महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबांच्या ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त झालेल्या गायन, वादन आणि नृत्य यांच्या कार्यक्रमांच्या वेळी निसर्गाने विविध माध्यमांतून दिलेला प्रतिसाद

संगीत सदर : ईश्‍वरप्राप्तीसाठी कला

१. ‘नोव्हेंबर २०१८ मध्ये कु. तेजल पात्रीकर यांनी गुरूंच्या संदर्भातील एक चीज गायल्यावर आश्रमाच्या परिसरातील एका झाडाजवळ सर्प आला होता. डिसेंबर २०१८ मध्ये चिटणीसकाकांनी गुरूंशी संबंधित चीज गायल्यावर हेच झाड हलतांना दिसले. तेव्हा ‘हे झाड अन्य विषयांवरील बंदिशी किंवा नृत्य यांच्या वेळी नव्हे, तर गुरूंशी संबंधित गायनाच्या वेळी प्रतिसाद देते’, असे लक्षात आले.

प.पू. देवबाबा

२. नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या नृत्याच्या कार्यक्रमाच्या वेळी एक वृक्ष सोडून परिसरातील अन्य वृक्ष प्रतिसाद देत होते. डिसेंबर २०१८ मध्ये चिटणीसकाका राग ‘अहीरभैरव’ गात असतांना केवळ तोच वृक्ष आनंदाने हलत होता.

३. फेब्रुवारी २०१८ मध्ये झालेल्या तबलावादनाच्या वेळी काही गायींनी त्यांची शिंगे त्यांच्याशेजारी असलेल्या पाईपवर (नळीवर) एका तालात आपटून त्यातून नाद निर्माण केला होता. नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या नृत्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तेथील गायींचे ध्यान लागले होते आणि डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या गायनाच्या कार्यक्रमाच्या वेळी गायींनी हंबरून प्रतिसाद दिला.

या सर्व अनुभूतींतून ‘झाडे, वेली, पशू-पक्षी यांनाही संगीताविषयी संवेदना असतात आणि ते सर्व जण त्या संवेदना सुरात व्यक्तही करतात’, हे लक्षात आले. ‘या सर्व अनुभूती भगवंताने दिल्या’, याविषयी मला अतिशय आनंद होत होता आणि त्याच्या चरणी कृतज्ञताही व्यक्त होत होती.’

– आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४. ‘डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या ‘अहीरभैरव’ या रागाच्या गायनाच्या वेळी आमचे एकाच झाडाकडे वेगवेगळ्या वेळी लक्ष गेले. गायनाच्या तालावर एकाच झाडाची एक फांदी हलत होती. गायन चालू असतांना गायी योग्य वेळी हंबरत होत्या, तसेच २ चिमण्या खिडकीत येऊन किलबिल करत होत्या.’

– सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल; सौ. माधवी चतुर्भुज, पुणे आणि श्री. अतुल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१२.२०१८)

(‘निसर्गात झालेले हे पालट वेगवेगळ्या वेळी चार साधकांना जाणवले. त्यामुळे ‘ते दैवी आहेत’, हे लक्षात येते.’ – संकलक)

प.पू. देवबाबांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. प.पू. देवबाबांना नाम लावण्याची सेवा मिळाल्यावर प्रथम मनात नकारात्मक विचार येणे आणि प.पू. देवबाबांना प्रार्थना केल्यावर भीती नाहीशी होऊन सहजपणे नाम लावणे शक्य होणे

‘कार्यक्रमाच्या आरंभी प.पू. देवबाबांना नाम लावण्याची सेवा मला मिळाली. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘यापूर्वी मी कोणत्याही संतांना नाम लावलेले नाही. त्यामुळे मला ते जमणार नाही.’ प.पू. देवबाबांना नमस्कार करतांना मी त्यांना प्रार्थना केली, ‘मी यापूर्वी नाम लावण्याची सेवा केलेली नाही. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित असेच नाम तुम्ही माझ्याकडून लावून घ्या.’ त्यानंतर मनात असलेली भीती नाहीशी होऊन मी त्यांना नाम लावले. त्या वेळी ‘प.पू. देवबाबांनी माझ्याकडून ती सेवा करवून घेतली’, असे मला जाणवले.

२. एक साधक प.पू. देवबाबांना नमस्कार करत असतांना प.पू. देवबाबांकडे पाहून भावजागृती होणे, स्वतः त्यांना नमस्कार करतांना पुन्हा भावजागृती होणे, त्यांनी ‘यह आनंदी हैं ।’, असे म्हटल्यावर यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही असेच म्हटल्याचे आठवणे आणि गुरुतत्त्व एकच असल्याची अनुभूती येणे

प.पू. देवबाबा साधकांसाठी उपाय सांगत असतांना त्यांच्याकडे पाहून मला शांत वाटत होते. तेथून गोव्याला परत येण्यापूर्वी प.पू. देवबाबांना नमस्कार करण्यासाठी आम्ही २ – ३ साधक उभे होतो. एक साधक नमस्कार करत असतांना प.पू. देवबाबांकडे पाहून माझे मन निर्विचार झाले आणि भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून पाणी आले. त्यांना नमस्कार करतांना मन शांत होऊन माझा भाव पुन्हा जागृत झाला. त्या वेळी प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘यह आनंदी हैं ।’’ यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीसुद्धा असेच म्हटल्याचे मला आठवले. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि प.पू. देवबाबा एकच आहेत (गुरुतत्त्व एकच आहे)’, असे मला जाणवले.’

– श्री. अतुल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF