राजकीय पक्षांना मिळणार्‍या ५० टक्क्यांपेक्षा अधिक निधीचा स्रोत अज्ञात

पारदर्शक कारभाराच्या बाता मारणार्‍या भाजपसह इतर सर्व राजकीय पक्षांनी ‘अज्ञात’ आर्थिक स्रोत उघड करून अगोदर स्वतः पारदर्शकता दाखवावी !

नवी देहली – वर्ष २०१७-१८ मध्ये भारतातील राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या राजकीय पक्षांना मिळालेल्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक निधीचा स्रोत अज्ञात असल्याची माहिती ‘असोसिएशन् फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर्), या संस्थेने जाहीर केली. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप), बहुजन समाज पक्ष (बसप) आणि तृणमूल काँग्रेस या ६ राष्ट्रीय पक्षांनी प्राप्तीकर परतावे आणि देणग्या यांची माहिती निवडणूक आयोगाला सादर केली होती. त्यावरून काढलेला निष्कर्ष २३ जानेवारीला घोषित करण्यात आला.

१. ‘एडीआर्’ने दिलेल्या माहितीप्रमाणे राजकीय पक्षांना देण्यात आलेल्या या देणग्या ‘इलेक्टोरल बॉण्ड्स’ आणि स्वेच्छा देणग्या या स्वरूपातील आहेेत. वरील ६ पक्षांना वर्ष २०१७-१८ मध्ये मिळालेल्या एकूण १ सहस्र २९३ कोटी ५ लाख रुपयांच्या निधीपैकी ६८९ कोटी ४४ लाख रुपये म्हणजे ५३ टक्के निधी अज्ञात स्रोतांकडून मिळाला आहे. यामध्ये ‘इलेक्टोरल बॉण्ड्स’द्वारे २१५ कोटी रुपये म्हणजे ३१ टक्के, तर ३५४ कोटी २२ लाख रुपये स्वेच्छा देणग्यांच्या माध्यमातून मिळाले आहेत. इतर विविध अज्ञात स्रोतांद्वारे ४ कोटी ५ लाख रुपये मिळाले आहेत.

२. भाजपने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीनुसार त्याला ५५३ कोटी ३८ लाख रुपये अज्ञात स्रोतांकडून मिळाले. हे प्रमाण इतर सर्व पक्षांना अज्ञात स्रोतांकडून मिळालेल्या एकूण निधीच्या ८० टक्के आहे.

३. सहाही पक्षांना एकूण ४६७ कोटी १३ लाख रुपये म्हणजे ३६ टक्के निधी हा ज्ञात स्रोतांकडून मिळाला आहे. राष्ट्रीय पक्षांना मालमत्तोची विक्री, सदस्य शुल्क, बँकांचे व्याज यांद्वारे १३६ कोटी ४८ कोटी रुपये मिळाले. देणग्यांपैकी १६ कोटी ८० लाख रुपये या पक्षांना रोख स्वरूपात मिळाले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now