वर्ष २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत मतदानयंत्रे ‘हॅक’ केली गेली होती ! – सय्यद शुजा, लंडन

‘हॅकींग’विषयी माहिती असल्याने गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा !

लंडन – मतदानयंत्र (ईव्हीएम्) ‘हॅक’ करता येते. भारतात वर्ष २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानयंत्रांचे ‘हॅकींग’ झाले होते. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, गुजरात या राज्यांच्या निवडणुकीतही मतदानयंत्रांत फेरफार केले गेले होते, असा दावा स्वतःला सायबरतज्ञ म्हणवणार्‍या सय्यद शुजा यांनी लंडन येथे एका पत्रकार परिषदेत केला. या घोटाळ्याची माहिती भाजपचे नेते, तसेच तत्कालीन केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना असल्याने त्यांची हत्या करण्यात आली’, असाही दावा शुजा यांनी केला.  भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा वर्ष २०१४ ची निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांतच अपघाती मृत्यू झाला होता.

‘इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन (युरोप)’ संस्थेने २१ जानेवारीला लंडन येथे ‘स्काईप’प्रणालीद्वारे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यात बुरखा घातलेला आणि ‘मी शुजा आहे’, असे सांगणार्‍या व्यक्तीने वरील आरोप केले. शुजा पुढे म्हणाले, ‘‘मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही मतदानयंत्रे ‘हॅक’ करण्याचा भाजपचा प्रयत्न आमच्या पथकाने उधळला. अन्यथा भाजपने तिन्ही राज्ये जिंकली असती.’’

पत्रकार परिषदेस काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांची उपस्थिती

पत्रकार परिषदेस काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल उपस्थित असल्याचे एका छायाचित्रावरून उघड झाले; मात्र काँग्रेस  पक्षाने याविषयी खुलासा केलेला नाही.

‘हॅकर’ची पत्रकार परिषद काँग्रेस प्रायोजित होती ! – भाजप

रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘‘पत्रकार परिषद आशीष रे यांनी आयोजित केली होती. ते ‘नॅशनल हेरॉल्ड’ दैनिकासाठी स्तंभलेखन करतात. त्यांनी काही स्तभांमधून राहुल गांधी यांचे भरभरून कौतुक केले होते. ही पत्रकार परिषद राहुल गांधी प्रायोजितच होती. त्यात सिब्बल काय करत होते ?’’

मतदानयंत्रे पूर्णपणे सुरक्षितच ! – निवडणूक आयोग

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुजा यांचे सर्व आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत ‘मतदानयंत्रे पूर्णतः सुरक्षित आहेत’, असे ठामपणे सांगितले. ‘देशात वापरात असलेल्या मतदानयंत्रांची निर्मिती ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’, यांच्याकडून सिद्ध केली जाते. या दोन्ही सरकारी आस्थापने आहेत. मतदानयंत्रांची निर्मिती अतिशय काटेकोर निकषांना अनुसरून केली जात असल्याने त्यांच्या विश्‍वासार्हतेवर शंका घेण्यास थोडाही वाव नाही’, असे निवडणूक आयोगाने या प्रकरणी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now