(म्हणे) ‘समाजव्यवस्थेपेक्षा धर्मव्यवस्थेचा पगडा वाढू पहातोय !’ – कवयित्री नीरजा यांची मुक्ताफळे

कल्याण येथे ४४ व्या महानगर मराठी साहित्य संमेलनात धार्मिक सूत्राविषयी वैचारिक धूळफेक !

प्राचीन काळापासून या देशाची समाज आणि राष्ट्र व्यवस्था ही धर्माधिष्ठीत आहे. ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेत घुसडण्यात आला आहे आणि सध्या अत्यंत ढोंगी आणि बेगडी धर्मनिरपेक्षता या देशात चालू आहे. साम्यवाद आणि समाजवाद यांचा प्रभाव असलेले साहित्यिक भारतीय संस्कृतीतील धर्मव्यवस्थेचा अभ्यास करून त्याचे महत्त्व लक्षात घेत नसल्याने त्यांचीच हानी होत आहे !

कल्याण – आपल्या समाजाने आणि देशाने असहिष्णू प्रतिमा आता दुरुस्त केली पाहिजे. कारण समाजव्यवस्थेपेक्षा धर्मव्यवस्थेचा पगडा वाढू पहातोय अशी मुक्ताफळे कवियत्री नीरजा यांनी कल्याणमध्ये उधळली. ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ आणि ‘कल्याण सार्वजनिक वाचनालय’ यांच्या वतीने आयोजित ४४ व्या ‘महानगर मराठी साहित्य संमेलनाचे’ उद्घाटन नीरजा यांच्या उपस्थितीत २० जानेवारीला महाजनवाडी सभागृहात करण्यात आले. त्या वेळी संमलेनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना त्यांनी सध्याची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती यांवर वरील मते व्यक्त केली. तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे नयनतारा सहगल यांचे आमंत्रण ऐनवेळी रहित केल्याविषयीही नीरजा यांनी निषेधही नोंदवला.

या वेळी नीरजा यांनी मांडलेली सूत्रे

१. आताचा काळ हा लेखक, कवी यांसारख्या संवेदनशील व्यक्तींना अस्वस्थ करणारा आहे. (हिंदूंच्या हत्या होत असल्याने त्यांनाही हा काळ अस्वस्थ करणारा आहे, हे नीरजा यांच्यासारख्या साम्यवादी साहित्यिकांना कधी लक्षात येणार ? – संपादक)

२. केवळ महानगरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही ही अस्वस्थता आपल्याला दिसत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण गढूळ होत असतांना लेखक आणि कवी यांनी बोलले पाहिजे. (काश्मीरमधील हिंदूंच्या हत्या, केरळमधील हिंदूंच्या हत्या, गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर यांविषयी साहित्यिक का बोलत नाहीत ? त्यांना हिंदूंच्या वेदना आणि भावना समजत नाहीत, असेच यामुळे म्हणावे लागेल ! – संपादक)

३. आपला देश नेहमी सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन राहिलेला देश असून वेगळ्या संस्कृती आणि वेगळी माणसं एकजीव होऊन सुखाने नांदत आहेत. अशावेळी समाजातील काही ठराविक लोक मात्र आपण विसरू पहात असणार्‍या जाती-धर्माची सतत आठवण करून देत आहेत. ते थांबल्यास माणसातील दुरावा आपोआप दूर होईल ! ( हे नीरजाबाईंनी धर्मांध, ख्रिस्ती आणि जातीयवाद पसरवणार्‍या संघटना आणि हिंदुविरोधी पक्षांचे नेते यांना समजावून सांगावे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF