कुंभमेळ्यात लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळण्यासाठी काही संतांकडून राजकीय नेते आणि शिष्य यांच्यासाठी शतचंडी यज्ञ चालू !

कुंभमेळा प्रयागराज २०१९

रज-तमप्रधान स्वार्थी राजकीय नेत्यांसाठी असे यज्ञ-याग करून काय साध्य होणार आहे ?

प्रयागराज (कुंभनगरी) – कुंभमेळ्यात विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि नेते येऊन संतांचे आशीर्वाद घेऊन जात आहेत. कुंभमेळ्यात आलेल्या संतांच्या चरणी डोके टेकवून त्यांच्याकडून आशीर्वाद घेण्याची त्यांना ओढ लागली आहे. काही राजकीय नेते वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी अध्यात्माचा आधार घेत आहेत. काही संत आपल्या शिष्यांना लोकसभेच्या निवडणुकीत तिकीट मिळण्यासाठी तथा त्यांना विजय प्राप्त होण्यासाठी रुद्राभिषेक, महामृत्यूंजय जप आणि शतचंडी यज्ञ करत आहेत. (धर्मकारण आणि राजकारण दोन्ही वेगवेगळे आहे. सर्वस्वाचा त्याग करून जे संन्यासी, शिष्य आणि संत होतात, त्यांनी अध्यात्मप्रसार करणे, स्वतः धर्मशिक्षण घेऊन इतरांना देणे, राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी कार्य करणे अपेक्षित आहे. रज-तमप्रधान राजकारणी केवळ स्वार्थासाठी यज्ञ-याग करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)

१. लोकसभेच्या निवडणुका लढवून अधिकतर नेत्यांना संसदेत जाण्याची इच्छा आहे. यासाठी राजकीय नेते आपल्या वरिष्ठांशी लोकसभेच्या तिकिटांविषयी बोलून कुंभमेळ्यात अनुष्ठान करत आहेत; कारण ‘प्रयागराज येथे केलेले अनुष्ठान व्यर्थ जात नाही’, असे म्हटले जाते.

२. जगद्गुरु स्वामी अधोक्षजानंद देवतीर्थ महाराज असेच अनुष्ठान करत आहेत. त्यांच्या शिबिरात शतचंडी यज्ञ चालू झाला आहे. हे महाराज आग्रा, रामपूर, मथुरा, कोलकाता, तसेच अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आदी राज्यांतील राजकीय नेते आणि शिष्य यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी अनुष्ठान करत आहेत.

३. दंडी स्वामीनगर येथे अखिल भारतीय दंडी संन्याशी प्रबंधन समितीचे संरक्षक जगद्गुरु स्वामी महेशाश्रम कुरुक्षेत्र, पटना, जयपूर येथील अनेक शिष्यांना लोकसभेचे तिकीट मिळण्यासाठी महामृत्यूंजय जप, रुद्राभिषेक करण्यामध्ये व्यस्त आहेत.

४. महामंडलेश्‍वर कॉम्प्युटरबाबा हे मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि गुजरात याव्यतिरिक्त विविध क्षेत्रांत लोकसभेच्या निवडणुका लढण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या शिष्यांसाठी महामृत्यूंजय जप करून घेत आहेत.

५. याव्यतिरिक्त स्वामी रामतीर्थदास महाराज, महामंडलेश्‍वर सरयुदास महाराज, श्री महंत नारायण गिरी महाराज शिष्यांसाठी अनुष्ठान करत आहेत.

६. विशेष म्हणजे संत काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्ष, बसपा यांसह अनेक पक्षांतील नेत्यांसाठी अनुष्ठान करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF