राज्यातील नगर परिषद, नगरपंचायत आणि नगरपालिका यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल घोषित

मुंबई – राज्यभरातील नगर परिषद, नगरपंचायत आणि नगरपालिका यांच्या पोटनिवडणुकींचे निकाल २८ जानेवारीला घोषित करण्यात आले. त्यामध्ये नगरच्या श्रीगोंदा नगर परिषदेत भाजपने विजय मिळवला, तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला.     रायगडमधील कर्जत नगरपालिकेवर शिवसेना-भाजप-भारिप युतीने भगवा फडकवला आहे. नागपूरमध्ये १७ पैकी ११ जागा जिंकत भाजपने महादुला नगरपंचायत निवडणूक जिंकली. गडचिरोलीतील आरमोरी नगर परिषदेवर १७ पैकी ८ जागा जिंकत भाजपने बाजी मारली, तर बीड नगरपालिकेतील पोटनिवडणूक राष्ट्रवादीने जिंकली. सोलापुरातील दुधनी नगर परिषदेतील पोटनिवडणूक काँग्रेसने जिंकली आहे. सातार्‍यातील मलकापूर नगर परिषदेवर काँग्रेसने यश मिळवले आहे.

नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या निलम येडगे विजयी !

मलकापूर नगर परिषदेत ५ जागा मिळवत भाजपचा शिरकाव; मात्र १४ जागांवर विजय मिळवत सत्ता काँग्रेसकडे

मलकापूर – मलकापूर येथील नगर परिषदेच्या १९ जागांचे निकाल घोषित झाले आहेत. पहिल्यांदाच पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणूक लढवणार्‍या भाजपने पाच जागांवर विजय नोंदवला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने १४ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निलम येडगे यांनी भाजपच्या डॉ. सारिका गावडे यांच्यावर केवळ २७० मतांनी विजय मिळवला. येडगे यांना एकूण ७ सहस्र ७४७ मते मिळाली. प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजप आणि काँग्रेस उमेदवारांना समसमान मते मिळाली. यात चिठ्ठी पद्धतीचा वापर करून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF