लोकशाहीमध्ये पत्रकारितेचा अंकुश कायम राहील, यासाठी प्रयत्नरत राहू ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचा मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने ‘कृ.पा. सामक जीवनगौरव पुरस्कारा’ने गौरव

मुंबई, २४ जानेवारी (वार्ता.) – लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाच्या पाठीशी राज्यशासन ठामपणे उभे आहे. लोकशाहीचा हा आधारस्तंभ निरपेक्षपणे काम करू शकला पाहिजे. लोकशाहीमध्ये पत्रकारितेचा जो काही अंकुश आहे, तो कायम राहील, यासाठी प्रयत्नरत राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वर्ष २०१८ चे पुरस्कार वितरण २३ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यामध्ये ‘कृ.पा. सामक जीवनगौरव पुरस्कारा’ने ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना गौरवण्यात आले. या वेळी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (वृत्तपत्र) विश्‍वास वाघमोडे (इंडियन एक्सप्रेस) आणि (वृत्तवाहिनी) महेश तिवारी (न्यूज १८ लोकमत) यांना, तर मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ पुरस्कार प्राजक्ता पोळ (न्यूज १८ लोकमत) यांना देण्यात आला. या वेळी प्रसारमाध्यमांतील विविध मान्यवर उपस्थित होते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सीमेत गृहनिर्माण योजना राबवतांना मंत्रालय आणि विधीमंडळामध्ये दैनंदिन आणि नियमित वार्तांकन करणार्‍या पत्रकारांसाठी ५० टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या असल्याचा शासन निर्णय २३ जानेवारी या दिवशी काढण्यात आला. याविषयी या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली. ‘ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजने’विषयी मुख्यमंत्री म्हणाले की, पत्रकारांना मानधन देण्याविषयीची ही योजना संमत झाली असून लवकरच ती चालू होईल.


Multi Language |Offline reading | PDF