वादाने धर्मबलसंपन्न हिंदूच अयोध्येत राममंदिर उभारतील ! हिंदूंनो, आता अधिकाधिक साधना करून आध्यात्मिक बळ वाढवा, तरच राममंदिर उभारण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र तुम्हाला बळ देईल !

धर्मसंसदेत निषेध व्यक्त करतांना साधू-संत आणि हिंदुत्वनिष्ठ

प्रयागराज (कुंभनगरी), १ फेब्रुवारी (वार्ता.) – विश्‍व हिंदु परिषदेच्या २ दिवसीय धर्मसंसदेत राममंदिराविषयी कोणतीही घोषणा झाली नाही. उलट लोकसभा निवडणूक होईपर्यंत राममंदिर आंदोलन स्थगित ठेवण्याचा धक्कादायक निर्णय विहिंपने धर्मसंसदेत घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही ‘राममंदिर निवडणुकीच्या आधी झाले, तर ठीक आहे, नाहीतर निवडणुकीनंतर वर्षभरात राममंदिर उभारण्यासाठी प्रयत्न करू’, असे वक्तव्य केले. धर्मसंसदेत आलेल्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना ‘राममंदिराच्या सूत्रावर विहिंप आणि सरसंघचालक धोरणात्मक निर्णय घेतील’, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरल्यामुळे त्यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यामुळे धर्मसंसदेत प्रचंड गदारोळ झाला. अनेक साधू, संत आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांनी व्यासपिठाच्या दिशेने धाव घेऊन ‘राममंदिर उभारण्याचा दिनांक घोषित करा’, अशी जोरदार मागणी करत प्रचंड घोषणाबाजी चालू केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला उघडपणे निवडणुकीच्या आधी राममंदिर उभारण्यासाठी कायदा करण्याची चेतावणी दिली होती; मात्र स्वतःच्या भूमिकेत पालट करत संघाने सरकारला राममंदिर उभारण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर वर्षभराचा कालावधी वाढवून दिला.

तसेच निवडणुकीच्या आधी राममंदिर उभारण्यासाठी आंदोलनाची कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे अनेक कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी ‘राममंदिर उभारण्यासाठी दिनांक घोषित करा’, असे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करायला प्रारंभ केला.

२. घोषणाबाजी करणार्‍या कार्यकर्त्यांनी ‘पहले मंदिर फिर सरकार’, ‘राममंदिर तारीख घोषित करो’, ‘हिंदूंओंसे धोखेबाजी बंद करो’, अशा मोठ्याने घोषणा देण्यास प्रारंभ केला.

३. धर्मसंसदेत गोंधळ झाल्यामुळे व्यासपिठावर बसलेले जुना आखाड्याचे पीठाधीश्‍वर स्वामी अवधेशानंदगिरी महाराज, रामानंदाचार्य स्वामी हंसदेवाचार्य महाराज आणि अनेक संत-महंत व्यासपीठ सोडून निघून गेले.

सुभाषदास महाराज

या वेळी घोषणा देणारे अयोध्या येथील तपस्वी छावणीचे वयोवृद्ध साधू सुभाषदास महाराज आणि कुशीनगर येथील राममंदिराचे पुजारी स्वामी अशोकजी यांनी पत्रकारांना सांगितले, ‘‘विहिंप आणि भाजप सरकार यांच्याकडे हिंदूंसाठी कोणतीही ठोस कार्ययोजना नाही. राममंदिराच्या नावावर केवळ हिंदूंना फसवले जात आहे.’’

राममंदिराच्या आंदोलनाला स्थगिती देणे, हा विहिंप आयोजित धर्मसंसदेचा दुर्दैवी निर्णय ! – हिंदु जनजागृती समिती

प्रयागराज – विहिंप आयोजित धर्मसंसदेने रामजन्मभूमीवर प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या उभारणीचा संकल्प न करता निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण राममंदिराच्या आंदोलनालाच स्थगिती देणे, हा निर्णय दुर्दैवी आणि हिंदु समाजाच्या श्रद्धेचा अवमान करणारा आहे. आज राममंदिर उभारण्यासाठी समस्त भारतवर्षाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. समस्त हिंदु समाज धर्मसंसदेत एकजूट झालेल्या संतांच्या निर्णायक आंदोलनाची घोषणा ऐकण्यास आतुर होता; पण केवळ एका विशिष्ट राजकीय पक्षाला पुन्हा सत्ताप्राप्तीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. असे करून एकप्रकारे विहिंपने स्वतःला राजकीय पक्षाचा समर्थक म्हणून सिद्ध केले आहे. विहिंपसाठी कुठल्याही राजकीय पक्षाचे समर्थन न करता राममंदिर उभारण्याचे अंतिम ध्येय हिंदु समाजासमोर ठेवण्याची एक संधी होती; मात्र विहिंप स्वतःची अराजकीय प्रतिमा निर्माण करण्यात अपयशी ठरली.

वस्तूतः तीन तलाक आणि जीएस्टीचा वटहुकूम काढणार्‍या भाजप सरकारने राममंदिर उभारण्यासाठीचा वटहुकूम काढावा, अशी मागणी विहिंपने धर्मसंसदेत करणे अपेक्षित होते; पण या धर्मसंसदेने समस्त हिंदु समाजाला निराश केले आहे. गेल्या ७१ वर्षांत कुठल्याही पक्षाचे सरकार राममंदिर उभारू शकले नाही किंवा गेल्या ५ वर्षांत त्या विषयी कोणतीही निर्णायक भूमिका मांडू शकले नाही. त्यामुळे ‘पुन्हा सत्ता प्राप्त झाल्यावर राममंदिर उभारले जाईल’, असा विचार करणे हास्यास्पद आहे. अजूनही वेळ वाया न घालवता अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट प्रस्तूत करणार्‍या सरकारकडे मागणी करायला हवी की, सरकारने १०० कोटींहून अधिक हिंदूंच्या भावनांचा आदर करून राममंदिर उभारणीची तिथी घोषित करावी. जर ही घोषणा झाली, तर समस्त हिंदु समाज या रामकार्यात सक्रीय होईल.

सर्वोच्च न्यायालय या विषयीची प्रक्रिया पूर्ण करेल, हा विहिंपने राममंदिर प्रस्तावात दाखवलेला विश्‍वास योग्य आहे; मात्र जर न्यायालयावर विश्‍वास होता, तर न्यायालयाचे न ऐकता वर्ष १९९२ मध्ये बाबरी मशीद तोडण्याचे आंदोलन का केले ?, याचे उत्तरही विहिंपने हिंदु समाजाला देण्याची आवश्यकता आहे. ‘हम मंदिर वही बनाएंगे; लेकिन तारीख नही बताएंगे ।’, ही दिशाहीनता अजून किती दिवस चालणार ? आम्ही श्रद्धाळू हिंदु समाजाचे प्रतिनिधी म्हणून आमची भावना विश्‍वातील सर्वांत मोठ्या हिंदु संघटनेसमोर या प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडत आहोत.

 


Multi Language |Offline reading | PDF