मुंबईतील स्वच्छतेची केंद्रीय पथकाकडून पाहणी

मुंबई महापालिका प्रशासनाने तोंडदेखली स्वच्छता मोहीम राबवली आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

मुंबई – स्वच्छ भारत अभियाना’च्या अंतर्गत केंद्रीय पथकाकडून मुंबई महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. हे पथक कधी येऊन गेले आणि त्यांनी नेमक्या कोणत्या विभागांची पाहणी केली, याचीही माहिती न मिळाल्याने पालिका अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. ‘शहरातील बकाल वस्त्या, कचराभूमी, सार्वजनिक ठिकाणांची अवस्था पथकाच्या दृष्टीस पडल्यास स्वच्छ मुंबईचे बिंग फुटेल’, अशी धास्ती प्रशासनाला आहे.

यंदा या अभियानासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या शहराचे नामांकन सादर करण्याची सूचना केंद्राकडून करण्यात आली होती. किती घरांमधून कचरा गोळा केला जातो ?, कचरा निर्माण होतो ?, तिथे त्याचे किती प्रमाणात वर्गीकरण करण्यात येते ?, किती क्षमतेच्या कचराकुंड्या वापरल्या जातात ?, किती कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते ?, नागरिकांच्या समस्या किती प्रमाणात सोडवण्यात येतात ?, निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रात दिवसातून किती वेळा स्वच्छता करण्यात येते ?, कचरा साठवणूक आदी निकष नामांकनासाठी निश्‍चित करण्यात आले होते. या निकषांनुसार महापालिकेने मुंबईला तीन तारांकन दिले आणि त्याचे सादरीकरण केंद्र सरकारला केले आहे. केंद्रीय पथकाने मुंबईत घनकचरा व्यवस्थापन कशा पद्धतीने चालू आहे ?, कचराभूमींची अवस्था कशी आहे ?, याची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केल्याने गंभीर स्थिती असलेल्या या सर्व सुविधांविषयी केंद्रीय पथकाकडून नेमका कोणता अभिप्राय नोंदवला जाईल, हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF