महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबांच्या ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त झालेल्या गायनाच्या कार्यक्रमाच्या वेळी श्री. प्रदीप चिटणीस यांचे गायन ऐकतांना उपस्थित साधकांना आलेल्या अनुभूती !

श्री. प्रदीप चिटणीस

१६.१२.२०१८ या दिवशी प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’त महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ठाणे येथील श्री. प्रदीप चिटणीस यांनी शास्त्रीय गायन सादर केले. कायर्र्र्क्रमाचा आरंभ श्री. चिटणीस यांनी सकाळच्या प्रहराचा राग ‘अहीरभैरव’ याच्या गायनाने केला. त्यानंतर त्यांनी ‘दरबारी कानडा’ या रागाचे गायन आणि याच रागातील ‘सुख के सब साथी…’ हे भजन म्हटले. त्यांनी कार्यक्रमाची सांगता ‘तब मैं जानकीनाथ कहाऊँ…’ या भैरवीने केली. कार्यक्रमात श्री. चिटणीस यांच्या गायनाला श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी तबल्यावर साथ केली. या कार्यक्रमाला ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’चे संस्थापक प.पू. देवबाबा यांची वंदनीय उपस्थिती लाभली. प.पू. देवबाबांचे काही भक्तही या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प.पू. देवबाबांनी श्री. प्रदीप चिटणीस आणि श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांचा शाल अन् फळे देऊन सत्कार केला.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ. ‘प.पू. देवबाबांच्या आश्रमात श्री. प्रदीप चिटणीसकाकांनी दुसर्‍यांदा गायन सादर केले. काकांच्या पूर्वीच्या गायनाच्या तुलनेत त्यांचे या वेळचे गायन सूक्ष्म स्तरावर अधिक परिणामकारक असल्याचे जाणवले.

आ. ‘दरबारी कानडा’ या रागाच्या वेळी माझी भावजागृती झाली.’

२. सौ. अनघा जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

अ. ‘काका राग ‘अहीरभैरव’ गात असतांना मला प.पू. देवबाबांच्या ठिकाणी पांढरा प्रकाश दिसला. ‘तो प्रकाश काकांकडे जात आहे’, असे मला जाणवले.

आ. काकांच्या पूर्वीच्या गायनाच्या तुलनेत या वेळच्या गायनामुळे मी गाढ ध्यान अनुभवत होते.

इ. कार्यक्रमाच्या शेवटी ‘तब मै जानकीनाथ कहाऊँ…’ या भैरवीच्या वेळी काका लयकारी घेत असतांना ‘ते प्रभु श्रीरामाला आतून आळवत आहेत’, असे मला जाणवले.’

३. सौ. सावित्री इचलकरंजीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ. ‘भैरवी गात असतांना ‘काका गाढ ध्यानात आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी माझेही ध्यान लागत होते.

आ. काका भैरवीचे स्वर जसजसे आळवत होते, तसतसे ते स्वर अधिक सूक्ष्म होत असून ‘त्या स्वरांचा परिणाम सूक्ष्म स्तरावर होेत आहे’, असे मला जाणवले.’

४. श्री. गिरिजय प्रभुदेसाई, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ. ‘कार्यक्रमाच्या आरंभी मला आनंद जाणवत होता. माझे मन निर्विचार होऊन मला शांत वाटत होते.

आ. काकांनी आरंभी विलंबितमध्ये मोठा ख्याल गायला आणि नंतरच्या बंदिशी मध्य लयीत होत्या. गायन जसजसे पुढे जात होते, तसतशी माझ्या आनंदातही वाढ होत होती.’

(बंदीश : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत. यालाच ‘छोटा ख्याल’ किंवा ‘चीज’ असेही म्हणतात. ही मध्य किंवा द्रुत लयीत गातात. मोठा ख्याल : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे संथ लयीत गायले जाणारे बोलगीत.)

५. आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

५ अ. ‘दरबारी’ राग ऐकतांना ध्यान लागणे, ‘स्वतःचा सूक्ष्मदेह वेगाने वर वर जात आहे’, असे जाणवणे आणि त्यानंतर मन निर्विचार होणे : ‘काकांनी ‘दरबारी’ राग गायला आरंभ केल्यावर माझे ध्यान लगेच लागले. ध्यानाच्या आरंभी काही क्षण ‘माझा सूक्ष्मदेह वेगाने वर वर जात आहे’, असे मला जाणवलेे. नंतर काही क्षणात माझे मन निर्विचार झाले. ते ध्यान इतके गाढ होते, की गायन संपेपर्यंत मला कशाचीच जाणीव नव्हती.

५ आ. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मनात नृत्याचे विचार येणे; परंतु या कार्यक्रमाच्या वेळी प्रथमच नृत्याचा विचारही मनात न येणे : आतापर्यंत गायन, वादन किंवा नृत्य यांपैकी काहीही चालू असतांना माझ्याकडून मानस नृत्य व्हायचे किंवा नृत्याचे विचार माझ्या मनात यायचे. या वेळी प्रथमच नृत्याचा विचारही माझ्या मनात आला नाही.

५ इ. ‘प.पू. देवबाबा यांच्याकडून मला चैतन्य मिळत असल्याचे जाणवले.

५ ई. गायनाच्या शेवटी मला हलके वाटत होते. आज्ञा आणि अनाहत या चक्रांच्या ठिकाणी मला वलयाकार आल्हाददायक संवेदना जाणवत होत्या.’

६. कु. प्रतीक्षा आचार्य, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

६ अ. ‘अहीरभैरव’ रागाच्या आरंभी माझ्या मनात अनावश्यक विचार येत होते. नंतर हळूहळू माझे मन स्थिर होत गेले.

६ आ. मला चैतन्य मिळून माझा नामजप आतून चालू झाला.

६ इ. ‘दरबारी कानडा’ या रागातील चीज ऐकतांना त्याच्या बोलांवर मनातून तालबद्ध नृत्य होणे आणि अंतर्मनात आनंदाचे तरंग निर्माण होणे : ‘दरबारी कानडा’ या रागातील चीज ऐकत असतांना मी त्या बोलांशी अंतर्मनातून एकरूप झाले होते. त्या बंदिशीच्या बोलांवर माझ्याकडून मनातून तालबद्ध नृत्य सहजतेने होत होते. त्या वेळी माझे मन पुष्कळ प्रसन्न होऊन माझ्या अंतर्मनात आनंदाचे तरंग निर्माण झाले होते.

६ ई. तबलावादनाकडे लक्ष जाऊन त्या तालाशी एकरूप होणे आणि त्या वेळी ध्यान लागणे : कार्यक्रमाच्या शेवटी गायलेल्या भैरवीला श्री. गिरिजयदादा तबल्याची साथ देत होते. एरव्ही माझे तबल्याच्या तालाकडे जास्त लक्ष नसते; पण या वेळी प्रथमच माझे लक्ष तबलावादनाकडे गेले आणि मी त्या तालाशी एकरूप झालेे. नंतर माझे ध्यान लागले.’

७. कु. म्रिणालिनी देवघरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ. ‘अहीरभैरव’ या रागाच्या वेळी आलाप घेत असतांना काका त्या आलापासह वर वर जात आहेत’, असे मला दिसले.

आ. आरंभी मला पुष्कळ उष्ण वाटत होते; पण नंतर पुष्कळ थंड आणि हलके वाटू लागले.

इ. ‘दरबारी कानडा’ या रागाच्या बंदिशीवर मी नृत्य करत आहे’, असे मला दिसले.’

८. कु. मधुरा चतुर्भुज, कात्रज, पुणे

‘काकांनी कार्यक्रमाच्या शेवटी भैरवी सादर केली. तेव्हा मला आनंद जाणवला आणि मला चैतन्य मिळाल्याचे जाणवले.’

श्री. प्रदीप चिटणीस यांच्या गायनाच्या वेळी तबल्याची साथ करतांना आलेली अनुभूती

कार्यक्रमापूर्वी तबलावादनाचा सराव झालेला नसूनही ‘भगवंत आणि प.पू. देवबाबा सर्व करवून घेतील’, असे वाटणे अन् त्यामुळे ताण न येणे : ‘कार्यक्रमापूर्वी चिटणीसकाकांच्या समवेत माझा सराव झालेला नव्हता. आदल्या दिवशी केवळ एक घंटा सराव झाला होता; परंतु ‘भगवंत आणि प.पू. देवबाबा सर्व करवून घेतील’, असे मला वाटत होते. त्यामुळे मला ताण आला नाही.’

– श्री. गिरिजय प्रभुदेसाई, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सूक्ष्म स्तरावरील घडामोडींचे आकलन होण्यासाठी व्यक्तीने स्वतःची साधना वाढवणे आवश्यक !

‘संगीतातील विविध रागांचा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अनुभवण्यासाठी स्वतःची साधना असणे आवश्यक आहे. हा अभ्यास सूक्ष्म स्तरावरील असल्याने सूक्ष्मातील घडामोडी अनुभवण्यासाठी साधनेत प्रगती करणे महत्त्वाचे आहे.

समाजातील साधारण ८० टक्के लोकांना आध्यात्मिक स्वरूपाचा, उदा. वाईट शक्ती, अतृप्त पूर्वज यांचा त्रास असतो. या त्रासामुळे व्यक्तीला सूक्ष्मातील गोष्टी अचूक कळण्यात वाईट शक्तींचा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे सूक्ष्म स्तरावरील अनुभव येण्यासाठी वाईट शक्तींच्या त्रासाचे प्रमाण न्यून करण्यासह साधनेत प्रगती करणेही महत्त्वाचे आहे.

यासाठी साधनेच्या आरंभीच्या टप्प्याला आपल्या कुलदेवतेचा नामजप, उदा. श्री रेणुकादेवी कुलदेवी असल्यास ‘श्री रेणुकादेव्यै नमः ।’ किंवा कुलदेवता ठाऊक नसल्यास ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप अधिकाधिक करावा. यासमवेत पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप दिवसभरात ४५ मिनिटे करावा. याप्रमाणे नामजप केल्याने साधना वाढल्यावर व्यक्तीला सूक्ष्मातील घडामोडींविषयी थोडे थोडे कळायला लागते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   


Multi Language |Offline reading | PDF