रुग्णांवर चुकीचे उपचार केल्याची ६५० प्रकरणे महाराष्ट्र वैद्यक परिषद समितीकडे प्रलंबित

एवढ्या संख्येत प्रकरणे प्रलंबित राहिल्यास रुग्णांना न्याय मिळणे आणि संबंधित आधुनिक वैद्यांना शिक्षा होणे कधी साध्य होणार ?

मुंबई – महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे आधुनिक वैद्यांकडून रुग्णांवर चुकीचे उपचार केल्यामुळे न्याय मागण्यासाठी दाद मागितली जाते. अशी प्रलंबित प्रकरणे साडेसहाशेहून अधिक आहेत. या प्रकरणांमध्ये वर्ष १९९०पासूनच्या रुग्णांनी केलेल्या तक्रारींचाही समावेश आहे. तसेच नव्याने येत असलेल्या प्रकरणांची संख्या वाढत असल्यामुळे जुनी प्रकरणे कधी निकाली निघून न्याय मिळणार, या विवंचनेत रुग्ण आहेत. महाराष्ट्र वैद्यक परिषद समिती स्थापन करण्यासाठी विजयी संघटनेचे ९ सदस्य, राज्य सरकारकडून निवडलेले ५ आणि राज्य सरकारच्या विविध विभागांतील ४ सदस्य असतात; मात्र परिषदेच्या प्रशासकीयपदी तात्पुरता अधिकारी नेमण्यात आला होता. या तात्पुरत्या अधिकार्‍याद्वारे या प्रकरणांचा निपटारा करणे शक्य नसल्याने या प्रकरणांना गती मिळाली नसल्याचे वैद्यक परिषदेतील तज्ञांनी सांगितले.

१. जुन्या प्रलंबित प्रकरणांमध्ये तक्रारदारांचा पाठपुरावा करणे शक्य होत नसल्याने तसेच ती परिषदेच्या नियमानुसार ही प्रकरणे रहित करता येत नाहीत. अशा प्रकरणात रुग्णांना वृद्धत्वामुळे तसेच अन्य शारीरिक व्याधींमुळे प्रत्यक्ष येता येणार नाही, त्यांच्यासाठी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’सारखी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात विचार चालू आहे.

२. या संदर्भात महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले की, ‘तांत्रिक अडचणींमुळे ही प्रकरणे रखडली आहेत. प्रलंबित प्रकरणांपैकी एक तृतीयांश निकाली काढण्यात आली आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे न्यायालयीन पद्धतीने चालत असल्याने त्यात कागदपत्रांची छाननी, दोन्ही बाजूंना ऐकून घेऊन ‘एथिकल कमिटी’समोर या गोष्टी मांडाव्या लागतात. त्यामुळे या प्रक्रियेस वेळ लागतो.’


Multi Language |Offline reading | PDF