बालवयातच प्रगल्भ विचार असलेली, स्वतः आनंदी राहून इतरांनाही आनंद देणारी आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची रामनाथी आश्रमातील चि. वेदश्री रामेश्‍वर भुकन (वय ५ वर्षे) !

उच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. वेदश्री भुकन एक आहे !

चि. वेदश्री भुकन

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

चि. वेदश्री भुकन (वय ५ वर्षे) हिची आई, आजी आणि आत्या यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये अन् तिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे देत आहोत.

१. स्वीकारण्याची वृत्ती

१ अ. प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारणे : ‘चि. वेदश्रीमध्ये स्वीकारण्याची वृत्ती दिसून येते. तिचे बाबा प्रसारसेवेसाठी बाहेरगावी गेले आहेत. तिला आठवड्यातून केवळ एकच दिवस आश्रमात यायला मिळते. तिला दिवसभर माझा सहवासही मिळत नाही; परंतु हे सर्व तिने आनंदाने स्वीकारले आहे. यातून तिची ‘स्वीकारण्याची वृत्ती’ लक्षात येते.’ – सौ. उर्मिला रामेश्‍वर भुकन (आई)

१ आ. वडिलांसह जाण्याचा हट्ट करणार्‍या वेदश्रीला वडिलांनी समजावल्यावर तिने लगेच ऐकणे : ‘वेदश्रीचे बाबा (माझा भाऊ रामेश्‍वर) प्रसारसेवेसाठी बाहेरगावी जात असतांना ती त्यांच्या समवेत जाण्याचा हट्ट करू लागली. तिच्या बाबांनी तिला सांगितले, ‘‘मी धर्मकार्यासाठी चाललो आहे. तू असे केलेले परात्पर गुरुदेवांना आवडेल का ? तू आईजवळ राहिलेलेच देवाला आवडणार आहे.’’ असे सांगितल्यावर तिने ते पटकन स्वीकारले आणि बाबांना सोडून ती लगेच आईकडे गेली.’ – सौ. मनीषा गायकवाड (आत्या)

२. इतरांना समजून घेणे

‘वेदश्रीची शाळा सुटल्यावर मी तिला आणायला जाते. घरी येतांना ती ‘मला कडेवर घे’, असे म्हणते. तेव्हा मी तिला सांगते, ‘तुला कडेवर घेऊन चालायला मला जमणार नाही.’ तेव्हा ती लगेच ऐकते.’ – श्रीमती इंदुबाई श्रीधर भुकन (आजी)

३. बोलकी चित्रे काढणे

‘वेदश्री चित्रे काढते. तिने एखाद्या मुलीचे चित्र काढल्यास प्रत्येक वेळी ती मुलीच्या दोन्ही हातांत झेंडे काढते. घराचे चित्र काढले, तर घरावर झेंडा काढते. तिने काढलेली चित्रे बोलकी वाटतात.

४. स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देणे

४ अ. सतत आनंदी असणे : वेदश्री सतत आनंदी असते. अगदी लहान (बाळ) असल्यापासून ती कधी त्रासदायक सुरात रडली नाही. तिच्या सहवासातील प्रत्येकाला ती आनंद देते.’

– सौ. उर्मिला रामेश्‍वर भुकन

४ आ. शांत बसलेल्या आईला वेदश्रीने हसायला-बोलायला लावणेे आणि यातून आईला आनंदी करण्याची तिची तळमळ अन् चिकाटी ध्यानी येणे : ‘वेदश्री नेहमी आनंदी फुलाप्रमाणे असते. तिला पाहून आणि तिच्याशी बोलून उत्साह वाढतो, तसेच आपल्या आनंदात वाढ होते. तिची आई कधी शांत बसली असेल किंवा बोलत नसेल, तर ती आईला लगेच विचारते, ‘‘तुला काय झाले आहे ? तू बोल. माझ्याकडे पाहून हस.’’ जोपर्यंत तिची आई मनापासून हसत किंवा बोलत नाही, तोपर्यंत ती आईला सांगत रहाते आणि तिला हसायला-बोलायला लावते.’ – सौ. मनीषा गायकवाड

५. साधनेसाठी साहाय्य करणे

५ अ. साधिकेचा तोंडवळा उदास दिसल्यास एका संतांच्या बोलांची आठवण करून देऊन वेदश्रीने नामजप, प्रार्थना वाढवण्यास सांगणे : वेदश्रीचे बाबा आश्रमात आले असतांना आम्हाला (मी, वेदश्री आणि तिचे बाबा यांना) एक संत भेटले. तेव्हा संतांनी मला सांगितले, ‘‘आता यजमानांमध्ये अडकायचे नाही, तर देवात अडकायचे !’’ वेदश्रीने हे ऐकल्यापासून तिला माझा तोंडवळा कधी उदास दिसला की, ती विचारते, ‘‘आई, काय झाले ? तुला बाबांची आठवण येते का ? संतांनी सांगितले आहे ना की, आता बाबांमध्ये अडकायचे नाही, तर देवात अडकायचे आहे.’ यासाठी तू साधना कर आणि नामजप, प्रार्थना वाढव !’’

५ आ. प्रेमाने बोलायला सांगणे : मी तिच्यावर कधी रागावले, तर ती मला जाणीव करून देते, ‘‘आई, तू प्रेमाने सांग. रागावू नकोस !’’

५ इ. आजी, मामा किंवा मावशी यांना भ्रमणभाष केल्यावर ती त्यांना नामजप करण्यास सांगते.’

– सौ. उर्मिला रामेश्‍वर भुकन

५ ई. योग्य कृतीची जाणीव करून देणे : ‘वेदश्रीच्या आत्याचा मुलगा (कु. यश) नुकताच पूर्ण वेळ साधना करू लागला आहे. वेदश्री त्याला ‘योग्य कृती कशी असायला हवी’, याची जाणीव करून देते.’ – श्रीमती इंदुबाई श्रीधर भुकन

६. बालमनाला असलेले चुकांचे गांभीर्य

६ अ. स्वतःच्या चुका सांगणे : ‘वेदश्री दिवसभरात स्वतःकडून झालेल्या चुकांचे चिंतन करून चुका सांगते, तसेच त्यावर ‘योग्य दृष्टीकोन काय असायला हवा ?’, तेही सांगते. कधी योग्य दृष्टीकोन लक्षात आला नाही, तर ती मला विचारते.

६ आ. इतरांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणे : एकदा माझ्याकडून ओले पाय लादीवर उमटले होते. तिने ते पाहिले आणि लगेच मला त्याची जाणीव करून दिली, ‘‘आई, तू पाय व्यवस्थित पुसले नाहीस. त्यामुळे लादी ओली झाली.’’

– सौ. उर्मिला रामेश्‍वर भुकन

६ इ. देवाच्या चरणी क्षमायाचना करणे : ‘वेदश्री स्वतःकडून झालेल्या चुकांसाठी प्रतिदिन देवाजवळ जाऊन, कान पकडून उठाबशा काढते आणि क्षमा मागते.’ – श्रीमती इंदुबाई श्रीधर भुकन

७. सतत वर्तमानकाळात रहाणे

‘वेदश्री सतत वर्तमानकाळात रहाते. तिने काही चूक केल्यावर तिला रागावले किंवा शिक्षा केली, तर ती तेवढा वेळ शांत रहाते. दुसर्‍या क्षणी लगेच हसत-खेळत नव्याने पुढील कृतीला आरंभ करते. त्या वेळी तिच्याकडे पाहिल्यावर ‘काही घडलेच नाही’, असे वाटते.

८. आध्यात्मिक स्तरावर बोलणे

मी वेदश्रीला नेहमी चिडवत असते. मी तिला म्हणते, ‘‘तुझी आई (उर्मिला) ही माझी आई आहे. तू तिला विचार.’’ तेव्हा वेदश्री म्हणते, ‘‘ती आपल्या दोघींचीही आई आहे.’’ यावरून आध्यात्मिक स्तरावरचे तिचे दैवी बोलणे लक्षात येते.’

– सौ. मनीषा गायकवाड

९. साधना

अ. ‘वेदश्री नियमित १ घंटा वैखरीतून नामजप करते. झोपतांनासुद्धा ती नामजप करतच झोपते.

आ. ती दिवसभर लहान लहान भजने, श्‍लोक किंवा देवाची गाणी तल्लीन होऊन म्हणते. यातून तिचे देवाशी अनुसंधान टिकून असते.

इ. ती शाळेत जातांना देवाला नमस्कार करते, तसेच पू. लोखंडेआजी (वेदश्रीची पणजी) यांच्या पायांवर डोके ठेवते. तिच्या या कृतीत एक दिवसही खंड पडलेला नाही.

१०. वेदश्रीमधील स्वभावदोष

स्वकौतुक वाटणे

‘हे परात्पर गुरुमाऊली, ‘वेदश्रीमध्ये असणार्‍या या स्वभावदोषावर तिच्याकडून आणि माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या. तुम्हीच कर्ता-करविता आहात.’

‘हे श्रीकृष्णा, दैवी गुणांनी युक्त अशा बालिकेला जन्म देण्याचे भाग्य तू मला दिलेस. त्यासाठी या क्षुद्र जिवाला पात्र समजलेस.’

परात्पर गुरुमाऊली आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्दच नाहीत.’

– सौ. उर्मिला रामेश्‍वर भुकन


Multi Language |Offline reading | PDF