सोलापूर येथील देवीचे मंदिर अज्ञात समाजकंटकांकडून उद्ध्वस्त

सोलापूर – येथील भाग्यनगर रस्त्यावरील विडी घरकुल परिसर, महालक्ष्मी चौक येथील श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर अज्ञात समाजकंटकांनी उद्ध्वस्त केल्याची तक्रार मंदिराचे विश्‍वस्त भीमाशंकर दर्गोपाटील यांनी पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे केली.

धर्मादाय कायद्यानुसार श्री महालक्ष्मीदेवी मंदिराची साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे रितसर नोंदणी असून या मंदिरावर विडी घरकुल भागातील लोकांची श्रद्धा आहे. हे मंदिर कायदेशीर आणि नियमित असूनही या भागातील काही राजकीय मंडळींनी केवळ स्वार्थासाठी हे मंदिर पाडून भुईसपाट केल्याचा आरोप दर्गोपाटील यांनी तक्रारीत केला आहे. मंदिर पाडकामासमवेत मंदिरातील पूजेचे आणि अन्य साहित्य चोरीला गेल्याची नोंदही त्यांनी या तक्रारीत केली आहे. या प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या तक्रारीची प्रत महापौर, पुणे विभागाचे सहधर्मादाय आयुक्त, तसेच एम्आयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now