शंकराचार्यांच्या नेतृत्वाखाली राममंदिराचा शिलान्यास करण्यासाठी लाखो हिंदू २१ फेब्रुवारीला अयोध्येकडे कूच करणार !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

‘परमधर्मसंसद १००८’ मध्ये संत-महंत, आखाडे आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा निर्धार

‘नंदा’, ‘भद्रा’, ‘जया’ आणि ‘पूर्णा’ नावांच्या ४ शिलांसह अयोध्येकडे प्रयाण होणार

(श्री. अरविंद पानसरे, विशेष प्रतिनिधी)

परमधर्मसंसदेत सहभागी संत, महंत आणि हिंदुत्वनिष्ठ

प्रयागराज (कुंभनगरी), ३० जानेवारी – कोट्यवधी हिंदूंच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या राममंदिर निर्माणाच्या सूत्रावर विद्यमान भाजप सरकार हिंदूंची घोर फसवणूक करत आहेत. आम्हाला अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्याचे गाजर नकोय, तसेच रामजन्मभूमीच्या अविवादित ६७ एकर भूमीवरही राममंदिराचे निर्माण कदापि मान्य होणार नाही. आम्हाला मूळ रामजन्मभूमीवरच भव्य राममंदिर हवे आहे. यासाठी २१ फेब्रुवारी या दिवशी लाखोंच्या संख्येने आम्ही अयोध्येकडे कूच करू, अशी घोषणा द्वारकाशारदा आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथील परमधर्मसंसदेत उपस्थित आखाडे, संत, महंत, विद्वान, राजकीय पक्ष, हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संस्था यांचे प्रतिनिधी तथा रामभक्त यांच्यासमोर केली.

 

१. या वेळी निरंजनी आखाडा, जुना आखाडा, महानिर्वाणी आखाडा, अग्नि आखाडा आदी आखाड्यांचे प्रतिनिधी महंत, वैष्णव आखाड्याचे रामानंदाचार्य यांच्यासह आंतरराष्ट्रीय हिंदु परिषदेचे श्री. रामेश्‍वर त्यागी, अखिल भारतीय हिंदु महासभेचे स्वामी चक्रपाणी महाराज उपस्थित होते. या परमधर्मसंसदेत सनातन संस्थेचे प्रतिनिधी पू. नीलेश सिंगबाळ आणि दैनिक सनातन प्रभातचे प्रतिनिधी श्री. आनंद जाखोटिया अन् श्री. अरविंद पानसरे हेही सहभागी झाले होते.

२. कुंभक्षेत्रातील सेक्टर ९ येथील ‘गंगा सेवा अभियान शिबीर’ येथे परमधर्मसंसद १००८ चे आयोजन करण्यात आले होते. परमधर्मसंसदेच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिराची उभारणी व्हावी; म्हणून दिवसभर चर्चा ठेवण्यात आली होती. यात उपस्थित सर्वच वक्त्यांनी अत्यंत प्रखर आणि कठोर शब्दांत भाजप सरकारच्या राममंदिराच्या राजकीय भूमिकेवर शाब्दिक आक्रमण केले.

३. या वेळी उपस्थित अब्दुल काझी आणि रजा या मुसलमान पंथांच्या २ प्रतिनिधींनी अयोध्येत राममंदिर उभारण्याची भूमिका मान्य केली.

४. पंजाब, हरियाणा, देहली, आसाम, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गोवा, केरळ आदी विविध राज्यांतील धर्माभिमानी या वेळी उपस्थित होते. पंजाबमधील शिखांच्या अनेक तख्तांनी (पिठांनी) शंकराचार्यांच्या राममंदिराच्या सूत्राला जाहीर अन् पत्रक काढून पाठिंबा घोषित केला.

५. या वेळी परमधर्मसंसदेच्या ठिकाणी राममंदिराच्या गर्भगृहात शिलान्यास करण्यासाठीच्या ‘नंदा’, ‘भद्रा’, ‘जया’ आणि ‘पूर्णा’ नावांच्या ४ शिला आणण्यात आल्या आहेत. त्यांना घेऊन शंकराचार्य अयोध्येकडे प्रयाण करणार असल्याचे अनेक वक्त्यांनी सांगितले.

क्षणचित्रे

१. उपस्थित अनेक वक्त्यांनी मोठ्या संख्येने, तर हिंदु महासभेसह काही संघटनांनी संघटनेच्या लाखो कार्यकर्त्यांसह अयोध्येकडे प्रयाण करण्याची घोषणा केली.

२. ‘विहिंपच्या वतीने ३१ जानेवारी २०१९ या दिवशी प्रयागराज येथे होणारी धर्मसंसद ही चिटफंड घोटाळ्याप्रमाणे हिंदूंची फसवणूक करणारी आहे’, अशी टीका अखिल भारतीय हिंदु महासभेचे स्वामी चक्रपाणी महाराजांसह अनेक वक्त्यांनी केली.

३. राष्ट्रीय स्तरावर कार्य करणारे जलतज्ञ श्री. राजेंद्र सिंह हेही परमधर्मसंसदेत उपस्थित होते.

सरकारने गोळ्या झाडल्या, तर पहिली गोळी मी झेलेन ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

एका धर्मसंसदेत शंकराचार्य म्हणाले, ‘‘१९ फेब्रुवारीला कुंभमेळा समाप्त झाल्यावर लक्षावधी हिंदु अयोध्येकडे शिला घेऊन कूच करतील. आमचे आंदोलन सविनय मार्गाने असेल, तरीही जर सरकारने आमच्यावर गोळ्या चालवल्या, तर पहिली गोळी सर्वप्रथम मी माझ्या अंगावर झेलेने. आम्हाला कारागृहात टाकून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेला, तर देशभरातील लक्षावधी हिंदू उठाव करून प्रत्येकी ४ विटा घेऊन अयोध्येकडे कूच करतील. जोपर्यंत राममंदिराची उभारणी होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवावे.’’

राममंदिरावर संघर्ष हाच पर्याय ! – पू. नीलेश सिंगबाळ, सनातन संस्था

‘राज्यघटनेने बहुमत असलेल्या सरकारला विशेष अधिकार दिले आहेत. सरकारने मंत्रीमंडळाची बैठक घेऊन वर्ष १९९३ चा पी.व्ही. नरसिंह राव सरकारचा निर्णय रहित करून राममंदिर निर्माण करण्याचा अध्यादेश काढला असता, तर हा विषय संपला असता. सरकारने न्यायालयात हा विषय नेऊन तो आणखी कठीण केला आहे. आता ६ मासांत हा निर्णय होईल, असे वाटत नाही. एकूणच सरकार स्वतःच्या दायित्वापासून पळ काढत आहे. आता राममंदिरासाठी संघर्ष हाच हिंदूंसमोर पर्याय आहे’, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रतिनिधी म्हणून बोलतांना पू. नीलेश सिंगबाळ यांनी राममंदिर उभारणीच्या सूत्राला पाठिंबा देतांना केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘अध्यादेश हा महत्त्वाचा घटनात्मक अधिकार सरकारकडे आहे. सरकार तोंडी तलाकविषयी अध्यादेश काढू शकते, तर राममंदिरासाठी अध्यादेश का काढू शकत नाही? जोपर्यंत राममंदिर निर्माण होत नाही, तोपर्यंत सरकारकडून रामराज्याची अपेक्षा करू शकत नाही. आज हिंदुत्वविरहित विकासाचा दिखावा केला जात आहे. त्यामुळे जनतेला स्वतःच्या धार्मिक अधिकारांसाठी संघर्ष करावा लागणार आहे.’’

९ फेब्रुवारीला नवीन राजकीय पक्षाची घोषणा करणार ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

सीतापूर (उत्तरप्रदेश) – जर भाजप सरकार राममंदिराची उभारणी करणार नसेल, तर ९ फेब्रुवारीला देहलीमध्ये होणार्‍या सभेमध्ये हिंदु हितांसाठी कार्य करणार्‍या राजकीय पक्षाची घोषणा केली जाईल, अशी चेतावणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी येथे दिली. येथे त्यांच्या मिरवणुकीला प्रशासनाने अनुमती नाकारली होती.


Multi Language |Offline reading | PDF