आरोग्य सर्वेक्षणासाठी आल्याचे खोटे सांगून महागडी आयुर्वेदीय औषधे विकणार्‍यांपासून सावध रहा !

दैनिक सनातन प्रभातचे वाचक, सनातन संस्थेचे साधक आणि हितचिंतक यांना सूचना

‘गोव्यातील काही भागांमध्ये काही जण आरोग्य सर्वेक्षणासाठी येऊन लोकांचा विश्‍वास संपादन करून महागडी आयुर्वेदीय औषधे त्यांना विकू पहात आहेत, असे लक्षात आले आहे. हे विक्रेते भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने गोव्यात घेतलेल्या शिबिरांचा संदर्भ देऊन ‘आम्ही आरोग्य सर्वेक्षणासाठी आलो आहोत. आम्हाला घरातील व्यक्तींची आयुर्वेदीय पद्धतीने नाडी आणि नखे यांची पडताळणी करायची आहे’, असे सांगतात. पडताळणीनंतर घरातील वयस्कर व्यक्तींना होणार्‍या सर्वसाधारण विकारांवर काही घरगुती औषधे सांगून लोकांचा विश्‍वास संपादन करतात. त्यानंतर ‘सर्वांना दुकानातून चूर्ण आणून घरगुती औषधे बनवणे शक्य होत नाही’, असे सांगून स्वतःजवळील काही आयुर्वेदीय औषधे दाखवतात. या औषधांचे छापील मूल्य एक सहस्र रुपयांहून अधिक आहे. ‘गोवा शासनाचे दीनदयाळ कार्ड किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड असल्यास ही औषधे अर्ध्या मूल्यात मिळतील’, असेही हे विक्रेते सांगतात. ते विकत असलेली औषधे भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एका औषधी आस्थापनाची उत्पादने आहेत. नावात साधर्म्य असल्याने अनेक जण विश्‍वासाने ही औषधे घेत आहेत, अशी माहिती एका जागरूक नागरिकाने ‘आरोग्य साहाय्य समिती’ला कळवली आहे.

या संदर्भात आरोग्य साहाय्य समिती नागरिकांना आवाहन करत आहे की,

१. आयुष मंत्रालय किंवा शासनाच्या एखाद्या विभागाचे नाव घेऊन आपणांस कोणी संपर्क करत असेल, तर त्यांच्याकडे त्यांचे ओळखपत्र वा शासनाने त्यांना अनुमती दिल्याचे पत्र मागावे आणि त्याची खातरजमा करावी. त्यानंतर आवश्यकतेनुसार माहिती समजून घ्यावी.

२. कोणत्याही विक्रेत्याला (सेल्समनला) नागरिकांची तपासणी करून थेट औषधांची विक्री करता येत नाही. केवळ वैद्यच (डॉक्टर) तपासणी करू शकतात आणि आवश्यकतेनुसार औषधे देऊ शकतात.

३. शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकृत पत्राविना काही खासगी आस्थापनांचे विक्रेते आयुष मंत्रालय किंवा शासनाचे विभाग यांचे नाव घेऊन औषध विक्री करत असल्याचे लक्षात आल्यास पोलीस अथवा अन्न आणि औषधे प्रशासन विभाग यांच्याकडे किंवा शासनाच्या आयुष मंत्रालयाकडे तक्रार करा.

अशा प्रकारे फसवून उत्पादने विकणार्‍या आणि लुबाडणूक करणार्‍यांपासून नागरिकांनी सावध रहावे.’

असे होत असल्याचे लक्षात आल्यास त्याची माहिती पुढील पत्त्यावर कळवावी. माहितीसमवेत अशी औषधे विकणार्‍या व्यक्तींचे भ्रमणभाषवर छायाचित्र काढता आल्यास तेही काढून पाठवावे.

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा – ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

इ-मेल पत्ता : [email protected]

– अश्‍विनी कुलकर्णी, आरोग्य साहाय्य समिती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now