हिंदु धर्माच्या विरोधात षड्यंत्रे रचली जात आहेत ! – सरसंघचालक मोहन भागवत

कुंभमेळा प्रयागराज २०१९

विश्‍व हिंदु परिषदेची धर्मसंसद

  • हिंदु धर्माच्या विरोधात अनेक दशकांपासून षड्यंत्रे रचली जात आहेत; मात्र त्यासाठी हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना संघटित करून ही षड्यंत्रे उधळून लावण्याची आवश्यकता असतांना संघ असे कुठेच करतांना दिसत नाही. याविषयी सरसंघचालकांनी सांगायला हवे !
  • केंद्रात भाजपची सत्ता असतांना अशी षड्यंत्रे उद्ध्वस्त का होत नाहीत, या प्रश्‍नाचे उत्तर भागवत यांनी दिले पाहिजे !
  • शबरीमला प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात भाजप सरकारने अध्यादेश काढून तो निर्णय रहित का केला नाही, हे सरसंघचालक का विचारत नाहीत ?
  • धर्मसंसदेत येऊन राममंदिराविषयी अवाक्षरही न काढणारे सरसंघचालक यांचे हिंदुत्व बेगडी आहे, असे हिंदूंना वाटल्यास चूक ते काय !

प्रयागराज (कुंभनगरी) – शबरीमलाच्या मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याची न्यायालयाने अनुमती दिली आहे. ज्या महिलांनी मंदिरात स्वामी अय्यप्पांच्या दर्शनासाठी जायची इच्छा आहे त्यांना जाऊ द्यावे. (असे म्हणणेही चुकीचेच नव्हे का ? येथे इच्छेचा प्रश्‍न नाही, तर सहस्रो वर्षांच्या परंपरेचा प्रश्‍न आहे. ही परंपरा तोडणे म्हणजे हिंदु धर्मावर मोठा आघात होय ! – संपादक) जर कोणी अडवत असेल, तर सुरक्षा देऊन त्यांना मंदिराच्या आत घेऊन जावे; पण कोणत्याच हिंदु महिलांना मंदिरात दर्शनाला जायची इच्छा नाही. तेव्हा काही गट श्रीलंकेतून महिलांना आणून मंदिरात घुसवत आहेत. काही गटांना हिंदु धर्मात स्त्री आणि पुरुष अशी फूट निर्माण करायची आहे. हिंदु धर्म तोडण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. भारताचे तुकडे करण्याच्या गोष्टी करणारे त्यासाठी नवीन योजना आखत आहेत, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे केले. ते प्रयागराज येथे विश्‍व हिंदु परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेत ते बोलत होते. जात-पात, भाषा, रंग सोडून हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. हिंदु समाज संघटित झाल्यास विश्‍वात त्याला तोडून दाखवण्याची शक्ती कोणामध्येही नाही, असेही ते म्हणाले.

शबरीमला प्रकरणात न्यायालयाने हिंदूंच्या भावनांचा विचार केला नाही !

सरसंघचालक पुढे म्हणाले की, शबरीमला मंदिरातील सर्व वयोगटांतील महिलांच्या प्रवेशाविषयी निर्णय देतांना न्यायालयाने हिंदूंच्या भावनांचा विचार केला नाही. न्यायालयाला आम्ही मानतो; मात्र सर्वोच्च न्यायालयाने आमच्या मंदिरांना ‘सार्वजनिक ठिकाण’ असे संबोधले आहे, ते तसे नाही. मंदिर हे सार्वजनिक ठिकाण होण्यासमवेत हिंदु समाजातील देवाचे एक स्थान आहे. त्यामुळे न्यायालयाचा आदेश आम्ही योग्य मानत नाही. स्वामी अय्यप्पांची ४ मंदिरे आहेत, ज्यांपैकी एका मंदिरात स्वामी अय्यप्पा हे ब्रह्मचर्य रूपात आहेत.

त्यामुळेच या मंदिरात महिलांना प्रवेश दिला जात नाही. ही येथील परंपरा आहे. काही संघटनांना देश तोडायची इच्छा आहे. त्या राज्यघटनेचा विरोध करतात; पण केरळचा हिंदु समाज यांच्याविरोधात आंदोलन करतो आहे. तो आता त्यांचे षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही.

धर्मसंसदेतील माहिती संसदेला ऐकावीच लागेल ! – योगऋषि रामदेव बाबा

योगऋषि रामदेव बाबा म्हणाले, ‘‘देशावर धार्मिक संकट आले असून त्या संकटावर मात करण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. साधूंना जातीपातींमध्ये विभागण्याचा होत असलेला प्रयत्न अयोग्य आहे. साधूंकडे धर्मबळ असून त्यांच्या आत्मबळात वाढ झाली पाहिजे. साधूंनी चिलीम ओढणे या व्यसनापासून दूर रहायला हवे. अयोध्येत राममंदिर झालेच पाहिजे. विहिंपच्या धर्मसंसदेत संतांच्या मार्गदर्शनानंतर येथे राममंदिरावर मतदान झाल्यानंतर त्याची नोंद संसदेलाही घ्यावी लागेल. देशात समान नागरी कायदा लागू केला पाहिजे. देशात केवळ २ मुले जन्माला घालण्याविषयी कायदा बनवला पाहिजे. २ मुलांपेक्षा अधिक मुले असणार्‍यांना असलेला मतदानाचा अधिकार हिसकावून घेतला पाहिजे.’’

योगी आणि मोदी सरकार असतांना राममंदिराची उभारणी लवकर का होत नाही ? – महंत गोपालदास महाराज

रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष आणि मणी रामदास छावणीचे महंत गोपालदास महाराज म्हणाले की, उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांची सत्ता असतांना आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार असतांनाही राममंदिर उभारले जात नसेल, तर ते केव्हा उभारले जाणार ? मंदिर लवकरात लवकर उभारले पाहिजे. मोदी सरकारने कोणताही घटनात्मक उपाय काढावा, जेणेकरून मंदिर लवकर उभारले जाईल. रामलल्ला एका तंबूत असून हे दुःख असहनीय आहे.

देशविरोधी शक्तींकडून हिंदु परंपरेच्या प्रती अश्रद्धा आणि अविश्‍वास निर्माण केला जात आहे ! – स्वामी परमानंद महाराज

स्वामी परमानंद महाराज म्हणाले, ‘‘हिंदूंच्या मंदिरांच्या प्रश्‍नात न्यायालयाने हस्तक्षेप करायला नको. हिंदु धर्माची परंपरा, श्रद्धा, पूजा-अर्चा असा मंदिरांचा इतिहास आहे. असे असतांना देशविरोधी शक्तींकडून हिंदु परंपरेच्या प्रती अश्रद्धा, अविश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचे शबरीमला हे ताजे उदाहरण आहे. आतापर्यंत शबरीमला मंदिराविषयी कुरघोडी करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून प्रयत्न केले गेले; मात्र भाविकांच्या विरोधामुळे त्यांचे षड्यंत्र यशस्वी झाले नाही. शबरीमला प्रकरणी ज्या भाविकांना अटक केली, त्यांना सोडून दिले पाहिजे.’’

हिंदूंनी संभ्रमित न होता देशविरोधी शक्तींचा प्रतिकार करावा ! – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, ‘‘हिंदु समाजाच्या एकतेला तोडण्यासाठी इस्लाम, चर्च तथा साम्यवादी हे कायम हिंदूंना फोडण्याचे षड्यंत्र आहेत. काही राजकीय पक्ष आणि अन्य संघटना स्वार्थासाठी हिंदूंना विघटित करून ते हिंसेचा आसरा घेत आहेत. हे सतत वाढत आहे. यावरून देशात अशांती निर्माण करण्याचा निधर्मी शक्तींचा डाव आहे. कोरेगाव भीमा येथे मागासवर्गीय-मराठा वाद निर्माण केला जातो, तर पथलगढी (झारखंड) येथे चर्च आणि माओवादी एकत्र येऊन तेथील हिंदु समाजाला वेगळे करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. सहारनपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शोभायात्रेवर आक्रमण करून मागासवर्गीय-सवर्ण यांच्यात वाद निर्माण केला गेला. अशाप्रकारे शहरी नक्षलवाद्यांचे राष्ट्रविरोधी षड्यंत्र देशासमोर आले आहे. त्यामुळे मी धर्मसंसदेच्या माध्यमातून आवाहन करतो की, क्षेत्रवाद, भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावावर देशाला तोडण्याचा जो प्रयत्न होत आहे, त्याने हिंदूंनी संभ्रमित न होता अशा देशविरोधी शक्तींचा प्रतिकार करावा. ज्या राजकीय पक्षांकडून असे प्रयत्न होत असतील, त्यांच्यापासूनही सावध राहून त्यांना योग्य उत्तर दिले पाहिजे.’’

क्षणचित्र : विहिंपचे पदाधिकारी भाषण करत असतांना सभागृहात गोंधळाचे वातावरण होते.

विहिंपच्या धर्मसंसदेत शबरीमला मंदिर प्रकरणी अयोध्येत राममंदिर प्रश्‍नी जसे आंदोलन केले, तसे आंदोलन करणे आणि हिंदु समाजाला विघटित होण्यापासून रोखणे, असा प्रस्ताव संमत करण्यात आला. धर्मसंसदेत शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश हा विषय चर्चिला गेला. १ फेब्रुवारीला राममंदिराच्या विषयावर चर्चा होणार आहे.

विहिंपच्या धर्मसंसदेत राजकारणी लोकांना बोलावण्यात येणार नाही, असे ठरवण्यात आले होते. प्रत्यक्षात उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे धर्मसंसदेत सहभागी होऊन त्यांनी व्यासपिठावरील प्रत्येक संत-महंत यांना वाकून नमस्कार करून आशीर्वाद घेतला आणि ते पाठीमागे जाऊन बसले.


Multi Language |Offline reading | PDF