मोतीबिंदूचे शस्त्रकर्म झालेल्या ५ रुग्णांना दृष्टी गमवावी लागल्याने दोषी आधुनिक वैद्यांवर कारवाई

रुग्णांच्या जिवाशी खेळणार्‍या दोषी आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

मुंबई – जोगेश्‍वरी येथील ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर महानगरपालिका रुग्णालया’मध्ये मोतीबिंदूचे शस्त्रकर्म झालेल्या ७ रुग्णांपैकी ५ जणांवर दृष्टी गमावण्याची वेळ आली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीच्या अहवालानंतर रुग्णालयातील नेत्ररोग विभाग बंद करण्यात आला आहे. मानद नेत्ररोगतज्ञ डॉ. अरुण चौधरी यांची वैद्यकीय सेवा खंडित करण्यात आली आहे, तसेच २ निवासी आधुनिक वैद्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. ट्रॉमा केअर सेंटरचे अधीक्षक डॉ. हरबजनसिंग बावा यांची पदावनती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

प्राथमिक चौकशीमध्ये मोतीबिंदूचे शस्त्रकर्म करण्यासाठी वापरण्यात आलेल्या उपकरणांमध्ये संसर्ग असल्याची दाट शक्यता या प्रकरणी व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकारची शस्त्रकर्मे करतांना १०३ प्रकारची विविध वैद्यकीय उपकरणे संसर्गविरहित करावी लागतात. तसे न केल्यास त्यामधून संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. या घटनेत संसर्गित उपकरणांमुळे डोळ्यांत संसर्ग होऊन दृष्टीदोष झाल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now